एलेक्सा आजी
एलेक्सा आजी


“आपल्या संस्थेचे आज समाजामध्ये जे स्थान आहे त्यामध्ये आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता दांडेकर यांचा खूप मोलाचा वाटा आहे. त्यांनी गेल्या तीस-चाळीस वर्षात तयार केलेली अनेक हुशार मुलं आज जगभरात विविध क्षेत्रांमध्ये उच्च पदावर काम करत आहेत. आज सौ. अनिता दांडेकर या सेवानिवृत्त होत आहेत. आपल्या सर्वांच्या वतीने शाळेच्या व संस्थेच्या वतीने मी त्यांच्या योगदानाबद्दल आभार मानतो व त्यांना उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा देतो.” जीएस संस्थेचे अध्यक्ष श्री. बापट यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताच तुडुंब भरलेल्या हॉलमधील आजी-माजी विद्यार्थी सहकारी शिक्षक संस्थांचे पदाधिकारी यांनी टाळ्यांच्या कडकडाटात मुख्याध्यापिका सौ. दांडेकर यांना उभे राहून मानवंदना दिली. जवळजवळ दोन मिनिटं दांडेकर बाई स्टेजवर उभ राहून, हात जोडून त्याचा स्वीकार करत होत्या व त्याचवेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या.
निरोप समारंभ संपून गाडीतून परत येत असताना दांडेकर बाईंना त्यांचा पस्तीस चाळीस वर्षांचा एक शिक्षिका- विद्यार्थीप्रिय शिक्षिका-आदर्श शिक्षिका ते पंधरा वर्षे मुख्याध्यापिका हा सर्व प्रवास डोळ्यासमोरून सरकू लागला. दांडेकर बाईंनी १९७८ ला जीएस माध्यमिक शाळेत मराठी व इंग्रजी हे दोन विषय शिकवण्यास सुरुवात केली. दोन्ही भाषांवर त्यांचे चांगलेच प्रभुत्व होते. तसेच त्यांना संस्कृत अतिशय उत्तम येत होते. इतिहास भूगोल समाजशास्त्र व गणित हेही त्यांच्या आवडीचे विषय त्यामुळे हळूहळू त्याचाही सखोल अभ्यास करून दहा वर्षांमध्ये त्या सर्व विषय वेगवेगळ्या वर्गांना शिकवू लागल्या. सायन्स, ड्रॉईंग याव्यतिरीक्त सर्व विषय शिकवणाऱ्या त्या शाळेतील एकमेव शिक्षिका होत्या. त्यांचे वाचन अफाट असल्याने त्या सर्व विषयांवरच्या चर्चांमध्ये सहज सहभागी होत. साधारण 90-92 च्या सुमारास जसजसे संगणकाचे महत्व वाढायला लागले तसे त्यावेळी उपमुख्याध्यापिका झालेल्या दांडेकर बाईंनी शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी संगणकाचे स्वतंत्र वर्ग चालू केले. त्या स्वतःही संगणक शिकल्या व अगदी सहजपणे वापरू ही लागल्या.
शाळेतील सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांना नेहमी आश्चर्य वाटायचं की कुठलीही नवीन गोष्ट दांडेकर बाई किती पटकन आत्मसात करतात. बऱ्याचदा फ्री पिरेड असला की दांडेकर बाई त्या वर्गावर जायच्या व त्या मुलांना ज्या विषयाचा फ्री पिरेड असेल त्या विषयाची एखादी गोष्ट सांगायच्या, त्यामुळे मुलं आपल्याला फ्री पिरेड कधी मिळतो व दांडेकर बाई आपल्या वर्गावर कधी येतात याची वाट पाहत असायचे. सर्व शिक्षक सहकाऱ्यांबरोबर दांडेकर बाईंचे संबंध खूपच जिव्हाळ्याचे होते. त्यांच्या अडीअडचणी समजून त्या सर्वांना शक्य तेवढं समजून घेत व सहकार्य करत. त्यामुळे त्या संपूर्ण शाळेमध्ये, विद्यार्थीवर्गामध्ये, सहकार्यांमध्येही प्रिय होत्या. त्या मुख्याध्यापिका झाल्या तशा त्यांनी पॅरेण्ट-टीचर्स मिटींगही चालू केल्या. पालकांना विविध विषयांवर मार्गदर्शन त्यांचं शंकासमाधान इत्यादी गोष्टी त्या खूपच सहजतेने करायच्या. कॉलेजमध्ये गेल्यानंतर पहिल्या वर्षी सायन्सला गेलेल्या विद्यार्थ्यांना इंग्लिश मध्ये समजण्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो हे जाणून आठवी ते दहावी सायन्स व मॅथ्स इंग्लिश मध्ये शिकवण्याचा प्रस्ताव त्यांनी मंडळाला दिला व विश्वस्तांनी ही त्याला तात्काळ संमती दिली. दांडेकर बाईंच्या विविध उपक्रमांमुळे दिवसेंदिवस संस्थेचा व शाळेचा नावलौकिक वाढत होता. शाळेतील जास्तीत जास्त मुलांना शिष्यवृत्ती मिळत होती. दरवर्षी दहा-पंधरा मुलं दहावीच्या परीक्षेत बोर्डात येत होती. या सर्वाचे श्रेय मुख्याध्यापिका या नात्याने दांडेकर बाईनाच मिळायचं, पण त्या विनम्रपणे ते श्रेय आपल्या सहकाऱ्यांना व आपल्या विद्यार्थ्यांना देत. आज त्यांच्या संस्कारातून शिक्षणातून घडलेले, समाजात प्रतिष्ठित व्यक्ती असलेले त्यांचे विद्यार्थी, शहरातून काही देशातील विविध भागातून तर काही परदेशातूनही खास दांडेकर बाईंच्या निरोप समारंभासाठी आले होते.
कल्पतरू आर्केडच्या पोर्चमध्ये त्यांच्या इमारती समोर गाडी थांबली. ड्रायव्हरने “ मॅडम “असे म्हणताच त्या एकदम भानावर आल्या. शाळेपासून घरापर्यंतच्या प्रवासात डोळ्यासमोर सुरु असलेला आपला पस्तीस वर्षांचा शाळेतील प्रवासाचा चित्रपट अचानक थांबला. सीटवरील बुके, विविध भेटवस्तू घेऊन त्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करत असतानाच ड्रायव्हर म्हणाला “मॅडम तुम्ही पुढे व्हा, मी आणतो सगळे...” त्याही हो म्हणाल्या.... लिफ्टकडे जायला वळणार तेवढ्यात त्यांना “आजी....” अशी मोठ्याने हाक ऐकू आली. त्यांचा नातू.. मंदारला धावत येताना पाहून त्या तिथेच थांबल्या. मंदार इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला होता. मंदारच्या वडिलांची त्यांच्या फार्मा कंपनीतून तीन वर्षांपूर्वीच जर्मनीमध्ये एका प्रोजेक्टसाठी ट्रान्सफर झाली होती. सुनीलला तिकडे जर्मनीला जेवणाखाण्याची आबाळ होऊ नये म्हणून दांडेकर बाईंनीच आपल्या सुनेला, संध्याला सांगितलं “ आता मंदारची बारावी झाली आहे, तो हुशार आहे.. त्याला इंजिनीरिंगला येथेच पुण्यात नक्की ऍडमिशन मिळेल, त्यामुळे तुही तीन-चार वर्ष सुनीलबरोबर जर्मनीला जा. मंदारची काळजी घ्यायला आम्ही दोघे आहोत. माझी शाळा सांभाळून मंदारकडे नीट लक्ष ठेवेन.. तू काळजी करू नकोस.” सुनील- संध्याला आईने सांगितलेल पटलं व त्यांनी जर्मनीला जाण्याचं ठरवलं. मंदारला बारावीला चांगले मार्क मिळाले आणि त्याला पुण्याला इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन मिळाली, त्यामुळे सगळ्यांनाच खूप आनंद झाला.
मंदारला दुरून धावत येताना पाहून दांडेकर बाईंना आठ-दहा वर्षापूर्वीचा मंदार धावत येऊन त्यांना मिठी मारत असल्याचा भास झाला.
सुनीलने एम फार्म करून पी एचडी केलं आणि लगेच दोन वर्षातच संध्या लग्न करून घरी आली. संध्या कंप्युटर प्रोफेशनल, प्रोग्रॅम डेव्हलपर होती. नोकरी करण्याच्या ऐवजी तिने घरूनच बिझनेस करण्याचा निर्णय घेतला होता. ती देश-विदेशातील कंपन्यांसाठी लागणारी वेगवेगळी सॉफ्टवेअर डेव्हलप करायची. सुनिल-संध्या च्या लग्नानंतर दोन वर्षांनी मंदारचा जन्म झाला. दादांची एलआयसी मधील नोकरी व्यवस्थित चालू होती. संध्याचे घरूनच चालत असलेले काम, आजी-आजोबांचा सहवास यामध्ये मंदारचे बालपण लाडाकोडात व चांगल्या संस्कारात जात होते. मंदारला जेव्हा शाळेत घालण्याची वेळ आली तेव्हा आजीच्या शाळेशिवाय दुसऱ्या कोणत्याही शाळेत ऍडमिशन घ्यायचा विचार त्यांच्या मनात आला नाही. मंदारला आजीच्याच शाळेमध्ये ऍडमिशन घेतली.
मंदार जसजसा इयत्ता वर जाऊ लागला तसतसा त्याला आपल्या आजीला शाळेमध्ये मिळत असलेला मान समजू लागला. खूपदा शाळेतील मुलं, शिक्षक एकमेकांना मंदार कडे बघून...” हा दांडेकर बाईंचा नातू बर का..” असे सांगत. असे ऐकल्यावर त्याला आपल्या आजीचा अभिमान वाटत असे, तसेच त्याचा आजीबद्दलचा आदर आणखी वाढत असे. तो जेव्हा माध्यमिक शाळेमध्ये आला तेव्हा दांडेकर बाई त्याच्या वर्गावर वेगळे शिकवण्यास येऊ लागल्या. एकंदर विषय समजून सांगण्याची पद्धत, मुलांबद्दलचीआत्मीयता, प्रेम , तसेच कधीही आपण तिचा नातू म्हणून वेगळी न मिळणारी ट्रीटमेंट, हे सगळे त्याला खूप आवडत असे. घरी आल्यानंतरही आजी त्याला खूप नवीन नवीन गोष्टी समजून सांगायची, त्यांच्या अभ्यासातील अडचणी सोडवण्यासाठी मदत करायची त्यामुळे त्याची व आजीची खूपच चांगली गट्टी झाली होती. आठवी- नववी या दोन वर्षात तो आजीबरोबर शाळेच्या एज्युकेशनटूर बरोबर जर्मनी ऑस्ट्रेलियाला जाऊन आला होता. गेल्या काही वर्षापासून पुढारलेल्या देशातील- शाळेतील चांगल्या शिक्षण पद्धती आपल्या शाळेमध्ये समाविष्ट करू शकण्याच्या उद्देशाने विविध देशातील शाळांमध्ये शिक्षण सहल आयोजित करण्याचा उपक्रम दांडेकर बाईंनी चालू केला होता. शाळेतील शिक्षक व विद्यार्थी या सर्वांना त्याचे सकारात्मक बदल दिसू लागले होते. एज्युकेशनल टूरवर असताना आजीचे सर्वांशी, अगदी परदेशीही व्यक्तींशी सहज बोलणं- वागणे त्यांच्याशी संवाद साधण्याची कला, तिचे इंग्लिश भाषेवर प्रभुत्व, त्या-त्या देशातील एटिकेट्स, या सर्वांनी मंदार खूपच प्रभावित झाला होता.
“आजी ....” असे म्हणून मंदारने धावत येऊन आजीचे दोन्ही हात हातात घेतले तेव्हा त्यांनीही त्याला थोपटले.. लिफ्टमधून सहाव्या मजल्यावर येईपर्यंत मंदारच्या असंख्य प्रश्नांनी आजीला भंडावून सोडलं होतं. त्याचा आनंद, आजीकडून आजच्या दिवसात काय काय घडलं हे जाणून घेण्याची उत्सुकता ओसंडून वाहत होती. प्रॅक्टिकल व ओरल एक्झाम मुळे आज आपल्याला आजीच्या निरोप समारंभाला जाता आले नाही याचे त्याला खूप वाईट वाटत होतं. दार उघडून घरात आल्याबरोबर त्याने आजीला दोन्ही हात धरून वर बसवलं तिच्या मांडीवर हात ठेवून जमिनीवर बसला व “सांग....” म्हणून तिच्याकडे बघू लागला....पुढचा अर्धा तास आजी आणि नातू पुन्हा एकदा निरोप समारंभाच्या वातावरणात रंगून गेले. आजीचे बोलणे संपताच त्याने मिठी मारली व म्हणाला “माय वर्ल्ड बेस्ट आजी.”
तेवढ्यात त्याचा फोन वाजला... बाबांचा फोन बघताच...” थांबा व्हिडिओ कॉल करतो आजी-आजोबा पण येतील फोनवर...” असं म्हणून फोन कट केला.. रिटायर झाल्यानंतर गेले दोन वर्ष दादाही मन रमावे म्हणून एका इन्शुरन्स कंपनीसाठी कन्सल्टंट म्हणून काम करत होते. ते ही तेवढ्यात आले तसा मंदारने बाबांना व्हिडिओ कॉल केला. आई-बाबांना आजीचे कौतुक सांगताना त्याचा आनंद ओसंडून वाहत होता. दांडेकर बाई व दादा दोघेही त्यांच्या नातवाकडे हसून बघत होते. एकीकडे सुनील- संध्यालाही आपल्या आईचा -सासूबाईंचा अभिमान वाटत होता. फोन संपता-संपता सुनील मंदारला म्हणाला.. ” तुझी परीक्षा झाली की मे महिन्यामध्ये तू आजी-आजोबांना घेऊन पंधरा दिवस जर्मनीला ये. मला तारीख सांग.. मी तिकीट पाठवतो...आणि हो.. आई- दादा तुम्ही आता काही बोलायचं नाही... तुम्हीही मंदार बरोबर तिकडे यायचं हे नक्की...” थोडे आढेवेढे घेऊन आजी आजोबा दोघेही तयार झाले म्हणून मंदारही खूश झाला...सिक्स सेमिस्टरची परीक्षा संपली व लगेच आजी-आजोबा नातू तिघेही जर्मनीला गेले.
म्युनिकमध्ये एक दिवस सगळे मोठ्या मॉलमध्ये गेले होते. तिथल्या एका इलेक्ट्रॉनिक शॉप मध्ये वेगवेगळी गॅजेट्स बघण्यासाठी मंदार आत गेला. आजीपण मंदार बरोबर आत गेली. तिथे असलेल्या अलेक्सावर मंदारची नजर गेली. अलेक्सा हा काय प्रकार आहे.... आजीही कुतूहलाने ते बघू लागली...आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं अलेक्सा कशी पटकन देतो... या सगळ्याचा त्याने सेल्समनकडून आजीला डेमो दिला. हे सगळं सुरू असताना सुनिल- संध्या- दादाही तिथे आले व कौतुकाने बघायला लागले. सुनील म्हणाला “ चला आपण अलेक्सा घेऊ या...” हे ऐकून मंदारला खूप आनंद झाला.. तो पटकन म्हणाला “धिस अलेक्सा गिफ्ट टू माय अलेक्सा आजी” ...सगळे आश्चर्याने मंदार कडे बघायला लागले. दांडेकर बाईपण आश्चर्याने मंदारकडे बघून विचारात पडल्या, तेव्हा मंदार म्हणाला...” एक मिनिट...एक मिनिट... सांगतो .... आजी..अगदी लहानपणापासून मी तुला इतके वेगवेगळे प्रश्न विचारले, पण नेहमीच तू माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर त्वरित, बिनचूक दिलीस....सो यू आर माय अलेक्सा आजी...” मंदारच भन्नाट पण समर्पक लॉजिक ऐकून सगळेजण एकदम हसायला लागले.