अविस्मरणीय...
अविस्मरणीय...
दि.९/७/१९९८ वार शनिवार दिवस अविस्मरणीयच..
प्रसंग पुढीलप्रमाणे...
माझे मामा, आत्या,पाथरीला होते.शिक्षक भरती लेखी,तोंडी परीक्षा मी परभणीला दिली होती.नोकरी निवड आदेश प्राप्त झाला नाही म्हणून मी परभणीला गेलो.त्यावेळी मोबाईलची सुविधा फारसी नव्हती आणि आमचं गाव तसं खेडेगावचं.
परभणी जिल्हा परिषदेच्या फलकावर निवड यादीतील नाव पाहिल्यावर गगनात मावेनासा आनंद झाला,त्या कार्यालयातून यादीतील निवड अनुक्रमांक सांगून नोकरी आदेश लगेच घेतला... मला पंचायत समिती वसमत मिळाले होते.. ताबडतोब वसमत गाठलं हजर झालो.आणि.जि.प.प्रा.शा हपसापूर ही शाळा मला भेटली.केंद्रावर व शाळेवर हजर झालो..
शाळेवर अगोदरच जे दोन शिक्षक होते त्यांची बदली झाली होती.. त्यामुळे मीच त्या शाळेचा शिक्षक असल्यामुळे पहिल्या दिवशीच माझ्याकडे शाळेच्या चाव्या आल्या.. म्हणजे सोमवारी मला शाळेत येणे आवश्यक च होते... गावाकडे काहीच निरोप नव्हता.. गावाकडे लवकर जाणे आवश्यकच होते म्हणून घाईने निघालो..सरळ नांदेड ते मुखेड ,मुखेडहून हिप्परगा नी दोन तीन किलोमीटर चालत गाव दापका...
वेळ रात्री आठची ..काय आनंद होता...घराचा दरवाजा बंद होता.जोरात आवाज दिला..आई...आई...आई धावतच आली..म्हणाली ," आलास बापू...."
डोळ्यात आनंदाश्रू होते.. आईच्या पायावर दंडवत घेतलो नी आईला सांगितलं आई मी लागलो..मी शिक्षक झालो.. मला नोकरी लागली..काय तो आनंद...
वडील घरात नव्हते... त्यांना दिवसभर प्रश्न होता.. पोराचं काय होईल.?... पोरगं लागल का...? नाही लागल्यास...? दिवसभर डोळ्यात विचार..रात्र झाली.. आईवडील वाट पाहुन थकून गेले होते..मी अजून आलो नाही म्हणून अण्णा विचार करत जेवण न करताच विना अंथरुण पांघरुणाचं बाजेवर आकाशाकडे बघत पडले होते गोठ्याच्या समोर...
मी धावतच गेलो नी म्हणालो ," अण्णा..." अण्णांच्या अंगात जीव आला . अण्णा म्हणाले," बापू..." मी लागलो हे कळल्यावर माझ्या आईवडिलांना झालेला आनंद शब्दात वर्णन करता येणार नाही...
मी आजी ,आई, अण्णा व देवाच्या पाया पडलो.. खरंच तो दिवस आनंदाचा नव्हे तर अविस्मरणीय होता.... अविस्मरणीय च...
