हितगुज
हितगुज


गच्चीवर पिवऴ्या सोनमोहोराचा पिसारा झुलतोय. बहरलेला तो इतका गोड दिसतोय नं. नेहमीपेक्षाही तजेलदार रूपाने चमकतोय. वसंतातला त्याचा बहर, मुक्तहस्ते गच्चीभर ऊधळतोय. जराशी झुळूक आणि सोनेरी फुलांचा वर्षाव गच्चीभर विखुरतोय. आमच्या सतत वरदळत्या रस्त्याच्या शांततेची मजा घेतोय. धुराच्या आणि धुरळ्याच्या फवाऱ्यापासून मिळालेल्या सुटकेचा आनंद व्यक्त करतोय. निसर्गच तो. दात्या हाताची कमाल दाखवणारच. क्वारंटाईनपण जपत, हातभर अंतरावरून फुलांतून आनंदाची ऊधळण करतोय. केवढी काळजी घेतोय निसर्ग. बाहेर पडू शकत नाही म्हणून हळहळत्या मनांची नाराजी आपल्या वसंती फुलत्या रूपांतून दूर करतोय. ते ही अगदी हलक्याने. कुठलाही बडेजावी रुबाब न दाखवता. मनांना तजेला देणाऱ्या त्याच्या या फुलत्या रूपाचे आभारच.
कालच दुपारी एका मैत्रिणीचा फोन होता. पूनम, आमच्या खिडकीतून नं समोरच्या बागेचा एक हिरवा कोपरा दिसतो. काय फुलून आलीये बाग आणि त्याच्यावरचा तो आभाळाचा निळाशार तुकडा. केवढं निरभ्र आकाश दिसतंय. सुंदर निळाई पसरलिये. असं वाटतंय माझ्या आणि या निळाईच्या मधे येणाऱ्या या सर्व इमारतींना हाताने ढकलून पाडून द्यावं. बस अखंड निळाई पहात बसावं. त्या शांत अनंत निळाईने मलाही तिच्यात सामावून घ्यावं. तिचा फोन ठेवला आणि मनात आलं, मनात दुरावा राखून वेगळे भासवू पहात असलो तरी या हिरवाईचाच एक भाग आपणही. त्याच मनाला असं निळाईच्या अनंततेत सोपवून देऊन कसं वाटेल नं खाली हिरवाईकडे बघतांना. आपल्याला वाटतंय त्या निर्लिप्त, निरभ्र निळाईत सामावायला तसंच तिलाही वाटत असेलच ना हिरवाईशी निवांत हितगुज करायला.
तीच निवांतता मिळतेय नाही आता दोघींनाही समजून घ्यायला, हितगुज करायला एकमेकींशी.
हितगुज नात्याचं नात्याशी
हितगुज मैत्रीचं मैतरांशी
हितगुज प्रेमाचं प्रियकराशी ...||१||
हितगुज हृदयाचं हृदयाशी
हितगुज मनाचं निसर्गाशी
हितगुज निसर्गाचं मनाशी ....||२||
संवादी स्पंदनांचीं ही असोशी
सांधते अंतरांच्या शांततेशी
हवीच त्यासाठी निवांतता जराशी ...||३||