ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी
ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी


आज आहे तिथी ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी.
स्वतंत्र राज्याची, मुद्रा स्वातंत्र्याची दशदिशांत फिरवणारा.
मराठीपण अभिमानाने जिरेटोपातल्या मोत्यांच्या लडीतून मिरवणारा.
मराठी न्याय, मराठी व्यापार, मराठी दर्याबाजीचा दरारा अगदी सातासमुद्रापार निर्माण करणारा.
हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे मानून स्वतंत्र स्वराज्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या, त्यासाठी आपल्या राजाची साथ देणाऱ्या...
मराठी शौर्याला राष्ट्र निर्मितीतून ओळख मिळवून देणाऱ्या... शिवराज्याभिषेकाचा हा दिवस आजचा.
मावळातल्या मराठी धगधगीत निष्ठेने, प्राणांच्या बाजीने, युक्तीने, शक्तीने, स्वातंत्र्यावरील भक्तीने आणि शिवराजांवरील विश्वासाने, प्रीतीने साकारले होते एक राष्ट्र महा आजच्या दिवशी...
याच लाडक्या राजाच्या नावाने एक शक म्हणजेच शिवशक निर्माण झालं, ते आजच्या दिवशी.
प्रारंभ झालाय शिव शक ३४७ चा 'आज'च्या दिवशी.
त्याच गोब्राह्मण प्रतिपालक, प्रजाहितदक्ष, शकनिर्मात्या छत्रपती शिवरायांना नम्र अभिवादन, शिवराज्याभिषेका दिवशी.
जय छत्रपती शिवराय.
शिवराय
इच्छा श्रींच्या मनीची
साकार सर्वांसमक्ष
राष्ट्र घडले एक महा
त्यास गडकोट साक्ष
एकेक चिरा त्याचा
उभा मावळाच दक्ष
अभेद्य ती तटबंदी
भेदींना करते लक्ष्य
दरारा अस्तित्वाचा
शत्रुंवर ठेवी अक्ष
सिंहासनी विराजमान
शिवराय प्रजाहितदक्ष
गडकोट मावळ छातीचा
'श्री'राज्य रक्षणात दक्ष