अंकुरित
अंकुरित
मानवी जीवन जन्मतः नवनवीन नात्यांची गुंफण सोबत घेऊनचं येतं. नवजात बाळ नात्यांच्या साखळीमध्ये गुरफटून जन्माला येते, नाती ही कधी जन्मदात्यांच्या रुपात, बहीण भावाच्या रुपात, आजीआजोबांच्या रुपात, मामा, मावशी, काका, काकू, आत्या एक ना अनेक नाती जन्मताच चिकटून अंगाला आलेली असतात ती ही नकळत.
नवजात बाळाला कुठे माहिती असते , त्याचे लाड पुरवणारे कोण आहेत ते, तो तर निरागस जीव असतो, जसजशी समज वाढत जाते, समजण्याची शक्ती वाढायला लागते तसतस बाळ समजायला लागतं आणि एक एक नाती अंकुरित होत जाते इवल्याशा रोपट्या सारखी------हळू हळू रोपटं वाढत जातं आणि रोपट्याच रूपांतर झाडात होऊ लागतं., ह्या वाढत्या झाडाला हळू हळू फांद्या फुटतात, मग बहर येतो, त्यानंतर फ़ुलं येतात, नंतर फळं येतात, एक विशिष्ट वेळेनंतर कच्चं फळं पिकून रसाळ होतं, झाड त्या फळात आपले सारे गुण अवगुण मिसळतो, आणि एक वेळ अशी येते की फळाच्या गुणवत्तेवरून झाडाची गुणवत्ता ठरवली जाते.ह्या झाडाचे
मूळ म्हणजे आईबाबा, अंगावरील फांद्या म्हणजे विविध नाती, जी जन्मासोबत ठरलेली असतात, कालांतराने येणारा बहर म्हणजे जीवनात जोडीदाराची साथ, जन्मभराची सोबती,पती किंवा पत्नीच्या रुपात आपल्या जीवनात विशिष्ट वेळेनंतर पदार्पण करते आणि आपल्या जीवनाला एकदम कलाटणी मिळते, आधीच हिरवा असलेला निसर्ग हिरवाकंच दिसू लागतो, प्रत्येक वस्तू कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, वातावरणात नवचैतन्य पसरतं, आयुष्य हवंहवंसं वाटू लागतं, मन सैरभैर धावू लागतं, कल्पनांना पंख फुटतात, तारुण्याचा नवीन दृष्टीला सृष्टी ही तरुण भासू लागते,
मधुमास संपावेनासा वाटू लागतो, वेळ चक्रीवादळा सारखी पळून जाते ,ते सोन्याचे क्षण हृदयाच्या कुप्पीत दडवून ठेवावेसे वाटतात, मन उंच भरारी घेऊन गिरक्या मारते जीवलगाच्या अवतीभोवती, प्रत्येक सुख दुःखात जीवलगाची साथ हवीहवीशी वाटते, स्वप्न फुलोऱ्यात मन सारखं झुलत असतं, प्रेमाभावाचं, जिवाभावाचं, हक्काचं, विश्वासाचं, खोडकरपणाचं, लाडिगोडीचं, खोट्या रुसव्या फुगव्याचं, नाजूक रेशमी धाग्याचं, मंतरलेल्या रात्रीचं आणि तारुण्याच्या नक्षत्रातलं आपलं म्हणून घेणार कुणीतरी जीवनात अंगलट करते . , यानंतर झाडाला येणारी पिकं म्हणजे वेलीवर येणारी फुले-------- आणि पुन्हा तेच ऋतुचक्र निसर्गाच्या नियोजित नियमानुसार चालत राहते.
पण खरी सोबत असते जोडीदाराची, जो स्वतःच सुख आपल्या नावे करतो आणि दुःखाचा वाटेकरी कुणालाच करत नाही, स्वतः जळतो, तडफडतो, राब राब राबतो, पत्नीच्या आणि कुटुंबाच्या सुखासाठी धडपडतो, अविरत परिश्रम करून कुटुंबाचा गाडा ओढतो. , त्याचे पाय पळत राहतात दमलेल्या रस्त्यावरून, रस्ता जरी दमला तरी तो कुटुंबप्रमुख कधीच दमत नाही, अपयशाने कोसळला जरी , तरी तो खचत नाही, त्याच्या अश्रूंचा अभिषेक हा हृदयातच होत राहतो, कोणालाही त्याचे आसवं दिसत नाही, तशी तो काटेकोर काळजी घेतो. , हसण्याशी उसना करार व अनुबंध करून काट्यांची कटार स्वतःच्या काळजात रोवतो पण ती कटार तो तुम्हाला दिसू देत नाही. त्याच्या अंतरातले निशब्द घाव अबोल होतात. पावलोपावली तो तुम्हाला सांभाळतो. , दिवसं कसे जातात ते तुम्हाला कळतही नाही, जीवनाचा प्रत्येक क्षण रंगीबेरंगी हिंदोळ्यावर झुलते.