Ashutosh Purohit

Abstract

3  

Ashutosh Purohit

Abstract

* घर *

* घर *

1 min
9.2K


   तुमच्यापैकी कोणी, कधी घराचा आवाज ऐकलाय?
घरी कोणी नसताना, आपण एकटेच असताना, घर बोलायला लागतं आपल्याशी. चार सुख-दुःख सांगतं करतं, उराशी बाळगलेली.
   घरातल्या कुठल्याशा खोलीत एखादा पंखा, दिवा, काहीतरी चालू असतं. तेही जवळीक साधू लागतं नकळत.
आपण एकटे आहोत, याची जाणीव आपल्याला होऊ नये, याची काळजी घेत असावीत ही मंडळी.
   घराचा आढा, कधी त्याच्याकडे असं टक लावून पाहिलच नसतं नाही आपण? ( झोप येत नसेल, तर गोष्ट वेगळी !)
लेण्या पाहाव्यात, तशा आपल्याच घराच्या भिंती निरखू लागतो मग आपण. त्या भिंतीच्या कानाकोप-यात आपल्याच घरातल्यांचे आवाज, पुंजक्या-पुंजक्याने तरंगत असतात.
   मग नुसतं या खोलीतून, त्या खोलीत फिरण्यापलीकडे आपल्या पायांना दुसरं खेळणं मिळत नाही. Hall मधून बेडरूम मधे, बेडरूम मधून किचन मधे, किचन मधून गँलरी मधे...
   सगळीकडे आपल्याला एकच व्यक्ती सतत दिसत राहते. आपण स्वतः.
किती सवय झालेली असते ना आपल्याला माणसांची!
कोणाच्यातरी सहवासाची.
   आपण सोडून दुसरं कोणीतरी आपल्या आजूबाजूला सतत आहे, ही जाणीव जपत असतो आपण कायम. साहाजिकच आहे ते.
मग,
   "घरी एकटं बसून तरी काय करणार? सगळं घर खायला उठेल." असं म्हणून मी घराबाहेर जायचा विचार करतो.
पण मग लगेचच असं वाटतं,
   घरानेही त्याच्या जाणिवा आपल्यासारख्याच जपून ठेवल्या असतील तर? कोणीतरी आजूबाजूला सतत असण्याची त्यालाही सवय झाली असेल तर?
झाली असेल तर कशाला? अहो व्हायलाच पाहिजे, कारण त्या जाणीवेमुळेच तर घराला घरपण येतं!
मी घराच्या किल्ल्या पुन्हा जागेवर ठेवतो. दार लोटून आत येतो.
आतली वास्तू शांत असते.
समईतल्या ज्योतीसारखी.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract