Poonam Arankale

Others

3  

Poonam Arankale

Others

पैल तो गे...

पैल तो गे...

3 mins
96समचरणांनी वीटेवर ऊभा तो पंढरीच्या मंदिरातला निळीया कसा आज आभाळ भरून राहिलाहे. आषाढघनरूपी ती निळी सावळाई मनमंदिराला भारून राहिलीये. 

खरं तर दर्शनाचीच ओढ. दर्शनी़ आहेही तो सावळा अगदी समोरच, पण आहे मात्र असा ऊंच आभाळी गुढ, गंभीर, अस्पर्शं! त्याच्यां तशा अस्पर्श असण्यानेच त्याच्या रूपाची कशीश जाणवतीये नयनांना. कारण नयनांनी अनुभवलंय नं त्याचं ते मूर्तिरम्य हसरं साजिरेपण. त्याची ओढ लावणारी आपुलकीची नजर. त्या नजरेत तरळणारी भेटीची खुषी. पुनः येण्याचं त्या नजरेतलं आग्रही आमंत्रण.   


 त्याला माहित आहे. मी नाही येऊ शकत तिथे. त्याला चरणस्पर्श नाही करू शकत. बंधन मला आहे. पण त्याचं तसं काहीच नाहीये. तो आहेच मुक्तं, स्वच्छंद. आभाळी भरून आशीर्वाद देऊन राहिलाहे. पण सगुण रूपात साकारून नयनांनाही शांतवावं जी त्यानं. त्याच्या प्रसन्न हसण्याने मनालाही नीववावं.   


कधी भेटेल तो!! कोण निरोप पोचवेल माझा या निळीयाला ? कोण घेऊन येईल त्याचा सांगावा माझ्यापर्यंत? !

 अरे, पैल त्या सावळमेघांआडून ऐकू येताहे तो काऊस्वर. त्याच्या सूक्ष्मदृष्टीने बरोबर टिपलं असेल का या सावळमेघातल्या निळीयाला! हो. त्याच्याकडे नक्कीच संदेश दिला असेल निळीयाने. 

रोजच तर माझ्या पानातला घास असतो काऊला. 

तो पहा त्याचाच स्वर हा. नक्की काहीतरी शकुन घेऊन आला असणार तो आता. 

पैल तो गे काऊ कोकताहे ।

शकुन गे माये सांगताहे||

अरे हो, कळलंय मला तू आलायस, पण सांग बघू चटकन येतोय नं तो निळीयाही पाठोपांठच तुझ्या. 

आता तूच सखा माझा आणि दूतही तूच त्याचा. 

तुझ्या दृष्टीची जादू काही आमच्याकडे नाही. या बाबतीत तुझ्यासम तूच हो आणि म्हणूनच आमच्यामधला दुवाही आता तूच रे! 

तर भेटलायस नं तू त्या मेघभरल्या निळीयाला.  

सांग तर चटकन प्रेमळ पंढरीचा राया मला भेटायला इथे येणार आहे नं?

नुसती कसली कावकाव रे !! काय समजायचं यातून म्हणे! काही शुभ कौल देशील की नुसतीच कावकाव !!

 बरं बाबा, चल पंढरीराया भेटले की तुला बक्षीस देववीन रे. काय हवं, तुझ्या पंखांना सोनरंगानं मढवायला सांगू!! 

ओह! परत कावकाव च. काय उपयोग म्हणतोस?!  

हो रे, ते ही खरंच. तुझ्या सुवर्णमौलिक सूक्ष्मदृष्टीपुढे पंखरंगांचं मोल ते काय!! उगा शिका-यांची चैन व्हायला. 

बरं ते राहू दे. तुझ्यासाठी तुला आवडते तशी दहिभाताची उंडी ठेवते. शिवाय जोडीला अमृतासम दुधाने भरलेली वाटीही ठेवते. आता तर सांगशीलच पंढरीरायाचा भेटीचा निरोप.

हं तर, आता चेष्टा नको हो. वेगेवेगे सत्य सांग पाहू कसा! 

यंदाची भेट हुकलीये तर पुढची भेट कधीची... 

ओहोS ! तू तर मधुर रसाळ फळ देणाऱ्या आंब्याच्या फांदीवर गेलायस की. बास. आता मला ही शुभ शकुनाची खूण पटली रे !! 


पैल तो गे काऊ कोकताहे ।

शकुन गे माये सांगताहे ॥१॥

उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ ।

पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ॥२॥

दहिंभाताची उंडी लावीन तुझे तोंडी ।

जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी ॥३॥

दुधें भरूनी वाटी लावीन तुझें वोंठी ।

सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥४॥

आंबया डहाळी फळें चुंबी रसाळीं ।

आजिचे रे काळीं शकुन सांगे ॥५॥

ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणें ।

भेटती पंढरीराये शकुन सांगे ॥६||


ज्ञानेश्वर माउलींनी अक्षर केलेली ही विराणी. वारकरी मनांची त्या नीळ परमपुरुषाच्या सगुण भेटीची आस मांडणारी. त्यासाठी सूक्ष्म दृष्टीची देन लाभलेल्या त्या काऊची यात केलेली गोड मनधरणी. माउलींचा प्रातिभ स्पर्श श्राध्द पक्ष्याला झक्कपैकी पंढरीरायाचा शुभ शकुन देणारा दूत बनवून गेलाय. दैवी प्रतिभेचा स्पर्शच अशी कमाल घडवून आणतो. .  


आज वारकरी मनांनाच नाही तर सगळ्यांनाच त्या जादुई दैवी स्पर्शाची गरज जाणवते आहे. मनाला नकारात्मक स्पंदनांच्या मळभापैल पांडुरंगी घेऊन जाणाऱ्या जादुई स्पर्शाची ओढ जाणवते आहे. 

तोच स्पर्श घडवून आणेल (मळभा)पैल असणाऱ्या त्याची समक्ष भेट. पैल तो गे... तो स्वागतोत्सुक उभा आहे ठामपणे आपल्यासाठी याची साक्ष पटवेल. यातल्या काऊनी हाच तर शकुन आणला आहे. 

 खरंय नं !!  

चला तर त्यांनाच जागवूया नाम गजर करून. 

जय जय रामकृष्ण हरि

ज्ञानोबा माऊली तुकाराम !!

पंढरीनाथ महाराज की जय !!Rate this content
Log in