Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Poonam Arankale

Inspirational


2  

Poonam Arankale

Inspirational


धरी रे मना, धीर धाकासी सांडी

धरी रे मना, धीर धाकासी सांडी

3 mins 293 3 mins 293

दोन आठवड्यांवर झाले वाऱ्याच्या गतीवर स्वार चक्रवर्ती (चाकावरती अर्थाने हो ) असणाऱ्या जगाला, एका जागी खिळवून ठेवलंय ... एकदम चक्का जाम. वारा निदान स्पर्शातून जाणवतो तरी, पण हा पठ्ठ्या... छे, दाद लागू देत नाही त्याच्या अस्तित्वाची. वाढता वाढता वाढे करवत साध्याशा वाटणाऱ्या खोकल्याच्या लक्षणांतून एक ओळख मिळवून देतो 'सेल्फ क्वारंटाईन' शिक्क्यानिशी. नवनवीन अँटिबायोटिक्सच्या एवढ्या मोठया पसाऱ्याला पुरून उरलाय हा बहाद्दर विषाणू. कधी वाटलं होतं, एक न दिसणारा विषाणू सगळ्या भल्याभल्यांना खो देतं खिळवेल असा. एकविसाव्या शतकातल्या गतिमानतेला असा शून्य गतीत नेऊन ठेवेल!!


तो 'एक मच्छर ' डायलॉग आठवतोय? तसं इथे 'एक विषाणू'. मच्छर तरी दिसतो पण या महाशयांची तर ओळख स्थुलतेत अदृश्यच ! पण कर्तृत्व एवढं मोठं की कितीही मोठ्ठा कायम विमानी चाकांवर राहणारा चक्रवर्ती असू दे, त्याने त्याच्या अदृश्य ओळखीचा शिक्का मारला की चक्रवर्तीपण गुंडाळलंच गेलं त्याचं. हो ना, अहो याची दोस्ती चटकन होते ती या चक्रवर्तींशीच. समानशीलांची दोस्ती चटकन जुळून येते म्हणे त्यावरून तरी या महाशयांनाही वेगवेगळे प्रांत, देश पाहायची आवड असावी. आता चक्रवर्तींना आपल्याशी दोस्ती आवडतिये की नाही त्याला फिकीरच नाही की याची. का असावी म्हणा, सूक्ष्मात सगुण साकार असले तरी सूक्ष्मदर्शकाचे डोळे न चिकटवलेल्या चक्रवर्ती स्थूलासाठी निर्गुण निराकारच नं. मग हमसे दोस्ती करोगे म्हणण्याचा सवालच नाय. बास, चक्रवर्ती आवडला किंवा त्याच्या देशाबद्दल कुतूहल वाटलं की सरळ हाय करत हस्तांदोलन करणार. अदृश्यतेचा पुरेपूर फायदा घेत निवांत चक्रवर्तीच्या हातावर स्वार होत त्याच्या देशात पोचणार. चक्रवर्तींचा हात हाच पासपोर्ट आणि व्हिसाही. बरं, पोचला की लगे हाथ त्याच्या सग्यासोयऱ्यांशीही मुझसे दोस्ती करोगे म्हणत हस्तांदोलन करून घेणार. हो तर त्याने त्याच्याबरोबर आणलेल्या त्याच्या सग्या सोयऱ्यांचीही सोय करणारच नं तो. पाहुणचार करवून घेण्यात तर एकदम पटाईतच. सगळ्या घराला पाहुणचारात गुंगवूनच टाकणार.


तसंही आपलं तत्वज्ञान सांगतच आहे जगी एकच तत्व भरून राहिलंय. संतांनी तर लिहूनच ठेवलंय 'विष्णुमय जग' म्हणून. विश म्हणजे पसरणे. विष्णु म्हणजे सकारात्मक अस्तित्व रूपाने सर्वांत पसरलेला... अदृश्यपणे, तत्वरूपाने. छ्या, म्हणे अदृश्यपणे पसरलेला, काहीच्या काही राव !! असं थोडी असतंय. एकाचवेळी सगळीकडे व्यापून असतो म्हणे तो !! इथे तर सगळे वेगवेगळे दिसतायत तरी...आणि काय सांगत फिरताय सुपरसॉनिक युगी असल्या पुराणयुगी कल्पना !!


ओह्ह, पण हो रे तो विषाणू तरी कुठे दिसतोय लॅबमधल्या सूक्ष्मदर्शकाशिवाय. आणि तरीही आज एकाच वेळेस सर्व जग विषाणूमय आहे. स्थुल जगातल्या भेदाकडे लक्ष देत विष्णूमयता पुराणी कल्पनाविलास ठरली. मग काय त्याने सूक्ष्मात शिरत विषाणूमयता दाखवली. नाकारणार आता सूक्ष्म सृष्टी. हरेक मनातलं द्वंद्व ओळखून आहे तो अंतर्यामी. पुन्हा एकदा द्वंद्वात सापडलेला अर्जुन निरखतोयच तो चक्रधारी. जो आहे या द्वंद्वाच्या परे. कारण तो आहे सूक्ष्माच्याही परे. अर्थात निर्णय नेहमीप्रमाणे अर्जुनावरच सोपवलाय. मनोवेगाने चक्रधारीकडे धाव घ्यायची की शारीरवेगाने विषाणूंची धाव बघत राहायची. सूक्ष्माच्याही परे असणारी विष्णुमय अमृतता घेत, विषाणूमयतेच्या धाकातून बाहेर यायचं, की विषाणूंच्या धाकात राहून विषमयतेत राहायचं हे ज्याचं त्याच्यावरच. अर्थात संभ्रमात किती काळ राहायचं, निर्णय काय घ्यायचा, घ्यायचा की नाही घ्यायचा, अहं जबरदस्ती नाहीच बरं करत तो. प्रेमळच आहे नं तो !! तुम्ही मनोवेगाने धाव घेतल्याशिवाय तो मधे येऊन ढवळाढवळ नाहीच करणारे.


अं, काय म्हणताय !! चक्रधारीकडे धाव घेतली तर तो सोडवेल का यातून?!! हो तर, त्याच्या भयातून मनाला नक्कीच सोडवेल. एकदा का मन भयमुक्त झालं की विषाणूंचा गोवर्धन आपोआपच उलथवून देईल.

पहा तर मनाच्या श्लोकात ग्वाही दिलीये समर्थांनी.


भवाच्या भये काय भीतोस लंडी,

धरी रे मना, धीर धाकासी सांडी,

रघुनायकासारिखा स्वामी शिरी,

नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ||27||


दीनानाथ हा राम कोदंडधारी,

पुढे देखतां काळ पोटी थरारी,

मना वाक्य नेमस्त हे सत्य मानी

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ||28||


आता या काळालाही भीती घालू शकणाऱ्या कोदंडधारीकडे मनोवेगाने पोचायचं तर त्याच्या लाडक्या मनोजवं मारुततुल्य वेगं मारूतीरायालाच साकडं घातलं पाहिजे. परत चक्रवर्ती व्हायचं तर चला तर वेगाने, स्वतःला भयमुक्त करवून घेण्यासाठी त्या मनोवेगी चिरंजीवीकडे. सांजवात लावून नक्की म्हणा खणखणीत आवाजात 'भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती.... ' धीराने यातल्या प्रत्येक शब्दातल्या शक्तीशी समरस होत म्हणणार, तर स्तोत्र संपतासंपताच चैतन्य जाणवेल. भीतीचा लवलेशही उरणार नाही मग. समर्थ शब्द आहेत ते. प्रचीती तर देणारच. आणि समष्टीमुखाने उमटले तर हमखासच.

जय हनुमान

जय श्रीराम


Rate this content
Log in

More marathi story from Poonam Arankale

Similar marathi story from Inspirational