स्वामीभवन
स्वामीभवन
प्रिय रोजनिशी,
काही व्यक्तींच्या सान्निध्यात आलं तरी मनावर आलेलं मळभ दूर सरत जातं. अशा व्यक्ती प्रत्यक्षातच भेटायला हव्यात असं नाही. त्यांचे पुस्तकंरूपाने आपल्यापर्यंत पोचलेले विचारही मन उजळवत राहतात. आत्ता वाचायला घेतलेलं 'आनंदयात्रा', एक छोटंसं पुस्तक हे त्यापैकीच एक. घरच्या संग्रहातील हे पुस्तक आधी वाचून झालंय पण काही पुस्तकं पुन्हा वाचाविशी वाटतात. काही वेळा पुस्तक संग्रही कसं जमा झालं त्यातही रोचकता असते. आणि आपले मनगुरू इतके विलक्षण की पुस्तक हातात घेतलं की ती रोचकताही पुन्हा अनुभवता येते.
तर मागे एकदा लोणावळ्यात नागरगाव विभागात स्वामी भवनमध्ये जाणं घडलेलं. पूज्य श्री मुकुंद/नाना करंदीकरांच्या संकल्पनेतून साकारलेलं हे स्वामी भवन. स्थापना एप्रिल 1984 मधली. यांना रेल्वे बोगीमध्ये साक्षात स्वामी समर्थांनी दर्शन दिलेलं 1964 मधे. ते ज्या स्वरूपात दर्शन दिलेलं त्या भव्य ऊभ्या स्वरूपातली आजानुबाहू ब्रॉन्झ
मूर्ती बघता क्षणी लक्ष वेधून घेते. तिथलं शांत प्रसन्न वातावरण मनाला चैतन्यता देतं. अहं, मला व्यक्तिशः नानांच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. आजही नाही. मी त्यांना भेटले त्यांनीच लिहून ठेवलेल्या अक्षर अनुभवातून. त्यांचे हे अक्षर अनुभव त्यांच्याच शब्दांतून वाचावेत. म्हणजे या स्वामीभवन वास्तुजवळच नणंदेचं तिथे तात्पुरतं म्हणजे वर्ष दोन वर्षाकरता वास्तव्य होतं. त्यानिमित्ताने इथे जाणं घडलेलं. मग तिथे गेल्यावर कळलं की नाना ठाण्यात राहायचे. ते ही नौपाडा विष्णूनगरमधे. मी ठाण्यात बारा तेरा वर्ष होते रहायला. ते ही नौपाडा मधेच पण मल्हार टॉकीज जवळ. पण यांच्याबद्दल कधी ऐकल्याचं नाही आठवत.
साहजिक उत्सुकता जागी झाली. मग तिथे त्यांनी लिहिलेली पुस्तकं बघितली. त्यातली दोन छोटीशी पुस्तकं घेतली. त्यातलं त्यांचं त्यांनी एकट्याने पायी केलेल्या ठाण
े ते अक्कलकोट या यात्रेवरचं 'आनंदयात्रा' पुस्तक वाचलं आणि अक्षरशः भारावून गेले. या यात्रेनिमित्त त्यांना मिळालेले अनुभव आणि घेतलेल्या अनुभूती यांची खरंच आनंददायी यात्रा साक्षात ऊभी केलीये त्यांनी मन:चक्षुंसमोर. ते ही इतक्या सोप्या सोप्या शब्दात प्रसंग नजरेसमोर उभे केलेत. परत ते सांगताना कुठेही कसलंही अवडंबर, अभिमान नाही. मिळालेले अनुभव जगदीशार्पण ही भावना बस. खरं तर खूप हळहळायला झालं. कित्ती जवळ राहात होते मी. खूप मोठा स्वामी परिवार होता यांचा अजूनही आहे असं म्हणूया. खूप जणांना यांनी मार्गदर्शन केलंय. कारण समर्थ दर्शनानंतर त्यांनी त्यांची नोकरीं स्वामी आज्ञेने सोडून पूर्ण वेळ मार्गदर्शनासाठी दिलेला. पण भेटीचाही योग असावा लागतो म्हणतात. त्यावेळी शाळा कॉलेज शिक्षण करियर यातच लक्ष म्हणा. असो या पुस्तक रूपाने अक्षर माध्यमातून भेटताहेत ते याचाही आनंद आहेच. अक्षर योग हाही चांगलाच योग आहे नं भेटीचा. पुस्तकरूपाने त्यांना आलेले अनुभव त्यांनी अक्षर केलेत. शक्य असेल त्यांनी जरूर घेऊन वाचावं, संग्रही ठेवावं हे पुस्तक. कधीही पुन्हा वाचावंसं वाटू शकतं. आताच्या वातावरणात तर नक्कीच. एक आश्वासकता जागती राहाते मनात. तर ते पुस्तक वाचल्यावर जे भाव मनात आले ते कवितेत मांडण्याचा प्रयत्न.
रोम रोम स्फुरण पावे, राम राम नाम रे
विश्वमनी मन लिन, रामरूप जाहले ... ... ||
श्वास श्वास जपताहे, राम राम नाम रे
रामनामी रंगले अन रामरसी नाहले... ... ||
वाट वाट पुलकित, नामघोषी दंगते रे
चाल होई सहजसोपी, अथक पडती पावले ||
मन मन प्रज्वलित, रामरंगी डोलते रे
ज्योत पेटे ज्योतीने अन, राम साक्षी जाहले ||
कष्ट कष्ट होती नष्ट, बघता ते मूर्त रे
अमूर्त रूपा वर्णविण्या, शब्द पडती धाकुले ||
नाममय झाले सारे, ध्येय ध्याता ध्यान रे
आनंदकंदा सामोरे ते, आनंदयात्री जाहले ||