पशुपक्षी आणि करोना
पशुपक्षी आणि करोना
सकाळी साधारण नऊची वेळ..समोरच्या ग्राऊंडच्या कट्ट्यावर जिथे दररोज आजी-आजोबा, सीनियर सिटीजन, महिला मंडळातील बायका हे सर्व सकाळच्या वॉकनंतर जिथे गप्पा मारत बसत तिथे आज अचानक शंभर-दीडशे कावळे सगळीकडून उडत-उडत कट्ट्यावर येऊन बसू लागले. सर्व कावळे, दररोज जिथे माणसं बसायची, गप्पा मारायची त्याच ठिकाणी कट्ट्यावर स्थिरस्थावर झाले.
ग्राउंडमध्ये रोज सकाळी खूप मुले खेळत असायची.. तेही आज रिकामे असल्याने कॉलनीतील जवळपास पंचवीस-तीस कुत्र्यांनी त्याचा ताबा घेतला होता व अखंड ग्राउंडवर भरपूर हुंदडून घेतलं. अचानक त्यांच्यातल्या एका कुत्र्याचं लक्ष कावळ्यांच्या सभेकडे गेलं व तोही त्याच्या सर्व दोस्त कंपनीला घेऊन त्यांच्या जवळ गेला.
कट्ट्याच्या शेजारीच, नेहमी बसणाऱ्या कोळीणी कधी येणार, याची वाटपाहून थकलेल्या पाच-सहा मांजरी पार थकून गेल्या होत्या. त्यांच्यामधल्या एका बोक्याच लक्ष जमलेल्या कावळे-कुत्र्याच्या गर्दी कडे गेलं. त्यालाही काहीतरी वेगळं वाटलं म्हणून तोही आपल्या मांजर मैत्रिणींचा घोळका घेऊन त्यांच्यात सामील झाला.
आकाशात आपल्याच डौलाने संथपणे विहार करणाऱ्या घारिंच लक्षही या सर्वांकडे गेलं. त्याही पाच-सहा जणी जवळच्या फांद्यांवर येऊन स्थिरावल्या.एव्हाना,या झाडावरून त्या झाडावर उडणाऱ्या तीस-चाळीस पोपटानीही त्यांच्या दोस्तांची गर्दी पाहिली आणि तेही सर्वजण जवळच्या फांद्यांवर बसुन खालची चर्चा ऐकू लागले.
कावळे एकमेकांना सांगत होते, “अरे आम्ही सकाळपासून पूर्ण कॉलनीत उडतोय पण आम्हाला आमच्या नेहमीच्या ठिकाणी कोठेही खिडकीतून खाली टाकलेले पाव, पोळ्या, भाकरी काहीच मिळाल नाही. शेवटी आम्ही सर्व कॉलनी पालथी घालून थकलो व इथे आलो. गेल्या काही दिवसापासून आम्हाला एक गोष्ट जाणवू लागली आहे की एकंदरच माणसांचा फिरणं कमी झालंय. पण आज ही परिस्थिती येईल असं वाटलंही नव्हतं.”
त्यांचे हे ऐकत समोर असलेला एक कुत्रा त्याला म्हणाला, “अरे आम्हालाही दररोज सकाळी दोन शर्ट-पॅन्ट घातलेल्या मॅडमकडून पार्ले बिस्कीट,मारी बिस्कीटाचा ब्रेकफास्ट मिळायचा. बर्याचदा रात्रीचा शिळा स्वयंपाकही मिळायचा. पण सकाळपासून तोंडात अन्नाचा एक कणही गेला नाही... काय झालंय तरी काय या माणसांना..”
तेवढ्यात एक मनी शेपटी हलवत म्हणाली, “कालपर्यंत आम्हाला चवीला तरी मासे मिळायचे.. पण आज एकही कोळीण आली नाही.. बरं तर बरं दूधवालेही कुठे दिसले नाहीत, नाहीतर आम्ही त्यांच्या दोन-चार पिशव्या फोडून दूधतरी प्यायचो.. आम्हालाही सकाळपासून उपवासच.. गेले कुठे हे सगळे.”
झाडावर बसलेला राघू तेवढ्यात “करोना-करोना” ओरडू लागला, तसे सर्व कावळे, कुत्रे, मांजरी, चिमण्या, घार, सगळेजण राघूकडे बघू लागले. राघू म्हणाला “गेले काही दिवस दररोज मी येथून जाणाऱ्या माणसांकडून करोना- करोना असं ऐकतोय. तो कुठलातरी एक बारीकसा न दिसणारा जंतू आहे असंही समजलं.. आणि त्याला मारायचं कसं यावर त्यांच्याकडे औषधचं नाहीये, म्हणूनच ही सगळी माणसं खूप घाबरलीयेत..”
आता यावर उपाय काय म्हणून सर्वजण आपापल्या भाषेत म्हणजे.. काव-काव..भो-भो.. म्यांव- म्यांव.. करून आपापली मत मांडायला लागले.. सरतेशेवटी राघूने सगळ्यांना “ऐका” म्हणून शांत केले. त्यांना म्हणाला “आता यावर एकच उपाय... चला आपण सगळे या करोनाला शोधूया आणि त्याला सांगूया की बाबा आता तू माणसांना त्रास देणे बंद कर.. तुझ्या दहशतीने ती फारच घाबरून गेली आहेत आणि त्यांना आता आपली चूक समजू लागली आहे... तेव्हा झाली तेवढी शिक्षा पुरे.. आता ते शहाण्यासारखं वागतील व विनाकारण आपल्याला, आपल्या भाऊबंदांना आणि आपल्या पृथ्वीवरच्या या निसर्गरम्य घराला विनाकारण त्रास देणार नाहीत.. तू जर आणखीन रागावून बसलास तर.. आम्हालाही या शहरांमध्ये जेवण कसं मिळणार.” राघूच म्हणण सर्वांना पटलं आणि सर्वजण वेगवेगळ्या दिशांनी करोनाला शोधायला निघाले..