निसर्गराजा
निसर्गराजा
दुपारी गॅलरीत जाण झालं आणि समोरच्या निसर्गाने नजर खिळवून धरली. लॉकडाऊन वगैरे वगैरे विचार सगळे विरून गेले त्यात. खरंतर अगदी वर्दळीच्या आीूमच्या
रस्त्यावरच्या दोन बाजूंना असलेली ही झाडं. तशी मजबूत आणि खूप वर्षांपासूनची. तसं तर मधे बरंच अंतर. खोडांमधलं परिघाचं आपापल्या वाढीचं आवश्यक अंतर सांभाळणारे ते वरती वाढत जात एकमेकांशी सख्खे होत गेलेले. प्रेमळ गुजगोष्टीत रमणारे. पर्जन्यवृक्ष, भेंडी, गुलमोहोराची हिरवाई आणि त्यावर सोनमोहोराने चढवलेला उन्हाची
सुवर्णझळाळी ल्यायलेला मुगुट. दिसतोय नं खुलून निसर्गराजा त्यात. आहेच तसा तो रूपवान. नितळ निल निरभ्र आकाश
हसतंय उन्हेरी शालीतून
दुपारच्या मस्त लखलखत्या उन्हासह
लखलखतोय निसर्गराजा
सजलाहे कसा पहा तर तो
झळाळतां सुवर्णमोहरी मुगुट लेवून
खुषीत शीळ घालताहे
कोकीळकंठीं पंचमातून
मजेतच संवादताहे
पोपटी पोपटी मियाँमिठुतून
आनंद पखरवताहे पहा तर तो
कोवळ्या लुसलुशीत पालवीतून
खुषीत फुलताहे तो
गुलाबी पर्जन्यवृक्षातून
पायघड्या अंथरताहे
लाल गुलमोहरातून
हसून स्वागत करताहे पहा तर तो
बहाव्याच्या राजस घोसांतून
सर्वच रंगी खुलताहे तो
सुवर्णरंगी झालर लेवून
नजर जाईल तिथे आहे
तो तर खुषी घेऊन, येताय नं,
भेटीचं आमंत्रण देताहे पहा तर तो
वासंतिक आम्रमंजिऱ्या डोलवून