STORYMIRROR

Suhas Belapurkar

Drama Romance

3  

Suhas Belapurkar

Drama Romance

धक्का

धक्का

4 mins
255


आज दुपारीच प्रवीणचा एम. कॉमचा रिझल्ट लागला होता. डिस्टिंक्शनमध्ये पास झाल्यामुळे प्रवीण जाम खुश होता. उद्यापासून त्याची नवीन नोकरी सुरू होणार होती. एकदा का नवीन नोकरी सुरु झाली की, आपलं शिवाजी पार्कवर फिरणं कसं होईल, म्हणून “आई मी तासाभरात पार्कात जाऊन येतो असं” सांगून प्रवीणने जिने उतरता उतरता इयरफोन घातले आणि बरेच दिवसात मोहम्मद रफी ऐकला नाही म्हणून त्याने ऍपवर रफीची गाणी लावली... गाणी ऐकता ऐकता नेहमीच्या सवयीने पार्कात पोहोचला. चक्कर मारायला सुरुवात केली तोच.. “ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फो का रंग सुनहरा,” त्याचं आवडतं गाणं लागलं. प्रवीण मान हलवत आपल्याच तंद्रीत चालत होता…


बिकॉमच्या शेवटच्या वर्षाला असलेली कृतिका आपल्या मैत्रिणींबरोबर शिवाजी पार्कवर चक्कर मारत होती. आज कॉलेज संपल्यानंतर जिने उतरताना तिला कॉलेजमधल्या मुलाने जोरदार धक्का दिला होता. धक्का दिल्यानंतर तो मुलगा व त्याचे मित्र कृतिकाकडे जो अविर्भाव करून बघत होते, त्यावरून त्यांनी मुद्दामच धक्का दिला होता हे तिच्या लक्षात आलं होतं.. पण काही समजायच्या आतच ते सगळे तिथनं गायब झाले होते. झाल्या प्रकाराने कृतिका भयंकर चिडली होती व कॉलेजमधली मुलं कसा पोरींवर चान्स घेतात याबद्दल मैत्रिणींना तावातावाने सांगत होती..


आपल्याच गाण्याच्या नादात चालणाऱ्या प्रवीणचं आजूबाजूला बिलकुल लक्ष नव्हतं आणि त्याच्यातच तो कृतिकावर जाऊन आदळला…. तिला सॉरी म्हणायच्या आतच कृतिकाने पुढचा मागचा काही एक विचार न करता प्रवीणच्या एक जोरदार कानफटात मारली... अचानक झालेल्या या घटनेने प्रवीण व कृतिकाच्या मैत्रिणीही अवाक झाल्या...


“बघितलं मी तुम्हाला आत्ताच सांगत होते की मुलं कशी असतात.. बघा.. कसा जोरदार चान्स घेतला.. ॲब्सोल्युटली डीसगस्टिंग..” आणि प्रवीणला ती वाटेल ते बोलू लागली.. प्रवीण तिला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करू लागला...


”अगं मी माझ्याच तंद्रीत गाणी ऐकत होतो त्यामुळे तू मला दिसलीसच नाही. मी काही मुद्दाम धक्का दिला नाही..” पण सकाळच्या प्रसंगामुळे कृतिका काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती.. तोपर्यंत पार्कातील राऊंड मारायला आलेली माणसं-मुलं सर्वजण हळूहळू गोळा झाली. त्यांना फक्त एका मुलाने एका मुलीला धक्का मारला एवढेच काय ते समजलं. एकंदर सामाजिक धारणेने ते कृतिकाचीच बाजू घेऊ लागले..


इतक्यात तिथून जाणाऱ्या पोलिसांच्या गाडीमधील दोन पोलिस काय प्रकार आहे तो बघण्यासाठी खाली उतरले व काय झालंय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागले.. एव्हाना कृतिकाचा राग अनावर झालेला असतो व ती पोलिसांना, “याने मुद्दाम माझी छेड काढली व जोरात धक्का दिला” असं सांगितले. पोलिसांच्या दरडावण्याने प्रवीण गांगरून गेला. पोलिसांनीही गर्दी टाळण्यासाठी प्रवीणला “चल बस गाडीमध्ये, आपण पोलीस स्टेशनला जाऊन बोलू” असं म्हणून प्रवीणला व्हॅनमध्ये बसवलं. झाल्या प्रकाराने प्रवीण खूपच घाबरून गेला.


पोलीस स्टेशनला गेल्यानंतर प्रवीणने पोलिसांना खूप विनवण्या केल्या, पण पोलीसांनी त्याचं काहीएक ऐकलं नाही. शेवटी पोलीसांनी प्रवीणच्या घरच्यांना बोलावून घेतलं.. अचानक पोलीस स्टेशनवरून आलेल्या फोनने प्रवीणचे आई-बाबा

दोघेही घाबरून गेले.. “मी पोलिस स्टेशनला जाऊन काय प्रकार आहे तो बघून येतो, तू घरीच थांब” असं म्हणून प्रवीणचे बाबा पोलीस स्टेशनमध्ये गेले. पोलिसांनीही समज देऊन प्रवीणला वडिलांबरोबर घरी पाठवलं.. या अनपेक्षित प्रकाराने प्रवीण व त्याच्या घरच्यांना प्रचंड धक्का बसला..


इकडे कृतिकाच्या मैत्रिणी दुसऱ्या दिवशी कृतिकाला खूप समजून सांगतात.. ”कृतिका, तू प्लीज समजून घे, कालच्या प्रकारामध्ये प्रवीणची खरोखरच काही चूक नाहीये.. अगं अतिशय अनवधानाने चुकून लागलेला तो धक्का होता.. पण तू खूपच ओवर रियाक्ट झालीस.. उगाचच प्रकरण नको तितके वाढवलेस. झाल्या प्रकरणांमध्ये प्रवीण व त्याच्या घरच्यांची निष्कारण बदनामी झाली आहे.. ते काही नाही, त्यांची माफी मागितली पाहिजे.”


कृतिका दोन-तीन दिवस या गोष्टीवर खूप विचार करते व तिला मैत्रिणींचं म्हणणं पटतं. दरम्यान ती प्रवीणबद्दल माहिती मिळवते. प्रवीण अतिशय चांगल्या घरातील, सुसंस्कृत व हुशार मुलगा आहे, हे तिला समजते व स्वतःची चूक मान्य करून ती प्रवीणची माफी मागण्याचे ठरवते. 


झाल्या प्रकाराने प्रवीणने स्वतःला कोंडून घेतलं व काहीतरी कारण सांगून नवीन नोकरीवरही रुजू झाला नाही. प्रवीणचा जिवलग मित्र शरदला हे समजल्यावर तो प्रवीणची कशीबशी समजूत काढून त्याला त्याचा दिनक्रम सुरू करण्यास सांगतो.

आठवडाभरानंतर प्रवीण पुन्हा एकदा शिवाजी पार्कला चक्कर मारण्यासाठी येतो. एक चक्कर पूर्ण करून आठवड्यापूर्वी घडलेल्या घटनेच्या ठिकाणी येताच प्रवीणला सर्व प्रसंग डोळ्यासमोर येतो आणि तो तेथेच कट्ट्यावर बसतो. गेले दोन-चार दिवसापासून प्रवीण चक्कर मारायला पुन्हा इथे येईल, या आशेने कृतिकाही पार्कात येत असते. प्रवीण आपला चेहरा दोन्ही हातांनी झाकून बसलेला असतानाच, त्याच्या खांद्यावर ठेवलेल्या हाताने तो दचकतो आणि बघतो तो काय.. शेजारी कृतिका अतिशय अपराधी नजरेने, डोळ्यात पाणी आणून त्याच्याकडे बघत असते.


“मी तुझ्याशी अतिशय चुकीचं वागले व त्यामुळे तुला खूपच मनस्ताप झाला, याबद्दल मी तुझी माफी मागते..” असं म्हणून ती त्याचे दोन्ही हात हातात धरून विनवणी करते. बराच वेळ कृतिका एकटीच बोलत असते व प्रवीण नुसता ऐकत असतो. शेवटी कृतिका त्याला म्हणते, “प्रवीण, आपण दोघे चांगले मित्र होऊ या.” तेव्हा प्रवीणला जाणवतं की कृतिकाला खरोखर पश्चात्ताप झाला आहे व तो तिला.. “ओके - अग्री” म्हणून शेकहॅण्ड करतो व स्माईल देतो.


हळूहळू प्रवीण व कृतिकाच्या गाठीभेटी वाढत जातात. दोघेही एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे समजून घेतात. दरम्यानच्या काळात कृतिकाही प्रवीणच्या घरी दोन-चार वेळा जाते व एकंदरच हे सर्व कुटुंब खूप छान आहे असं तिला कळतं.


साधारण वर्षभरानंतर.. एक दिवस दोघेही पार्कच्या कट्ट्यावर बसले असताना अचानक कृतिका आपल्या मोबाईलचा हेडफोन प्रवीणला लावायला सांगते... यावर गाणं चालू असतं “तदबीर से बिगडी हुई तकदीर बना ले.. अपने पे भरोसा है.. तो एक दाव लगा ले..” व प्रवीणकडे बघून हसते व त्याला प्रपोज करते..


कृतिकाच्या पहिल्या भेटीपासून ते या क्षणापर्यंत बसलेले सर्व धक्के प्रवीणच्या चेहऱ्यासमोर सरसर येतात... पण हा आत्ताचा शेवटचा धक्का इतका जोरदार असेल याची त्यांनी कल्पनाही केली नसते…


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama