The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Suhas Belapurkar

Drama Romance

4  

Suhas Belapurkar

Drama Romance

छापा-काटा

छापा-काटा

7 mins
23.9K


अंधेरीची क्लाइंट मिटींग संपवून बाहेर पडताच समीरने बॉसला फोन केला. झालेल्या मीटिंगचे ब्रिफ करून “नरिमन पॉइंटला,ऑफिसला पोचायला जवळपास साडेपाच होतील,आता चेंबूरला घरीच जातो” समीरने बॉसला सांगितलं.फारसे आढेवेढे न घेता बॉसनेही त्याला होकार दिला व पुढच्या आठवड्यातील अपॉइंटमेंट, प्रेझेंटेशनची तयारी करून ठेव म्हणून सांगितलं.


नवीन घेतलेली होंडासिटी पार्किंग मधून बाहेर काढतच समीर तीन दिवसाच्या लॉंग वीकेंडला काय करता येईल याचा विचार करु लागला. तसेही या वीकेंडला रागिणी तिच्या आई-बाबांना घेऊन खंडाळाला जाणार होती. रागिणीचा विचार मनात येताच समीरला त्याची व रागिणीची एनएम कॉलेजमध्ये झालेली पहिली भेट आठवली. समीर एमबीए फायनान्सला तर रागिणी एमबीए एचआरला होती. कॉलेजमधल्या एका सेमिनारमध्ये त्यांची पहिली ओळख झाली होती.पुढे वेगवेगळ्या निमित्त्याने त्यांच्या कॉलेजमध्ये मधील भेटी वाढत गेल्या. सीएमॅक्स कॅपिटल ही मल्टिनॅशनल कंपनी कॅम्पस रिक्रूटमेंटसाठी आली होती. समीर व रागिणी दोघांचेही अकॅडमिक बॅकग्राऊंड,परफॉर्मन्स यावर त्यांच सीएमएसमध्ये सिलेक्शन झालं..गेल्याच आठवड्यात दोघांनाही सीएमॅक्समध्ये दोन वर्षे पूर्ण झाली होती. कॉलेजपासूनची मैत्री व सीएमॅक्स मधील सहवास यामुळे रागिणी आणि समीर एकमेकांच्या खूप जवळ आले होते. त्यांचा वीकेण्ड, ऑफिसनंतरचा वेळ एकत्र जाऊ लागला. आपल्या प्रेमाचा रूपांतर आता लग्नात झालं पाहिजे यावर दोघांचे एकमत झालं होतं. पण घरच्यांना कसे समजावयाचे. कारण आपला हा विचार आपले आई-वडील कशा प्रकारे घेतील.. हे त्या दोघांनाही समजत नव्हतं. म्हणूनच रागिणीने या लॉन्ग-विकेंडची संधी घेऊन आई-वडिलांना खंडाळ्याला नेण्याचा विचार केला..व तेथेच त्यांच्याशी बोलूया असं ठरवलं..समीरलामात्र या विषयावर आपण आई-बाबांशी कसं बोलावं हे काही सुचत नव्हतं. अचानक समीरने विचार केला, की आपणही आई-बाबांना, आपल्या कॉलेजमधील बहिणीला-सारिकाला घेऊन दोन-तीन दिवस या वीकेंडला बाहेर जाऊया. तसंही गेल्या तीन-चार वर्षांमध्ये संपूर्ण कुटुंबाच एकत्र बाहेर जाणं झालं नव्हतं. बीकेसीच्या सिग्नलला गाडी थांबताच स्टेरिंगवर बोटं नाचवत समीरचा विचार पक्का झाला.


दारावरची बेल वाजताच, नुकत्याच कॉलेजमधून आलेल्या सारिकाने दार उघडलं...“अरे दादा.. एवढ्या लवकर ऑफिसमधून... आई-बाबा बघा... दादा लवकर आलाय..” सारिकाचा आवाज ऐकून आई-बाबा दोघेही हॉलमध्ये आले. कोचावर लॅपटॉपची ठेवून समीरने तिथेच पाय पसरले व सारिकाला म्हणाला..“चला आता तीन दिवस सुट्टी..” “तुला पण कॉलेजला सुट्टी असेल ना?.”. सारिका हो म्हणाली.”. चला तर मग.. आपण सगळेच तीन दिवस मुंबईच्या बाहेर फिरायला जाऊया “...समीर म्हणाला. आई-बाबा, सारिका या तिघांच्याही चेहर्‍यावर एकदम आश्चर्य उमटलं.. “अरे समीर... काय झालं तुला...असा अचानक फिरायला वगैरे काय?”...आईने विचारले.. “अग आई..बरेच वर्षात आपण कुठे गेलो नाही..आता लॉंग-वीकेंड आला आहे, तर चला..आपण दोन-तीन दिवस बाहेर जाऊन येऊ या”.. समीर म्हणाला. समीरच्या आईने बाबांकडे बघितलं, त्यांनी डोळ्यानेच आईला होकार दिला..” बर ठीक आहे”.. आई म्हणाली. ..“दादा पण कुठे जायचं?.. आपण खंडाळ्याला जाऊया का?.. माझ्या मैत्रिणीचा तिथे एक रिसॉर्ट आहे..बरेच वेळा तिने मला सांगितलं होतं की तुम्हाला कधी जायचं असेल तर मला सांग... चला..आपण खंडाळ्याला जाऊया. मी तिला विचारते..” सारिकाने खंडाळा म्हणताच समीरच्या पोटात गोळा झाला.. “त्यापेक्षा आपण इगतपुरीलां, मानसला जाऊया का?” समीरने सुचवले..


लहानपणापासून समीर-सारिकाचे जेव्हा एकमत होत नसे तेव्हा ते छापा-काटा करत...सारिकाला आठवले आणि म्हणाली..“चल..आपण छापा-काटा करू... छापा-खंडाळा... काटा-इगतपुरी”....समीरला काही बोलायची संधी द्यायच्या आतच तिने कॉइन उडवले आणि म्हणाली “छापा....छापा आला.....चलो खंडाळा”... सारिका ओरडली.. समीरपुढे काहीच पर्याय नव्हता..पटापट आवरून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत खंडाळ्याला निघायचं ठरलं...सारिकाने लगेच मैत्रिणीला फोन करून आम्ही चौघेजण तुझ्या व्हॅली रिसॉर्टला आठ वाजेपर्यंत पोहोचतो व आमच्यासाठी एक सूट ठेव असं सांगितलं.. 


खंडाळापर्यंत ड्राईव्ह करत असताना समीर स्वतःच्या मनाला सारखं बजावत होता सर्व काही ठीक होईल... गाणी ऐकत, गप्पा मारत खंडाळापर्यंतचा प्रवास कसा झाला ते कळलच नाही. व्हॅली रिसॉर्टमध्ये चेक-इन करून सगळेजण आपल्या रूमवर गेले व लगेच पंधरा-वीस मिनिटात डिनरला रेस्टॉरंटमध्ये आले. रेस्टॉरंट्च दार उघडताच समोर बसलेल्या रागिणी व तिच्या आईबाबांना बघून समीर जागच्याजागी उडाला. रागिणीचेही समीरकडे लक्ष गेलं आणि चमच्यातला घास तसाच धरून ती समीरकडे बघत राहिली...काही क्षणात दोघे भानावर आले. समीर आपल्या फॅमिलीला घेऊन रागिणी पासून 2 टेबल सोडून बसला. छान गप्पा मारत बसलेली रागिणी अचानक गप्प का झाली हे तिच्या आई-बाबांना समजले नाही. इतक्या वेळ आपल्याबरोबर हास्यविनोद करणारा समीर, एवढे छान जेवण- छान रेस्टॉरंट सगळं असूनही अचानक गप्प झालाय, आपल्याशी तुटक-तुटक बोलतोय हे त्याच्या आई-बाबांना आणि सारिकाच्याही लक्षात आलं.. जेवताना समीर डोळ्याच्या कोपऱ्यातून सतत रागिणीकडे बघतोय, रेस्टॉरंटमध्ये आल्यानंतरचा बदल.. हे सर्वकाही चाणाक्ष सारिकाने टिपलं होतं...जेवण झाल्यावर ते रूममध्ये आले तेव्हा समीरचे बाबा म्हणाले “चला आपण बाहेर चक्कर मारूया..थोडीशी शतपावली होईल...”.... “तुम्ही जाऊन या, मला थोडंसं ऑफिसचे काम करायचे आहे”..असं सांगून समीरने बाहेर जाणं टाळलं. इकडे रागिणीची आईही म्हणाली “आपण जरा चक्कर मारुन येऊया”... पण तुम्ही दोघं चक्कर मारून या, मी रूमवर थांबते”..असे म्हणून रागणीनेही बाहेर जाणं टाळलं. आई-बाबा बाहेर गेल्याबरोबर समीरने लगेच रागिणीला फोन केला व तिला पटापट संध्याकाळपासून काय झालं ते सगळं सांगितलं.. अनपेक्षितपणे आपण एका वेगळ्याच संकटात कसे अडकलो याचं दोघांनाही आश्चर्य वाटलं..आता पुढचे दोन तीन दिवस कसे काढायचे यावर ते विचार करू लागले.


रिसॉर्टभोवती चक्कर मारता मारता अचानक सारिकाचे लक्ष समोरून येणाऱ्या रागिणीच्या आई-बाबांकडे गेलं. जेवताना तिने त्यांना रेस्टॉरंटमध्ये बघितलं होतं. एक थोडसं परिचित स्माईल तिने रागिणीच्या आईला दिल. रागिणीची आईपण तिच्याकडे बघून हसली. थोडसं जवळ येताच सारिकाने त्यांच्याशी आपल्या मैत्रिणीचा हा रिसॉर्ट, आजूबाजूचा परिसर, येथील छान जेवण, याच्यावर थोडसं बोलायला सुरुवात केली..बोलता-बोलता आपल्या आई-बाबांचा परिचयही करून दिला. “माझा भाऊ, समीरही आलाय...पण तो रुमवर बसुन ऑफिसचं काम करतोय,” तिने रागणीच्या आईला सांगितलं. “समीर कुठे कामाला आहे?” रागिणीच्या वडीलांनी विचारलं.. “तो सीएमॅक्स मध्ये फायनान्स मॅनेजर.. नरिमन पॉइंटला हेडऑफिस मध्ये…” सारिकाने सांगताच...रागिणीचि आईही पटकन म्हणाली, “आमची रागिणीपण सीएमॅक्समध्ये नरिमन पॉइंटला एचआर मॅनेजर आहे...एनएम मधून एमबीए केल्याबरोबर कॅम्पस सिलेक्शन झालं... तीही येथे आली आहे व रूमवर आहे..”.. रागिणीच्या आईने सांगितल्यावर, हे दोघेही एका ऑफिसमध्ये-एकाच कॉलेजमध्ये असूनही त्यांनी मघाशी समोर आल्यानंतर एकमेकांना ओळख दाखवली नाही आणि अचानक दोघे गप्प का झाले याचा सगळेजण आपल्या मनात विचार करू लागले.


चक्कर मारून रूमवर परत आल्याबरोबर समीरचे आई-बाबा आणि रागिणीचे आई-बाबा यांनी समीर व रागिणीला काय झालं ते सांगितलं.. पण अनपेक्षितपणे आलेल्या प्रश्नांना, आपल्या आई-बाबांना काय उत्तर द्यावं ते रागिणी आणि समीरला समजल नाही. समीर व रागिणीची नजर, एकंदरच आपल्या प्रश्नांना उत्तर देण्याची टाळाटाळ, यावरून त्यांना थोडासा संशय येतो व काहीतरी वेगळं प्रकरण आहे असं वाटतं. “उद्या सकाळी आपण ब्रेकफास्टला रेस्टॉरंटमध्ये नऊ वाजता सगळे एकाच टेबलवर बसूया.”..समीरचे बाबा रागिणीच्या वडिलांना हळूच इंटरकॉमवरून सांगतात..दुसऱ्या दिवशी सकाळी रागिणी व समीर दोघेही ब्रेकफास्टला यायच्या आधीच हे सगळेजण एका टेबलावर बसलेले असतात..आपल्या दोन्ही कुटुंबांना एकत्र एका टेबलावर गप्पा मारत बसलेले बघून रागिणी आणि समीरला आश्चर्य वाटतं, पण तसं न दाखवता तेही जॉईन होतात.. समीर, रागिणीची आपल्या आई-वडिलांना व रागिणी, समीरची आपल्या आई-वडिलांना औपचारिक ओळख करून देते.. ब्रेकफास्ट करत असताना...“आजचा दिवस आपण सर्वजण एकत्र घालवूया...औटींग, डिनर सर्वकाही ...” समीरच्या बाबांची सजेशन सर्वांनाच आवडते. रागिणी व समीरपण त्याला दुजोरा देतात. संपूर्ण दिवस एन्जॉय करून रात्री डिनर झाल्यानंतर “उद्या सकाळी आपण नऊ वाजता ब्रेकफास्टला रेस्टॉरंटमध्ये भेटूया, गुड नाईट” ..”उद्या संध्याकाळी मुंबईला परत निघायचं, त्यामुळे आणखीन थोडा वेळ आपण एकत्र घालवूया.” समीरच्या बाबांना रागिणीचे वडील “ओके..ठीक आहे.. ..गुडनाईट” म्हणतात. 


दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्टला रागिणी व समीर दोघेही एकमेकांच्या समोर बसतील अशाप्रकारे सर्वजण बसतात. ब्रेकफास्ट संपता-संपता, गप्पा रंगात आल्या असताना, अचानक समीरचे वडील रागिणीला विचारतात “काय रागिणी, आमच्या घरची सून व्हायला आवडेल का?”..अचानक आलेल्या या प्रश्नाने रागिणी पुरती गांगरून जाते आणि प्रश्नार्थक नजरेने समीरकडे व आपल्या आई-वडिलांकडे बघते..काही क्षणातच रागिणी व समीरला सर्वकाही कळून चुकत..“मी काय विचारले रागिणी..?” समीरचे बाबा पुन्हा एकदा विचारतात आणि ती पटकन “चालेल”.. असं म्हणत समीरकडे बघते..” समीर रागिणीचा हात हातात घेतो...आणि हास्याचा एकच स्फोट होतो.


समीरच्या बाबांनी एंगेजमेंटसाठी एक छोटा बँक्वेट बुक करून ठेवलेला असतो. रागिणीने हो म्हटल्याबरोबर ते डिक्लेअर करतात..“आज दुपारी तुमची इंगेजमेंट फोलोड बाय लंच”...“तुमच्याकडे तीन तास आहेत.. पटापट तयारीला लागा..” समीर आणि रागिणीला आणखीन एक धक्का...गेल्या दोन दिवसात एकामागोमाग एक बसलेल्या धक्क्क्यांचा हा क्लायमॅक्स…


काही क्षणात गेल्या दोन दिवसातला घटनाक्रम समीरच्या डोळ्यासमोर पटापट सरकू लागतो आणि पहिल्यांदाच छापा-काटा करताना आपण हरल्याचा त्याला आनंद होतो. तो पटकन उठतो आणि सारिकाला मिठी मारतो.. “थँक्यू सारिका..यावेळी छापा-काट्यांमध्ये तू जिंकलीस त्यामुळेच हे सगळं घडलं...पण आता यापुढे आपला छापा-काट्याचा खेळ बंद”... सारिकाही त्याला हसून “हो म्हणते.


Rate this content
Log in

More marathi story from Suhas Belapurkar

Similar marathi story from Drama