बाळा... आई काम करतेय ना…
बाळा... आई काम करतेय ना…
“बाळा...आई काम करतेय ना..”…हे वाक्य प्रशांतच्या कानावर पडलं आणि त्याने सहजच मागे मान वळवून बघितलं, तर ग्राउंड साफ करणारी एक तिशीतली बाई आपल्या कट्ट्यावर बसलेल्या पाच सहा वर्षाच्या मुलाला झाडता झाडता एकीकडे सांगत होती. तो छोट्या त्याच्या आईकडे काहीतरी हट्ट करत होता…
हे वाक्य ऐकलं आणि प्रशांतला गेल्या आठ-दहा दिवसात घडलेले चार-पाच प्रसंग पटापट डोळ्यासमोर आले..
घरी काम करायला येणाऱ्या सुरेखाबाई परवा भांडी घासत होत्या आणि अचानक त्यांचा मोबाईल वाजला... त्यांनी पटकन हात पुसून फोन घेतला. त्यांची सहा-सात वर्षाची मुलगी बहुदा पलीकडून बोलत असावी आणि त्या तिला समजून सांगत होत्या..”अगं सोनू थोडं थांब ना.. मी आता थोड्यावेळात आलेच…तुझी आई कामाला आली आहे ना बाळा.. ”…
मागच्या आठवड्यात प्राचीला ऑफिसमधून येण्यास उशीर होणार होता, म्हणून संध्याकाळी प्रशांत पोळीभाजी केंद्रावर गेला होता. ऑर्डर दिली आणि दुकानातल्या बाईंनी भाजी भरायला घेतली, तेवढ्यात तिथे असलेला त्यांचा छोटा मुलगा धावत आईकडे जाऊन..तिचा पदर ओढत.. “आई ही गोष्ट जरा वाचून दाखवा ना..” म्हणून हट्ट करू लागला....त्या बाईंनी पिशवीत भाजी भरतच एकीकडे त्याला समजावत म्हणाल्या...“अरे राजा.. दोन मिनिटं थांब ना... आईला भाजी भरू दे ना.. तुझी आई कामात आहे ना…”
कालच्या रविवारी, प्रशांत बरेच दिवसानंतर सुनीलच्या घरी सहज गप्पा मारायला गेला होता. कोचावर सुनीलची बायको सुमेधा लॅपटॉप बसून काहीतरी काम करत होते...त्याचा मुलगा सोहम इकडे तिकडे फिरत हातातल्या मोबाईलशी खेळत होता..त्याला मोबाईल मध्ये काहीतरी दिसले आणि तो सुमेधाला दाखवण्यासाठी तिच्याजवळ गेला... सुमेधाने लॅपटॉप मधून मानवर न करतच त्याला म्हणाली…”पिल्लू थोडावेळ थांब ना...दिसते ना तुझी आई काम करतेय…”.
बेबीसिटींग मध्ये होमवर्क करत बसलेल्या चौथीतल्या अथर्वला, माझा आवडता मित्र या विषयावर आज शाळेत निबंध लिहून आणायला सांगितला होता. काय लिहावे त्याला सुचत नव्हते म्हणून त्याने तिथल्या काकूंना आईला जरा फोन लावून देण्यास सांगितले. अक्षदा नुकतीच मीटिंगसाठी प्रशांतच्या केबिनमध्ये आली होती आणि तेव्हढ्यात तिचा फोन वाजला.. काकूंचा फोन बघितल्यावर तिने लगेच उचलला.. तर पलीकडून अथर्व आईला मी
निबंध कसा लिहू विचारू लागला... “अरे राजा.. तुझी आई ना आता खूप महत्त्वाच्या कामात आहे... मी ना तुला थोड्या वेळात फोन करते..” असं म्हणून अक्षताने फोन कट केला..प्रशांतने थोड्याशा उत्सुकतेने तिला विचारलं.. की काय झालं.. आणि तिने थोडेसे आढेवेढे घेतच प्रशांतला काय झालं ते सांगितलं…
आज…”बाळा आई जरा काम करतेय ना..”. हे वाक्य ऐकलं आणि हे सारे प्रसंग प्रशांतच्या डोळ्यापुढे आले.. त्याच विचारचक्र सुरु झालं...आई आणि मुलाचं नातं….मुलांचं भावविश्व...आपल्या हक्काचा माणूस...त्यांचं एकमेकांवर असणारं निरपेक्ष प्रेम,अपार विश्वास..हे सारं पुन्हा एकदा अधोरेखित झालं…
आई..मग ती कोणतीही असो..ती सफाईकामगार..घरकाम करणारी बाई..स्वयंपाकिण.. एक्झिक्यूटिव्हऑफिसर किंवा अन्य कोणीही असली.. तरी तिच्या सोनू, पिल्लू, राजा, छकुल्या, बाळा, या सर्वांसाठी ती फक्त आणि फक्त त्यांची हक्काची आईच असते…त्या लहानग्यांना ती काय काम करते, त्याच महत्त्व.. काय..किती..याच्याशी काहीही घेणंदेणं नसतं.. पण…
..मी कामात आहे हे एक वाक्य ऐकलं की….त्या लहानग्यांना काय वाटत असेल?...त्यांचा क्षणिक भ्रमनिरास तर नक्कीच होत असणार ..आपल्या बालसुलभ स्वभावाने ते आपला जीव दुसरीकडे रमवत असावेत... पडलेल्या प्रश्नांचे उत्तर आपल्या परीने शोधत असावेत…खरंच.. असं असेल ना.?. का... ते वेगळच काही विचार करत असतील?
तिकडे त्यांच्या आईला मात्र, आपण आपल्या मुलाला वेळ देऊ शकत नाही याची टोचणी नक्कीच लागत असणार…आपण हे सारं करतोय, ते आपल्या बाळाच्या भविष्यासाठीच ना.. पण त्यांना ते कसं कळणार.. कसं सांगणार...आपण हाती घेतलेल्या कामांमुळे आज आपल्या छोट्याला हवा असलेला क्षण आपण देऊ शकत नाही, याची चुटपुट तिला नक्कीच वाटत असणार...आणि याच तिच्या मानसिक अवस्थेमध्ये तिच्याकडून कामामध्ये जर काही छोट्या-मोठ्या चुका झाल्या तर...त्याला खरोखर ती जबाबदार आहे का ?...की परिस्थिती….? असे असंख्य प्रश्न प्रशांतच्या मनात घोंगावू लागले.
अशा अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तर शोधत असताना…”अंकल, तो जरा बॉल द्या ना..”. या ग्राउंडवर खेळत असलेल्या एका छोट्या मुलाच्या हाकेने प्रशांत मानसिक द्वदामधून बाहेर आला..