धन्य धन्य ते वीर जवान..
धन्य धन्य ते वीर जवान..


सैनिकांमध्ये जी खरी देशभक्ती दिसून येते ती इतर कोणामध्येही दिसून येत नाही असंच म्हणावं लागेल.केवढा मोठा त्याग नी केवढी मोठी सेवा असते त्या देशभक्त सैनिकांची.देशभक्ती कशाला म्हणतात ते त्यांच्या कडूनच शिकायला हवे..डोळ्यात तेल घालून अहोरात्र देशसेवा करणाऱ्या जवांनां इतका मोठा दुसरा कोण असणार..!.खरी देशसेवा नी खरी देशभक्ती घडते ती त्या सिमेवरच्या जवानांकडून म्हणून मला नेहमी वाटतं की सर्व राजकारण्यांची मुलं सिमेवर हवीत.देश सुरक्षीत नी आपण सुखी आहोत ते कुणामुळे?
इथे आपण दसरा, दिवाळी साजरी करतो गुढी पाडवा, नववर्ष साजरे करतो ते कुणामुळे? आपण सुरक्षित नी सुखी आहोत ते त्या सिमेवरच्या जवानांमुळे.जेंव्हा कुठे बॉम्ब हल्ला किंवा बेछूट गोळीबार,एखादी दंगल किंवा भयानक नैसर्गिक आपत्ती घडून येते तेव्हा त्या जवानांचे योगदान डोळ्यांनी पहायला मिळते नी मनापासून त्यांना एक सॅल्युट द्यावा वाटतो.
जम्मू काश्मीर मध्ये सिमेवर तैनात असलेल्या एका नातेवाईक जवानाला काल नविन वर्षाच्या निमित्ताने बोलण्याचा नुसतं बोलण्याचा नाही तर व्हिडिओ कॉल करून पाहण्याचा योग आला.मी कॉल त्यांना करणार तेवढ्यात त्यांनीच कॉल केलेला.त्यांना सैनिक वेशात पाहून अभिमान वाटू लागला नी ' जय हिंद,' म्हणून एक सॅल्युट ही दिला.पण जे काही पाहिलं ते एखाद्या चित्रपटात पहावं तसं होतं . अगदी बर्फात ...होय ... बर्फात होते ते जवान.! त्यांच्या अवतीभवती सर्वत्र बर्फच बर्फ दिसत होते.कितीतरी बर्फ.बचावासाठी गरम कानटोपी नी लोकरीचे कपडे त्यांनी घातलेले.घाटीत, पर्वत रांगेत त्यांना पाहून उर भरून आला नी खरोखरच किती मोठा तो त्याग नी केवढी ती देशभक्ती! त्यांच्या तोंडून शब्द निघाले..." लेकरं बाळं तुमच्या हवाली करून आलो आहे इथे...." असं म्हणणाऱ्या प्रत्येक जवानांना मला सांगायचं आहे. " तुम्ही आहात म्हणून आम्ही आहेत, तुम्ही आहात म्हणून हा देश आहे,हा देश तुमच्या हवाली आहे, तुम्ही रक्षणकर्ते आहेत या देशाचे नी आम्हा सर्वांचे.तुम्ही खरे देशभक्त नी देशरक्षक आहेत.तुमच्या सेवेला,कार्याला, आणि त्यागाला मनापासून सलाम..!. देशासाठी बलिदान देणाऱ्या इतका महान दुसरा कोणी नसतो.त्या प्रत्येक जवानांबद्दल आम्हाला केवढा अभिमान असायला हवा..."
घरदार, संसाराची मुलाबाळांची, कुटूंबाची नी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता डोळ्यात तेल घालून अहोरात्र देशसेवा करणाऱ्या त्या सिमेवरच्या जवानांच्या सेवेचं मोल अनमोलच...!
सर्व, सर्व सोडून या देशाचा प्रत्येक जवान आपलं बलिदान देण्यासाठी सज्ज असतो काय ती देशभक्ती...!त्यांचे म्हातारे आईवडील, बहिण भावंडे, पत्नी, मुलेबाळे सर्व इकडे असतात नी ते जवान देशाच्या रक्षणासाठी सिमेवर तैनात असतात.सुखदख, सणवार घरची कशाचीच त्यांना मुळीच पर्वा नसते, त्याला म्हणतात देशभक्ती,कोणाचे आजारपण असेल किंवा लग्नकार्य असेल तरीही ते गावाकडे येणार थोडेच.. रक्षाबंधन असो की भाऊबीज हा भाऊ आपला सिमेवर मातृभूमी सेवेत तन, मन सर्व अर्पण करत असतो.. धन्य तो जवान नी धन्य ती देशभक्ती...! त्रिवार वंदन त्या सिमेवरच्या देशभक्त जवानांना.
' पण थोडा उशिर झाला...' हा एका सैनिकाचा पाठ शिकवताना अक्षरशः डोळ्यात अश्रू आले ते आवरता आले नाहीत.. अक्षरशः सर्व वर्ग भारावून गेला नी सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले ते त्यांच्या देशभक्ती मुळे...सिमेवरच्या जवानांच्या वयोवृद्ध आईची तब्येत ठीक नसते म्हणून तो जवान आईसाठी सुट्टी घेऊन गावाकडे निघतो.नी युद्ध जन्य परिस्थिती असल्यामुळे त्या जवानांची सुट्टी रद्द करण्यात येते.तो आपला पराक्रम दाखवून विजय युध्दात मिळवून देतो... नंतर तो गावाकडे येतो तेव्हा त्यांना वाटेतच समजते की त्यांची आई तेंव्हाच देवाघरी गेलेली असते... आईच्या दुःखद निधनाची ती बातमी ऐकून मातृभूमीच्या त्या रक्षणकर्त्या जवानांला किती वाईट वाटले असेल.. त्याला वाटले आपण मातृभूमीची रक्षा केली पण जन्म देणाऱ्या आईला अखेरच्या क्षणी डोळ्याने पाहू ही शकलो नाही.त्याला ते दुःख अनावर होते नी म्हणतो ,"आई,आई मी आलो ग, मी तुझ्यासाठी, तुला भेटण्यासाठी आलो आई...! पण थोडा उशिर झाला !
देशाच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या जवानांना खरोखरच केवढा मोठा त्याग करावा लागतो... त्यांच्या त्या सेवेचं, त्यागाचे मोल आपण कोणीही करू शकत नाही.धन्य ते जवान नी धन्य ती देशभक्ती...! अशा त्या सर्व देशभक्त जवानांना मनापासून सलाम... कोटी कोटी प्रणाम...!
' जय हिंद ! ' ' जय जवान!'