गहिवर पाठवण
गहिवर पाठवण
आपल्या जीवनात जन्मताच अनेक नात्यांची गुंफण आपल्यासोबत असते.. काही नाती असतात प्रेमाची, काही विश्वासाची, काही हृदयाची... या सगळ्या नात्यात एक सुंदर असं नातं अनिवार ओढीचं,मायेचं ,आपुलकीचं जिव्हाळ्याच्या गोडीचं म्हणजेच माय लेकीचं ... कुठल्याच नात्यात नसते एवढी या नात्यात ओढ आहे, म्हणूनच माय लेकीचं नातं चिरंतन गोड आहे... बेधुंद त्या क्षणांना घालीत साद आली ,आरक्त भावनांचा ठेवून साज गेली .. आज त्या गहिवर पाठवणीची आठवण मज आली ...
'आई 'या फक्त दोन अक्षरी शब्दातच विश्वाला गवसणी घालणारे अतूट नाते मानवासह पशू पक्ष्यांनाही सुखावून वेडावून टाकणारे आहे... किती माया, ममता दडलेली आहे 'आई 'या शब्दांमध्ये ... आपल्याला जन्म देऊन या जगात आणणारी आई एखाद्या देवाचेच तर रूप आहे आईच्या अनेक व्याख्या केल्या जातात परंतु आईची व्याख्या काही एकच होऊ शकत नाही कारण
धरतीचा केला कागद
आकाशाची केली शाई
तरी आईचा महिमा लिहिल्या जाणार नाही...
'आई' एक मायेचा पाझर ,तिची माया असते एक आनंदाचा सागर ...माझी आई सुद्धा अशीच सामान्य पण तरीही असामान्य आहे लहानपणापासूनच तिचे नि माझे नाते खूप दृढ आहे... आभाळभर माया आणि निस्वार्थ प्रेम करणारी न बोलताच मनातलं सगळं काही समजणारी, लहानपणापासूनच आंजारून, गोंजारून लाडाने खायला-प्यायला देणारी,खचलेल्या मनात स्व अस्तित्वाचा ची जाणीव करून देणारी माझी आई आज प्रत्यक्ष डोळ्यासमोर येऊन उभी राहिलेली मला दिसली... आमच्या माय लेकीचं नातं आकाशाला भिडणारं व सतत व्यक्त होणार असंच होतं ...कधी माया करायची, कधी रागवायची परंतु नेहमी निस्वार्थपणे फक्त माझ्याच भल्याचा विचार ती करायची ...
थंडीत सरकून पडलेले पांघरून नकळत मायेने ओढून देणारी ,मी 'आई' म्हणताच " काय गं बाळा "लगेच हाक देणारी अशी माझी आई ... माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर कधीकधी आपल्या लेकीला म्हणणारी " ही पोरगी म्हणजे ना, शिकून-सावरून लोकांचच धन " ....पण आपली लेक सासरी जाणार या विचारानेच रडत बसते ती आपलं घट्ट करून मन... आपली चिमणी घरट सोडून जाणार म्हणून तिचं काळीज धडधडतं आतल्या आत खूप रडतं 😌😥
दिवस पुढे सरसावले ...मला मुलाची पसंती आली.. लग्न पक्के झाले सर्वांसाठी खूप आनंदाचा क्षण पण 'आईचे ते आईचेच मन.. ना.....
माझ्यासाठी थोड्यावेळ गहिवरून आले तिला.... लग्नाचा मुहूर्त ठरला.... सगळे खूप आनंदी होते पण आई मात्र मनात कुठेतरी झुरत होती या घरातला चिवचिवाट आता कायमसाठी थांबणार तिला तिला जणू असे भासत होते दिवसातून एकदा तरी मला मायेने जवळ घ्यावं असे तिला वाटत होते. " लेक परक्याचं धन "असलं तरी द्यायला तिला नको वाटत होते..आज ना उद्या आपली लेक जाणार म्हणून आई-बाबांना माझे किती लाड पुरू किती नाही असे झाले होते..
मग अचानक एक दिवस लग्नाचा आला.. गंध तो रंगीन माझ्या कपाळावर पडला.. मोगरा तो सुगंधी आईने माझ्या केसात माळला.. नाचत गाजत पैजन आले, हसत-हसत बांगड्या आल्या, श्रुंगार माझा करुनी तो तिने काजळात भरला... होंटांवरची लाली माझ्या खुदकुन हसली ही साजणी तिच्या साजना साठी सजली ... लग्न व्यवस्थित रित्या पार पडावे यासाठी आई-बाबांनी सर्व कर्तव्य पूर्ती केली त्यांचे स्वप्न ते माझ्या लग्नाचे मंगलाष्टकात पूर्ण झाले, सात कडव्यांच्या मंगलाष्टकात मी सात जन्माचा संसार थाटायला निघाले... लग्न पार पडले ...
आयुष्यातला एक अनोखा असा क्षण पाठवणीचा हृदयस्पर्शी नाजूक प्रसंग समोर आला, ऋणानुबंध जन्मोजन्मीचे हे काही क्षण हृदयाच्या कप्प्यात साठवणी साठीच तर काही क्षण डोळ्यांना पापण्यांवर प्रथम बनण्यासाठी असतात आयुष्य जतन करण्यासाठी आनंदाचा जरी हा सोहळा असला तरी हात सुटताच आई-वडिलांचा परकेपणाची जाणीव होऊ लागली...
चिमुकला हात धरून माझा, मला संपूर्ण घर फिरवणारी माझी आई ..तिची सैलवार वाटणारी मिठी आज घट्ट हृदयाशी भिडलेली होती, हुरहूर वाटणारी भीती तिच्या कुशीत शिरताना आज निघडली होती ..भावपूर्ण चेहरा तिचा मनातले सगळे विचार मला सांगत होता .. आपलं आभाळ अंगण मात्र रिकामं झालं, माझी आठवण माझा होणारा हा दुरावा मनाला तिच्या छळत होता...
का कुणास, ठावे ?सासरी जाताना मन झुरत होते डोळ्यातले हावभाव तीचे मला खुणवत होते .. तिची भावपूर्ण नजर हवं ते बोलून गेली, एक क्षण, हृदयाचा ठोका चुकवून गेली ...
पाऊस पडावा नदीच्या सरीत
वारा वाहतो आहे रातराणीच्या कमीत
शब्दांना, भावनांना जागा उरलीच नाही
माझ्या ओळीत असे तेव्हा जाणवले...
किती नशीबवान मी काहीच कमी नाही केली त्यांनी माझ्यासाठी...किती माझे अहोभाग्य असे आई वडील आले माझ्या वाटी... आपल्या माय-लेकीच्या नात्याबद्दल, खरंतर तुझ्याबद्दल काय लिहिणार लेखणी माझी आई, तुला शब्दांमध्ये उतरणारी माझी नाही तर कोणतीही लेखणी अजून या जगात नाही गं आई ..
आज मनाला भास झाला आई तू सोबत असण्याचा,
क्षणातच अदृश्य झाली ग आई मग.. डोळ्यात आले माझ्या पाणी ...
काटे फिरवून घड्याळीचे सांग कसा घेऊ मागे क्षण...
ओठी नाव तुझे आई, मनी तुझी आठवण ..
आई येते ग मज तुझी आठवण..
