आठवणीतले बाबासाहेब
आठवणीतले बाबासाहेब
......भाषण आटोपल्यानंतर संध्याकाळी, बाबासाहेब काही कार्यकर्त्यांसह लाला जयनारायण यांनी आयोजित केलेल्या स्वागतपार्टीत जाण्यासाठी निघाले. आम्ही समता सैनिक दलाचे स्वयंसेवक त्यांना रस्ता मोकळा करून देत होतो. बाबासाहेब मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ आले. तितक्यात, फाटलेल्या-विटलेल्या जुनेऱ्यातील तीन चार वृध्द स्त्रिया त्यांना अचानक आडव्या झाल्या.
"आमचे आंबेडकरबाबा कुठं हायती जी?" एकीने किलकिल्या डोळ्यांनी पाहात बाबासाहेबांनाच विचारले. मी त्यांच्या बाजूलाच उभा होतो. त्या स्त्रियांचा प्रश्न आणि अवस्था पाहून बाबासाहेब क्षणभर स्तब्ध झाले.
"मीच आहे आंबेडकर" बाबासाहेब शांत, धीरगंभीर आवाजात म्हणाले.
त्या स्त्रिया बाबासाहेबांच्या एकदम पुढे आल्या. अंगावरील फाटक्या जुनेऱ्याच्या ओटीतून झेंडूच्या फुलांचे हार काढले. मोठ्या प्रेमाने आणि आदराने ते बाबासाहेबांच्या गळ्यात घालू लागल्या. बाबासाहेब त्यांच्यापेक्षा उंच असल्यामुळे, त्या माऊलीच्या हातातले हार गळ्यात घालून घेण्यासाठी खाली वाकले.
"आमी गरीब हावोत, बाबा. तुमच्या सभाचं तिकीट घेण्यासाठी पैसे नोयते. म्हणून तुमची वाट पाहत येथीच कवाच्या उभ्या हावोत बगा. तुमी बाह्यर याल. तवास तुमचं दर्शन घेऊ म्हणत व्हतो. पह्यलं कंधी तुमाले पाह्यलं नोयतं, म्हणून ओरखलो नाय, बापा. म्हणून तुमालेस पुसलो का आमचे बाबा कोन्ते हायतं म्हणून." दुसरी एक माऊली बाबासाहेबांना न्याहाळत म्हणाली.
"मग पैसे नसताना तुम्ही हे हार कसे काय आणलेत?" बाबासाहेबांनी त्यांना विचारले.
"सकाळी सकाळी रानात जाऊन गवताचा भारा आणलो. तो गावात इकला बापा. त्याच्या पैशाचाच हा हार घेतलो जी." सगळ्यात वृध्द स्त्री म्हणाली.
"पहाटेच्या पारी जंगलातून लाकडाची मोळी आणलो अन् ती गावातल्या वाण्याला इकून त्याच्या दामाची ही फुलं हा
यत बापा ही." पहिली स्त्री म्हणाली.
घराची रया अंगण सांगते म्हणतात, तसेच त्या स्त्रियांचे दारिद्रय त्यांच्या कपड्यांवरुन व दिसण्यावरुन कळत होते. पण पुढ्यात साक्षात बाबासाहेबांना पाहून त्यांचे मन हरखून गेले होते. जणू त्यांची अनेक वर्षांची तपश्चर्या फळाला आली होती.
त्यांच्या त्या नितळ, निर्व्याज वात्सल्याच्या अनुभूतीमुळे बाबासाहेबांना गलबलून आले. त्यांच्या डोळ्यांत आसवांनी गर्दी केली. बाबासाहेबांना दिवसभरात हजारो लोकांनी त्यांच्या गळ्यात टाकलेल्या वेगवेगळ्या सुवासिक फुलांच्या मोठमोठया हारांपेक्षा त्या माऊल्यांनी त्यांच्या गळ्यात घातलेले झेंडूच्या फुलांचे हार मौल्यवान वाटले. त्यांच्या भावना दाटून आल्या. गहिवरल्या जड आवाजात, ते त्या स्त्रियांना म्हणाले, "माझी आई मी लहान असतानाच मरण पावली. तिचा मायाळू हात माझ्या पाठीवरुन फिरण्याचे भाग्य मला लाभले नाही. ती कशी होती तेही मला आठवत नाही. पण माऊलीनों, तुम्हांला, तुमच्या ममतेला पाहून मला वाटते, ती निश्चितच तुमच्यासारखी प्रेमळ आणि मायाळू असली पाहिजे. मी तुम्हांला निश्चयपूर्वक सांगतो, मी जसा शिकून मोठा झालो तशीच तुमच्या मुलांनाही शिकण्याची संधी उपलब्ध करून देईन. माझ्या समाजाला या नरकातून बाहेर काढेन. माझ्या या ध्येयात जर मी अयशस्वी झालो तर स्वतःच्या डोक्यात बंदुकीची गोळी घालीन."
व्यवस्थेबद्दलची चीड बाबासाहेबांच्या शब्दाशब्दांतून जाणवत होती. त्यांच्या चेहऱ्यावर त्या माऊलींच्या प्रती कमालीचा कनवाळूपणा दिसत होता. बाबासाहेब जेव्हा या भीमप्रतिज्ञेचा एकेक शब्द धीरगंभीरपणे गर्जून उच्चारत होते तेव्हा मी बाजूलाच उभा होतो. मला त्यावेळी स्वप्नातही वाटले नव्हते की, भविष्यात या महामानवाचा आपणाला जवळून सहवास लाभणार आहे. अनेक वेळा, अनेक तास त्यांच्याशी संवाद करण्याची संधी मला मिळणार आहे.
बाबासाहेब लाला जयनारायण बरोबर कारमध्ये बसले आणि मी मुक्कामासाठी शाहीर बाबुराव मेश्राम यांच्या घराकडे निघालो.