एक शून्य..
एक शून्य..
"एकूण मिळून किती उरले?" मी पुन्हा एकदा विचारलं.
"दर वेळी उत्तर शून्य येतंय" तिकडून उत्तर आलं.
हे असं का होतंय?
मनातल्या भावनांची बेरीज-वजाबाकी करण्यात माझंच मन गुंतलं होतं.
बऱ्याच दिवसांनंतर एखाद्या निवांत रविवारी आई कसं सगळं घर आवरायला घेते ना. तसंच झालं होतं आज.
एक आनंदाचा क्षण अधिक एक दुःखाचा क्षण. उत्तर शून्य.
एक प्रेमाचा क्षण अधिक एक द्वेषाचा क्षण. उत्तर शून्य.
एक विश्वासाचा क्षण. एक विश्वास तोडल्याचा क्षण. उत्तर शून्य.
एक "आपला" क्षण. एक दुसऱ्यासाठी जगलेला क्षण. उत्तर शून्य.
एक "क्षण मोजण्याचा" क्षण. एक "क्षण विसरण्याचा" क्षण.. उत्तर शून्य.
एक काहीतरी "गवसल्याचा" क्षण. एक काहीतरी "निसटल्याचा" क्षण. उत्तर शून्य.
एक स्वप्नातला क्षण. एक सत्यातला क्षण. उत्तर शून्य.
एक पडदा उघडण्यापूर्वीचा क्षण. एक पडदा उघडल्यानंतरचा क्षण. उत्तर शून्य.
एक रंगमंचावरचा क्षण. एक विंगेतला क्षण. उत्तर शून्य.
अशा अनेक बेरजा करूनही उत्तर शून्यच येतंय. आश्चर्य आहे ना?
हे शून्य म्हणजे तरी नक्की काय?
काहीच नसणं!
म्हणजे, finally आपल्या मनाला हा शून्याच मिळतो का?
की हेच हवं असतं आपल्याला?
मी विचार करत राहिलो.
आयुष्य काही क्षणांनी पुढे सरकत होतं... माझ्यासकट काही "शून्यांना" सोबत घेऊन.
