बाँडींग - नाते तुझे माझे
बाँडींग - नाते तुझे माझे
आपल्या जीवनात नाती अनेक असतात.. काही नाती असतात रक्ताची तर काही हृदयाची.. आपण सगळेच वेगवेगळ्या नात्यांचे पदर जपत असतो प्रत्येक नात्याचं महत्त्व आणि आपल्या जीवनातील स्थान वेगळ असतं .. 'स्वभाव' पण सगळ्यांचे वेगळे असतात पण त्या वेगळेपणातही एकमेकांना जोडून ठेवणारी लिंक म्हणजे "संवाद "...संवाद सातत्याने आणि पुरेसा व्हायला हवा तरच नाती टिकतील संवाद संपला की नातं थांबतं म्हणूनच बोलून बघायचं असतं, आपलं नातं हरवलं असं जर वाटत असेल तर ते पुन्हा शोधायचं असतं.. जरा चुकीचे, जरा बरोबर काहीतरी आयुष्यावर बोलायचं असतं...
गोडवा असावा नात्यात नात्यातल्या संवादात हास्याची उधळण करणारा नातं घट्ट रुजवणारा..
मला बहिणीबहिणीचं नात खूप आवडतं. या नात्यात एक वेगळेपण तर आहेस पण दोन स्त्री मनाची भावनिक गुंतागुंत देखील आहे , आजच्या धावपळीच्या युगात कोणाजवळ रिकामा वेळ नसतो पण आजही आमचं बहिणीचं नातं पूर्वीसारखं कायम आहे .. आज करमणुकीची अनेक साधने आहेत पण आपल्या बहिनी सोबत साधलेले संवाद, खेळलेले खेळ, मांडलेले डाव यातील सुख माझ्यासाठी अत्यंत मोलाचं आहे..
अशीच एक आठवण... मी लहान असतानाची... बहिणीसोबत मनमुराद जगणं, निष्पाप बोलणं आज आठवलं...ताईचा वाढदिवस असल्यामुळे बाबांनी तिच्यासाठी सुंदर असा ड्रेस आणला माझ्यासमोर तिला तो ड्रेस देऊन तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुद्धा केला.. बालमन असल्यामुळे मला ते फारसे काही आवडले नाही. ताई साठी सुंदर ड्रेस माझ्यासाठी का? काही नाही असे विचार चक्र डोक्यात चालू होते ... माझं ताई सोबत छोटेसे भांडण पण झाले, रुसणं, रागवणं, चिडचिड सगळं कसं ठरल्याप्रमाणे पार पडले..आणि शेवटी आला तो अबोला... ताई समजदार असल्यामुळे तिच्या हे सर्व लक्षात आलं..
इयत्ता चौथीमध्ये माझा निबंध स्पर्धेत वर्गातून प्रथम क्रमांक आला असल्यामुळे माझी लिहिण्याची असलेली आवड, रंगीत पेन जमा करण्याची माझी सवय तिला चांगली माहिती होती.. माझा अबोला, रुसवा-फुगवा दूर करण्यासाठी तिने मला सुंदर पेन भेट केला.. मी एक क्षण न थांबता कटटीची दो केली, चैतन्याच्या मुक्ती नभी मनाच्या पतंगाने स्वच्छंद उडावे असे त्यावेळी वाटले.. तिने स्मितहास्य करून दिलेला पेन माझ्यासाठी खूप अनमोल होता त्याक्षणी सर्व विसरून मी तिला घट्ट मिठी मारली संवाद सुरू झाला आणि शब्द फुलत गेले भाव वेड्या भावनांनी जसे नवीन काव्य तयार केले ... माझ्यासाठी आईने काढून ठेवलेला खाऊ तिला देऊन तिचे थोडे कौतुक किमी केले ,आई-बाबांनी तिला सांगितलेले काम काही दिवस मी केले .. शाळेतून घरी परतल्यावर तिच्यासोबत अंगणात खेळता-खेळता मुद्दाम मी हरले ताई त
ू खूप छान आहेस असे म्हणून तिचे मी आभार पण व्यक्त केले .... नात्यातले तिचे नि माझे "बाँडींग" खरंच तेव्हा आणखी मजबूत झाले...
काळ पुढे सरसावला... माझं लग्न झालं.. आपल्या छोट्या बहिणीचे लग्न व्यवस्थित रित्या पार पडावं यासाठी आई-बाबांचं कर्तव्य सुद्धा तिने निभावलं .. बहिणी बहिणींच्या नात्यात देण्याघेण्याच्या व्यावहारिक नात्यापलीकडच एक निरंतर सुख आहे आणि आश्वासक भाव बंद आहे हे त्यावेळी जाणवलं... एकमेकांच्या अतूट भाऊबंदामुळे , विश्वासामुळे नात्यातलं "बाँडींग " वाढत हे तेव्हा समजलं...
काही दिवसांनी माहेरी आलेल्या या छोट्या बहिणीला तिने प्रेमाने जवळ घेतलं खरंच 'आई' आणि 'ताई' किती समान वाटतात हे दोन शब्द ...'आई ' या शब्दाच सगळं पावित्र्य ,मांगल्य अगदी समरसून उतरतंय ताई या शब्दात तेव्हा मला कळलं.. तिच्या आधाराने जीवन जगणं किती सोपं झालं हे तिला सांगायचं राहून गेलं ..
खूप आठवणी होत्या मनात... आज सांगायचं मनात ठरवलं.. ती समोर येताच प्रथम तिला मिठी मारली, "ताई", तुला काहीतरी सांगायचं".
"सांग ना."नेहमीप्रमाणे शब्द रुपी कवितेत सांगायला मी सुरुवात केली ...
' हे माझे अहोभाग्य ,जी तुझ्यासारखी ताई मला लाभली ..
जी देते मला सदोहित मायेची, जिव्हाळ्याची सावली..
ताई तुझ्या मायेची पखरण माझ्यासाठी जसे सुवासिक शीतल चंदन... कठीण समयी राही सदैव तू माझ्या पाठीशी, समजावणी चा सूर तुझा साथ देईन मज जीवनाशी. एवढीच इच्छा तुझ्या मायेची पखरण अशीच राहो माझ्यावर ..माझ्या शुभेच्छांची सावली नेहमीच राहील तुझ्यावर ..मी काय देणार तुला तू सर्वस्व दिले मला, आजचा क्षण अगदी खास झाला ग माझ्यासाठी म्हणूनच शब्दफुले मी आणली ताई केवळ तुझ्यासाठी. ताई माझ्याकडे बघतच होती कदाचित आपण दिलेल्या पेनाची आठवण तिला जणू येत होती.. तिचे आनंदअश्रू डोळ्यांना तिला सुखावत होते ..माझे बोलणे चालूच होते..
दिवाळीत लावलेल्या पणत्या पाहतांना एका ओळीत बसलेल्या बहिणी दिसतात ..संयमाने जळणारी तेलवात आणि तो मंद प्रकाश किती खराखुरा सात्विक सुखमय साऱ्या अंधाराला घालवणारा सत्याचा प्रकाश अन् दोन बहिणींच्या अंतर मनातला गोड संवाद ... हा शब्दप्रपंच ताई तुझ्यासाठी असं बोलून त्यावेळी मी तिचे आभार व्यक्त केले तिच्या प्रती असलेली ओढ, माझ्यासोबत तिने घालवलेले सुखाचे क्षण तिच्या मनाला सुखावून गेले ... आमच्या नात्यातलं बाँडीग आहे अजूनही किती मजबूत ते क्षण सारे सांगून गेले...
माझ्या अशा कर्तृत्वदक्ष ताईला आजही बिलगून आहे माझं मन.. तिच्या गोड सहवासाला माझे आहे हे शाब्दिक समर्पण...