Suhas Belapurkar

Others

1.8  

Suhas Belapurkar

Others

वाचन संस्कृती

वाचन संस्कृती

3 mins
125


साधारणपणे 1992 सालच्या डिसेंबर महिन्यातली गोष्ट असेल. वाचन परिषदेचा भव्य उद्घाटन सोहळा सुरू होता. सकाळी सात- साडेसातची वेळ.. राजा शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात 2000 विद्यार्थी-विद्यार्थिनी प्रसन्न वातावरणात “ग्रंथ आपुले - साथी ग्रंथ आमुच्या हाती” हे श्री. यशवंत देव यांनी स्वरबद्ध केलेले गीत एका तालासुरात गात होते. हा प्रसंग मनावर ठामपणे कोरला गेला व या गीतातील आशय, गर्भितार्थ शोधण्याचा वेळोवेळी मनाशी प्रयत्न झाला.

 

अगदी शाळेत पाऊल ठेवल्यापासून “ग्रंथ हेच आपले गुरु” आहेत हे वेगवेगळ्या तऱ्हेने प्रत्येकाच्या मनावर बिंबवलं जातं. हे खरच आहे, पण तरीही मला असं वाटतं की “गुरू” या शब्दाचं खुपदा मनावर दडपण येतं आणि त्याचमुळे त्याच्याजवळ जाण्यासाठी मन कचरत असावं. त्याच्याशी जरा दोन हात दुरूनच जवळीक साधण्याचा प्रयत्न होतो, पण जसजशी ही जवळीक वाढत जाते व दोन हाताचे अंतर दोन बोटंवर येते तेव्हा आपणास या गुरूचा प्रभाव जाणवू लागतो. पण ग्रंथ हेच आपले मित्र-साथी आहेत असं जर मनाला पटलं तर ...त्यांच्या सहवासात जायला कोणालाही पटकन आवडेल व लवकर जवळीक साधली जाईल. असे म्हणण्याचे आणखीन एक कारण म्हणजे माणसाचा स्वभाव. मनुष्य स्वभावच असा आहे की ज्या ठिकाणी त्याला मैत्रीचा ओलावा मिळतो, तेथे तो अधिक पटकन आकर्षिला जातो व ते साध्य करण्याची प्रवृत्ती त्याच्यात आपोआपच निर्माण होते.

 

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात चार घटका निवांतपणे घालवण्यासाठी, मन रमवण्यासाठी माहितीसाठी, प्रबोधनासाठी व उद्बोधनासाठीही वाचन हा तसा आवश्यक घटक मानला पाहिजे. पण त्याही पुढे जाऊन एखाद्याने जर तो छंद म्हणून जोपासला तर त्यासाठी तो अधिक जास्त वेळ काढू शकेल. आता व्यक्ती तितक्या प्रकृती या नात्याने प्रत्येकाची आवड छंद हे वेगवेगळे असणारच आणि त्या जोपासण्यासाठी कराव्या लागणाऱ्या परिश्रमाचीही त्याची तयारी असते. खूपसे छंद हे खर्चिक असतात. पण वाचनाचा छंद हा त्यामानाने फारसा खर्चिक नसतो. विविध विषयांवरची पुस्तके सार्वजनिक वाचनालयात सहजपणे उपलब्ध असतात. आजच्या जगात तुम्हाला पुस्तके विविध संकेतस्थळांवर उपलब्ध होऊ शकतात.. तीही अगदी फुकट. काही पुस्तके तुम्हाला किंडलवरही मिळतात. ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांना कुठल्याही वेळी कुठल्याही ठिकाणी आपल्याला हवं ते पुस्तक कुठे मिळणार याची चिंता पण आता सुटत आहे. विविध मोबाईल ॲप्सवर आपण पाहिजे ते पुस्तके सहजपणे मिळवू शकतो. काही पुस्तकं तर ऑडिओ स्वरूपातही मिळतात, त्यामुळे ज्यांना ज्यांना वाचनाची आवड आहे पण काही कारणांनी ती पूर्ण होऊ शकत नसेल, तर ते ऑडिओ बुक्सने आपली आवड पूर्ण करू शकतात. अशी ही विविध विषयांवरची पुस्तके- ग्रंथ तुमचे गुरु व साथी बनतात. 


लहानपणी लागलेल्या सवयी, झालेले संस्कार हे मनावर व एकंदरच आपल्या आयुष्यावर दूरगामी परिणाम करतात असे आपण मानतो. असा हा वाचनाचा छंद जर लहानपणीच लागला व वाढत्या वयाबरोबर तो वाढत गेला तर व्यक्तिमत्व विकासासाठी त्याचा फार मोठा फायदा होतो. 

 

खरंतर वाचन हे खूपस व्यक्तिसापेक्ष असतं, स्वांतसुखाय असतं आणि ते तसंच असायला हवं. आपण वाचतो ते योग्य आहे का? असलंच तर त्यापासून काय लाभ होतो? अशा प्रकारचे विविध प्रश्न मनात येतात व त्या अनुषंगाने वाचन करण्याची वृत्ती वाढीस लागते. साधारणतः माणूस आपल्या स्वभावाशी मिळतंजुळतं वाचणे पसंत करतो. वाचत असताना तो त्यातील विविध घटनांचे, विविध विषयांचे, विविध पातळ्यांवर विश्लेषण करण्याचा प्रयत्न करत असतो. कळत-नकळत आपल्या तसेच समाजातील विविध अंगांचा अभ्यास, सुखदुःखे, बदल याचा शोध घेत असतो व त्यातून तो काही वेळा मानसिक आधारही शोधत असतो. उदाहरणार्थ, नैराश्याने गळून गेलेले मन हे हलकंफूलकं वाचलं की उभारी घेऊ लागतं, काही काळ का होईना उल्हासित करत. एकंदरीत काय, तर वाचन का व कसे करावे हे प्रत्येकाने स्वतः जाणून घ्यायचे असते. आयुष्याचा उत्तरार्ध सुखावह करण्यासाठी वाचनाचा छंद निश्चितच उपयोगी पडतो.

 

वाचनाची पुढची पायरी म्हणजे चिंतन. आपण थोडेसे अंतर्मुख होऊन स्वतःलाच जाणून घेण्याचा प्रयत्न करतो व चिंतनाबरोबर होणार मनन हे आपणास वाचनाचा पुनःप्रत्ययाचा आनंद देत असतं. यानंतरची पायरी म्हणजे उद्बोधन अथवा प्रगटीकरण. अर्थात हे सर्वांकडून होतच असे नाही, पण ज्यांच्याकडून होतं ते इतरांना वाचनासाठी निश्चितच स्फूर्ती देतात.

 

थोडक्यात, शिक्षणाने माणूस सुशिक्षित होतो तर वाचनाने तो सुसंस्कारित होतो, जास्तीत जास्त समाजाभिमुख बनतो. आयुष्याच्या जडणघडणीत पालकांचा, पुस्तकांचा निश्चितच फार महत्त्वाचा वाटा असतो. अशीही वाचन संस्कृती... जी आपल्या आयुष्यावर, आपल्या कुटुंबावर, समाजावर दूरगामी परिणाम करते व एक चांगले समाजमन व समाजभान निर्माण करते. अशा या वाचन संस्कृतीचा वारसा जतन करून आपण तो पुढल्या पिढीकडे तितक्याच सहजतेने दिला पाहिजे.


Rate this content
Log in