भयाण शांततेतून - जागतिक शांततेकडे
भयाण शांततेतून - जागतिक शांततेकडे
करोनाच्या एका सूक्ष्म विषाणूने संपूर्ण जगाला काही काळातच एका अकल्पित, अविश्वसनीय वाटणाऱ्या देशो-देशीच्या सीमा, जात-पंथ, वर्ण, भाषा, धर्म, गरीब- श्रीमंत असा कुठलाही भेदभाव न करता सर्वांना एकाच पातळीवर आणले. संपूर्ण जगात एक भीषण-भयाण शांतता पसरली. पृथ्वीतलावरील प्रत्येक माणसाची फक्त आणि फक्त जिवंत राहण्यासाठी केविलवाणी धडपड सुरू झाली. शेवटी सर्वांना, फक्त माणुसकी हीच सर्वश्रेष्ठ असल्याचा साक्षात्कार होऊ लागला.
गेल्या काही दशकांमध्ये प्रत्येक देशांमध्ये, समाजामध्ये आपापसातील वैरभाव पराकोटीला पोहोचला होता. वर्चस्वाच्या स्पर्धेने टोक गाठले होते. धर्मांधता दिवसेंदिवस वाढत चालल्याने दहशतवाद प्रत्येक देशांमध्ये बळावत चालला होता. आधुनिक शस्त्रांच्या जोरावर, धर्माच्या नावावर काही देश आपला भूभाग वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न करत होते. तीव्र स्पर्धेमुळे देशादेशांमधील ताणतणाव प्रचंड ताणले होते. जगावर निरंकुश सत्ता स्थापन करण्यासाठी, प्रसंगी जग बेचिराख करण्याची क्षमता असलेली संहारक शस्त्रे, आण्विक क्षेपणास्त्रे तयार झाली होती.
करोनानामक विषाणूने संपूर्ण जगाला वठणीवर आणले. प्रत्येक देशाने स्वतःला जगापासून वेगळे केले. आपल्या सीमा बंद केल्या. जगातील प्रत्येक देशांमधील माणसांनी स्वतःला आपापल्या घरांमध्ये कोंडुन घेतले. कारण करोना या विषाणूंचा सामना कसा करायचा याचा उपाय कोणाकडेच नव्हता.
माणसाच्या पराकोटीच्या अहंकाराची निसर्गाने संपूर्ण जगाला दिलेली ही एकप्रकारे शिक्षाच..किंवा.. सुधारण्यासाठी दिलेली एक संधी…
पृथ्वीवरील माणसाचे अस्तित्व त्याने चांगल्या प्रकारे जगण्यासाठी दिलेली ही कदाचित शेवटची संधी.. निसर्गाकडून, पशु-पक्षांकडून पुन्हा एकदा नव्याने शिकण्याची दिलेली संधी..
निसर्गापुढे मानव किती शूद्र आहे हे त्याला दाखवण्याची एक संधी…
निसर्गाला शरण जाण्यासाठी दिलेली एक संधी..
यातून अखंड मानवजात काहीही शिकली नाही तर कदाचित ही संधी आपण कायमची गमावून बसू...म्हणतात ना..संधी फक्त एकदाच येते. त्याचा सदुपयोग केला तर मानव जातीच्या पुढील कित्येक पिढ्या शांततेने जीवन जगतील व आपणा सर्वांना दुवा देतील. आपणही निसर्गाने दिलेल्या या संधीचा चांगला उपयोग केला तर तोही आपल्याला आणखीन भरभरून देईल. या संधीचं सोनं करायचं कि माती हे फक्त आणि फक्त या भूतलावरील प्रत्येक मानवाच्या हातात आहे... जो स्वतःला अतिशय बुद्धिमान, विचारी व श्रेष्ठ समजतो... ज्याची सर्व कवचकुंडलं आज गळून पडली आहेत व हतबलतेने त्याने शरणागती पत्करली आहे..
या अकल्पित परिस्थितीतून बाहेर येऊन मानवाने जागतिक शांतता प्रस्थापित करण्याची वाटचाल सुरू केली तरच निसर्ग त्याला माफ करेल.