बंध रेशमाचे
बंध रेशमाचे


रमा नेहमीप्रमाणे आपल्या मिस्टर सुरेशना व्हील चेअर वर घेऊन बागेत आली. नेहमीच्याच बाकड्या जवळ व्हील चेअर उभी करून ती त्या बाकावर बसली. "पाणी हवं ना, देते हं" असं म्हणून पाण्याची बाटली काढून त्यातले थोडे पाणी तिने नवऱ्याला पाजलं. स्वतः ही थोडे पिऊन घेतले व आरामशीर बसली. रोजच्या सारखाच बागेत मुलांचा गोंधळ चालला होता. फिरणारे धापा टाकत चालले होते. तर काहीजण गप्पा मारत हळू चालत होते. वातावरण प्रसन्न होते. अशा वातावरणात बसल्यावर रमाला खूप छान वाटायचं. नेहमी बागेत येत असल्याने बऱ्याच जणांशी तिची ओळख झाली होती. तिने भिरभिरत्या नजरेने बागेत चौफेर नजर फिरवली. पण तिची आवडती व्यक्ती दिसत नव्हती. आज उशीर झाला की काय असा विचार ती करत होती तेवढ्यात ती व्यक्ती आली व तिच्या मिस्टरांचा हात हाती घेऊन बोलली, "काय सुरेशराव, बरं आहे ना"? सुरेशच्या चेहऱ्यावर हास्य पसरले. ते गृहस्थ म्हणजे माजी मेजर हिंमतराव. बागेतले रमा सुरेशचे दोस्त.
सुरेशना गेल्या सहा महिन्यांपुर्वी अर्धांगवायूचा झटका आला आणि त्यातच त्यांचे शरीर लुळे पडले. सगळे उपाय करून झाले पण त्यांचे लुळे शरीर व वाचा काही ठीक झाली नाही. अजूनही रमा त्यांच्यावर उपाय करत होतीच.
मेजरना रमाकडून सुरेशची सगळी हकीगत कळली होती. रमा सुरेशचा एकुलता एक मुलगा अमेरिकेत स्थायिक झाला होता. रमा बँकेत नोकरी करत होती. ती नवऱ्याच्या आजारपणामुळे तिला सोडावी लागली. सुरेश मोठा चित्रकार. त्याची पेंटिंग एकापेक्षा एक उत्तम होती. एक "आर्ट एक्झिबिशन" ते लावणार होते पण आता सगळे होत्याचे नव्हते झाले होते.
मेजरचा एक पाय लढाईत निकामी झाला होता. पण जयपूर पायामुळे त्याचे सगळे ठीक चालले होते. पाच वर्षांपुर्वी कार अपघातात बायको वारली होती. त्यांना मुलबाळ ही कुणी नव्हते.
अशा तिघांच्या त्रिकुटाची दोस्ती जमली होती. मैत्रीतून एकमेकाबद्दल आपुलकी जिव्हाळा ही दिसत होता. स्वतः मेजर बऱ्याच वेळा सुरेशकडे यायचे. ते एकटेच बडबड करायचे. पण त्यांच येणं सुरेशरावांना जसं आवडायचं तसं रमाला ही आवडायचं. कधी कधी ते दुपारचे जेवण ही रमाकडेच घ्यायचे. रोज बागेत ही भेट व्हायची. कधी सुरेशची व्हील चेअर ढकलत मेजर संध्याकाळी ही सुरेशकडे यायचे. मग गप्पा गोष्टी जेवण खाणं आटपूनच घरी जायचे. मेजरच येणं जाणं वाढलं होतं. लोकांच्या नजरेत ही ते येत होते. नाही तरी लोकांना चांभार चौकश्या लागतातच. रमालाही लोकांच्या नजरा कळत होत्या पण जेथे नवऱ्याची काही तक्रार नाही तर मग भिती कशाची म्हणून ती ही मेजरशी मोकळेपणाने बोलत होती. तिच्यापेक्षा मेजरची सुरेशकडे जास्त जवळीक होती. ते त्यांना बरीच मदत ही करत होते त्यामुळे रमाला थोडी फुरसत मिळत होती.
संसाराची सगळी जबाबदारी व आजारी नवऱ्याचे करण्यात तिच्या नाकी नऊ येत होते. आता मेजरचा थोडा हातभार लागत होता त्यामुळे सुरेश व रमा त्याच्यावर खूप खुश होते.
मेजरना कळून चुकले होते की सुरेशचे "आर्ट एक्झिबिशन" चे स्वप्न राहिले. रमाची ही ते बघण्याची इच्छा होती. रमाला व सुरेशला खुश करण्याकरता एक्झिबिशन मांडायचा विचार त्यांनी रमाशी काढला. रमाला ही कल्पना फार आवडली. दोघांनी पक्के ठरवले आणि कामाला लागले. सुरेशची सगळी ठेवणीतली चित्रे तिने काढून नीट नेटकी केली. त्यात मेजरनी खूप मदत केली. पुढच्या आठवड्यात सुरेशचा वाढदिवस येत होता. तोच दिवस तिने एक्झिबिशन करता ठरवला व त्याची सर्व जबाबदारी मेजरनी घेतली. प्रमूख पाहुण्या पर्यंत सगळ्यांना निमंत्रण वगैरे दिले आणि वाढदिवसाच्या दिवशी एक मोठा सुखद धक्का रमा व मेजरनी सुरेशला दिला. सुरेशचा चेहरा आनंदाने चमकला. त्याने मेजरना डावा हात कसाबसा उचलत सलाम केला. रमाने जमलेल्या सगळ्या लोकांना सुरेशच्या आजरपणाची व त्यांच्या स्वप्नपुर्तीकरता मेजरची लाख मोलाची मदत लाभल्यामुळे आजचं प्रदर्शन मांडणं शक्य
झालं हे सांगून तिने सर्वां समोर त्यांचा सत्कार केला. सुरेशची बरीच चित्रे ही विकली गेली. प्रदर्शनाची बातमी दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात ही छापून आली.
या सगळ्या प्रकाराने सुरेश खूप आनंदीत झाले. रमा तर अगदी भारावूनच गेली. जे अशक्य होते ते केवळ मेजरमुळे शक्य झाले. तिच्या मनात त्यांच्या बद्दल एक आदरयुक्त आपुलकी निर्माण झाली आणि तिने ते त्यांना बोलून ही दाखवले.
तेव्हा मेजर बोलले, "रमा, मी हे सगळं तुझ्या सुखासाठी केलं गं." असं सांगून त्यानी आपलं तिच्यावर प्रेम आहे हे स्पष्ट केलं. रमा ही ते जाणून होती. तिचं ही त्यांच्यावर प्रेम बसलं होतं.
एक संसारिक बाई एवढ्या वयात, नवरा सोबत असताना, परपुरुषा बद्दल असे विचार करते हे तिला कसंस वाटत होतं. पण प्रेम ते प्रेम असतं. ते काळ, वेळ, वय, परिस्थिती काही पाहत नसतं. उतार वयात एकमेकांना सहारा देणारे प्रेम मिळायलाच हवं. नवरा म्हणून सुरेशवर तिचे प्रेम होतेच, पण म्हातारपणात तिलाही साथ सहारा हवाच होता. तो मेजरमुळे मिळाला होता. कशाला उद्याची बात अन् कशाला जगाची पर्वा म्हणून रमा स्वप्नाच्या दुनियेत रमली.