न शिकलेल्या मुंग्यांची शिस्त
न शिकलेल्या मुंग्यांची शिस्त


“अरे सुजय, काय करतोस.. आटोपलं का तुझं... चल लवकर, आपल्याला मामाकडे जायचंय”.. नंदिनी हात पुसत हॉलमध्ये येऊन बघतेतो छोटा सुजय जमिनीवर पालथा पडून एकटक मुंग्यांच्या रांगेकडे बघत होता.. एकामागोमाग एक लाइनित चाललेल्या मुंग्या जमिनी व भिंतीच्यामध्ये असलेल्या छोट्या भोकातून गायब होत होत्या... सुजयची एवढी एकाग्रता पाहून नंदिनी मनाशीच हसली व हळूच त्याला प्रेमाने चापट मारत म्हणाली, “चला .. उठा.. आटपा लवकर.. उशीर होईल”..
दोघांच आवरून नंदिनी सुजयला घेऊन बसस्टॉपवर आली. छोटा सुजय आईचे बोट धरून बसस्टॉपवर उभा होता. एवढ्यात बस आली. बस तशी रिकामीच होती, तरीही आजूबाजूची सर्व माणसं बसच्या छोट्याच्या दारातून एकमेकांना ढकलून बसमध्ये चढत होती. सगळेजण चढल्यावर नंदिनीपण सुजयला घेऊन बसमध्ये बसली.
खिडकीतून बाहेर बघत असताना सुजयच्या इवल्याशा मेंदूत विचारांचे थैमान सुरू झाले. कोणीही न शिकवता त्या मुंग्या एवढ्याशा छोट्या भोकातून किती शिस्तीने एकामागून-एक पटापट आत जात होत्या. कुठे ढकलाढकली नाही... की रेटारेटी नाही.. आणि ही बसमधली माणसं ... ही तर सगळी शिकलेली दिसतायेत.. मग या दोघात हुशार कोण ?..
“नेक्स्टस्टॉप.”. म्हणत कंडक्टरच्या बेलने सुजयची तंद्री भंगली.. बस थांबली.. आणि पुन्हा असंख्य शिकलेल्या मुंग्या बसच्या छोट्या दारातून एकमेकांना ढकलून कशा चढतात ते सुजय खिडकीतून एकटक बघू लागला...