Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

Suhas Belapurkar

Romance


4  

Suhas Belapurkar

Romance


शरदाचे मळभ निवळले

शरदाचे मळभ निवळले

3 mins 198 3 mins 198

“शारद सुंदर चंदेरी राती, स्वप्नांचा झुलतो झुला…..” समीरने आपल्या युनिव्हर्सिटीतील आठव्या मजल्यावरील घरात प्रवेश केला, सवयीप्रमाणे रेडिओ सुरु केला आणि आशाताईंचा मधुर स्वर कानी पडला. आज दुपारच्या सत्कार समारंभाच्या आठवणी, विद्यार्थ्यांच्या, सहकाऱ्यांच्या शुभेच्छा.. या सर्वाचा आनंद मनात होता. त्याच्या शोधनिबंधला सरकारकडून गौरवण्यात आलं होतं, त्यानिमित्ताने कॉलेजने आज एक छोटेखानी समारंभ आयोजित केला होता. सकाळपासूनच विविध चॅनल्सना बाईट, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन व संध्याकाळचा सत्कार समारंभ, यासर्वातून त्याला स्वतःला असा वेळ फक्त लिफ्टच्या आठव्या मजल्यापर्यंतच्या प्रवासातच मिळाला होता.

आणि... घरात शिरताच लागलेल्या…. “शारद सुंदर ने”.. तो एकदम पंधरा वर्ष मागे गेला. कॉलेजच्या शेवटच्या वर्षात असताना झालेली सुमनची पहिली भेट त्याला आठवली. तो बीएससीच्या शेवटच्या वर्षाला होता. कॉलेजचे शेवटचे गॅदरिंग असल्याने त्याला सर्व मित्रांनी जरा बळजबरीनेच गॅदरिंगला नेले. अभ्यासातून विरंगुळा म्हणून तोही तयार झाला. गॅदरिंग सुरू झाले, कॉलेजमधील मुलं-मुली धमाल करत होती. काहीजण स्टेजवर आपापली गाणी सादर करत होती. आता शेवटचे गाणे... निवेदकाने अनाउन्समेंट केली आणि सुमन स्टेजवर आली. अगदी साधा पण डिसेंट ड्रेस, एकदम टापटीप.. तिने माईक हातात घेतला आणि “शारद सुंदर चंदेरी राती….लाला... ललाला...ललाला..ला”…गाण्याची पहिलीचीच ओळ...आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. पुढे गाणे संपेपर्यंत समीर स्वतःला पूर्णपणे विसरून गेला. अशा आवाजाची जादू तो प्रथमच अनुभवत होता. त्याला सुमनच्या आवाजातून आशा भोसले.. सुमन कल्याणपूर यांचा भास होत होता.. टाळ्यांच्या कडकडाने समीर भानावर आला. मित्रांना म्हणाला दोन मिनिटात आलो व तडक ग्रीनरूम मध्ये जाऊन त्याने सुमनला गाठले..अगदी सहजपणे...आनंदाने.. समीरने तिचा हात आपल्या दोन्ही हाताने हातात घेऊन तिच्यावर अभिनंदनाचा, स्तुतीचा वर्षाव सुरू केला. काही क्षण दोघांनाही कळत नव्हते की काय घडतय. तेवढ्यात मागून आलेल्या सुमनच्या मैत्रिणीने सुमनच्या पाठीवर थाप मारून तिची सुटका केली. गॅदरिंग संपवून सुमन आपल्या होस्टेलच्या रूमवर आली, पण अजूनही अचानक बसलेल्या त्या गोड धक्क्यातून ती सावरली नव्हती.

दुसऱ्या दिवशी समीर लायब्ररीमध्ये पुस्तक बदलण्यासाठी गेला तेव्हा तिथे बसलेल्या सुमनची व त्याची नजरानजर झाली. तो तिच्याकडे गेला व पुन्हा एकदा कालच्या गाण्याचे कौतुक करून तिला आपली ओळख करून दिली. सुमननेही आपण फायनल इयर बी.ए. विथ मराठी करत असल्याचे सांगितले. हळूहळू दोघांच्याही गाठीभेटी वाढत गेल्या... वागण्यातही मोकळेपणा आला.

समीरला घरचं असं कोणीच नव्हतं. अनाथ म्हणूनच वाढलेल्या समीरला एका संस्थेनेच लहानाचे मोठे केले. तेथील देसाई काकांनी समीरची हुशारी ओळखली आणि त्याच्या पुढील शिक्षणाची सोय केली. सुमनला त्याची ही परिस्थिती व हुशारी समजल्यावर तिचा समीरबद्दलचा आदर आणखीनच वाढला.

सुमनने बारावी झाल्यावर पुढील शिक्षणासाठी सायखेडयाहून पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला होता. अर्थात घरातील आई-वडिलांना तिचा हा निर्णय फारसा पटला नव्हता. पण घरची बेतास बेत परिस्थिती, लहान बहिणीचे शिक्षण, यासर्वाचा विचार करून, पुण्यात गेले तर एकीकडे नोकरी व शिक्षण दोन्ही करता येईल असा विचार सुमनने केला. 

“आता बी.ए. झाल्यावर पुढे काय…”.समीरने विचारले..”बी.एड.करून शिक्षक होणार..” सुमन म्हणाली.. “तू काय ठरवलयस ?..” “मी एम.एस.सी. करून पीएचडी करणार ..इलेक्ट्रो-मॅग्नेटिझममध्ये रीसर्च करण्याचा विचार आहे..” समीरनेही आपला विचार सुमनला सांगितला...कॉलेजचा शेवटचा दिवस. सुमन सायखेड्याला परत जायच्या आधी दोघांनी आपले विचार एकमेकांना सांगितले….

समीरच्या मनात यासर्व आठवणी पुन्हा जाग्या झाल्या... एवढ्यात आशाताईंचे गाणे संपले. गाणे मनात रिझवण्यासाठी समीरने रेडिओ बंद केला व सहजच समोरचा आजचा पेपर चाळू लागला. कोजागिरीचे विविध कार्यक्रम नजरेखालून जात असतानाच त्याची नजर अचानक सुमनच्या फोटोवर पडली. त्याने बातमी वाचली ...सुमनला आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला होता... पेपराची घडी घालून समीर गॅलरीत आला . सहजच त्याचे लक्ष आकाशातील ढगाआडुन पुसटश्या दिसत असलेल्या चंद्राकडे गेले. तो एकटक चंद्राकडे बघू लागला. शारदपौर्णिमेच्या रात्री चंद्रासमोर मळभ….आणि त्याला पहिल्यांदाच प्रकर्षाने आपल्यामधील एकाकीपणाची जाणीव झाली..

मागच्याच आठवड्यात आपल्या लहान बहिणीचे लग्न करून दिल्याने, एका मोठ्या जबाबदारीतून आपण आई-वडिलांना मोकळे केल्याचे समाधान व आदर्श पुरस्कार मिळाल्याचा आनंद मनात साठवून सुमन पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुण्याला निघाली. रात्रीच्या गाडीच्या प्रवासात अचानक तिला सकाळच्या बातम्यामध्ये दिसलेला समीर आठवला आणि तिचे मन कित्येक वर्ष मागे गेले... खिडकीतून दिसणारा कोजागिरीचा चंद्र पाहताच तिला समीरशी झालेली पहिली भेट आठवली आणि ती मोहरुन गेली...बाहेरच्या शितल चंद्रप्रकाशात शारदापौर्णिमेच्या रात्री तिच्या मनातील अनामिक विरहाचे मळभ पूर्णपणे दुर सरले आणि खिडकीतून येणारा गार वारा अंगावर घेत ती सहज गुणगुणू लागली…” थंड या हवेत, घेऊन कवेत, साजणा झुलव मला…”... आणि त्याच मूडमध्ये तिने समीरचा नंबर मिळवण्यासाठी मैत्रिणीला फोन केला.


Rate this content
Log in

More marathi story from Suhas Belapurkar

Similar marathi story from Romance