काटेरी झुडूप
काटेरी झुडूप
मला नाही राहायचं अनिकेतसोबत, मी तोडलेत सारे संबंध......मला घटस्फोट हवाय.... झालं संपलं सगळं..... समझतो काय स्वतः ला ........खूप झालं, खूप सहन केलंय आता नाही.... नाही म्हणजे नाही.......... सुटका हवी मला अनिकेत च्या जाळ्यामधून..... मीचं बावळट अडकून पडले होते....गुंजन तडा तडा पाय आपटत हमसून हमसून रडत होती.
अगं पण झालं तरी काय सांगशील की नाही... मलाही कळू दे.... लग्न होऊन झाले किती दिवस तुला, असं कोणी सासर सोडून येतं काय... .अंगाची हळद अजून निघाली नाही .... काय सुरू काय आहे तुझं......जरा धीर धर, आता काही तू पहिल्यासारखी कुमारिका नाही आहेस.... कसं ही वागायला... घरच्या लोकांना तरी माहिती आहे कां तू इथे आलीस त्याची..... सानप ताईचा पारा चांगलाच चढला होता.... सानप ताई ह्या गुंजन ची आई......
मुलगी अशी माहेरी परत येईल ह्याची पुसटशी कल्पना किंवा तशी निदान अपेक्षा तरी नव्हती. , मुलीला असे घरी पाहणे, अनपेक्षित, अवचित, अवघड आणि आश्चर्यकारक होतं....
काय करावं ह्या आजकालच्या मुलींचं, आधी लग्न घाई करायची त्यातून नवरा मुलगा स्वतः शोधणार... मुलगा कसा आहे, काय करतो, समोरच्या आयुश्याचं काय, कुठलीही कसलीही चिंता नाही ना काळजी...... सांगितले तर ऐकायचं नाही, आपल्या मनाचा कारभार.... टीव्ही सिरीयल मध्ये जे नाटकं चालतात ते अस्सल आयुष्यात नाही चालत बाई........ हिरव्या बागा बाराही महिने केवळ नी केवळ त्या मूर्ख डब्ब्यातंच दिसतात.....खोटं नाटं वागणे, थापा मारणे, अक्षरशः खोटे बोलणे, वेळ मारून नेणे, भुरळ घालणे डोळ्यासमोर सर्व दिसत असतांना सुध्दा डोळे बंद करून घेणे, त्यातून निष्पन्न काय होणार????चकाकणानाऱ्या सर्वच वस्तू सोने नसतात, कितीदा सांगितले तरी सगळं पुढे पाठ मागे सपाट....तुम्ही आजकालच्या पोरी वर वर च्या झगमगाटावर भुलता.... पण हाच झगमगाट भूल पाडते, प्रखर प्रकाशात डोळे दिपून जातात आणि डोळ्यासमोर अंधारी येते.....आणि ठेच लागून तोंडघशी पडतात सानप ताई संतापाच्या भरात बडबडत होत्या.
आई तू वाट्टेल ते बडबडू नकोस, काय कमी ताप आहे कां डोक्याला, अजून देतेस....
गुंजन किंचाळली
नाही करत बडबड, तुला स्वतः च्या आयुष्याचं वाटोळंचं करून घ्यायचं ठरवले असेल तर मी काय करू शकते......
मला कश्याला रागावतेस... मी काय केलं...
मग कुणाला रागावू, सासर सोडून कोण आलं.... माहेरी
मी इथेही यायला नको होतं काय???.....हे माझं घर नाही आहे कां ???.. एवढी परकी झाले का मी???...... तुला म्हणायचं तरी काय आहे, एकदा स्पष्ट सांगून टाक.....नाही येणार पुन्हा... आताचं जाते.....
कुठे जाणार आहेस....
कुठे ही जाईल, तुला नाही आवडलं ना.......
कसे आवडेल पोरीं, तू आई होशील ना तेव्हा कळेल तुला, लेकीची किती काळजी असते ते ???? काय माहिती तुला कधी कळणार... काहीतरी डोक्यात खूळ घालायचं आणि बरवाईट करून बसायचं.. आयुष्य .....बेटा तीन तासांचा सिनेमा नाही... खूप सहन करावं लागतं, नेहमीच मनाप्रमाणे नाही होतं...दुसऱ्यांच्या सुखासाठी, आपल्या घरादारासाठी, मान मर्यादेसाठी गप्प राहावं लागतं...असं तापट डोकं ठेवून नाही चालत...... सहनशीलता हवी बाई जातीला...
तू तर भरपूर म्हणजे खूप खूप सहनशील आहेस, तुला काय मिळालं गं, एवढं सहन करून, सांग जरा..
गुंजन काही एक ऐकून घ्यायला तयार नव्हती, सारखी तिच्या मनाची तडफड सुरु होती.... सानप ताईंना शांत राहणे जास्त सोयीस्कर वाटले., उथळ पाण्याचा तळ वरून दिसतो., निथळ पाणी नेहमीच शांत असते. सुनामी आली की लाटा किनाऱ्यावर न आढळता उंचच उंच आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्नात असतात. त्यावेळेस त्यांना आवर घालणे कठीण काम असते. गुंजन च्या मनातील सुनामी त्या समुद्राच्या त्सुनामी पेक्षा कितीतरी जास्त पटीने उसंडी मारत होता., त्या विचार रुपी लाटांना शांत करण्यासाठी वेळ हाच एकमेव पर्याय होता.,अति दुःखावरचा रामबाण उपाय ही वेळचं आहे, तारणहार वेळ सर्व दुःख पोटात घालून मनावर ताबा मिळवते.,तिच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या, ताज्या वेदनानीं निखारे जळल्यागत अंग तापलं होतं गुंजन चं, रडून रडून डोळे सुजले होते, काय करावे, की काहीच करू नये, पण ती आई होती, पोरीचं दुःख तिला अगतिक करीत होतं, काय झाले असेल, असं काय घडलं असेल की गुंजनला माहेरी परतणे जास्त सोयीचे वाटले......
सानप ताई विचाराच्या जाळ्यात गुंतून गेल्या, त्यांनी स्वतः लाच प्रश्न विचारला, लग्न झालं की मुली खरंच इतक्या परक्या होतात काय???? लग्नाआधी हेचं तिचं हक्काचं घर होतं, लग्नानंतर मुली माहेरी खरंच परक्या होतात ??नाही?? प्रेमाची जागा व्यवहारीकता व्यापून टाकते.,त्यांचं अस्तित्त्व संपुष्टात येते, दुय्यम दर्जाची वागणूक तिला तिच्या हक्काच्या घरापासूनचं मिळते, समाज तर खूप दूर राहिला, ज्या पद्धतीने मुलगी व्यवहार करते तसाच व्यवहार मुलांनी केला तर तो आपल्याला स्वीकार असतो मग मुलींचा कां नाही????
आपणच आपल्या मुलगी नावाच्या अपत्याचा द्वेष करतो, तिच्याकडून न पेलणार्या अपेक्षा करतो, श्वास कोंबून जीवावर बेतेल एवढ ओझं तिच्या मानगुटीवर लादतो, ही निर्दयता नाही तर काय आहे??? तिचं स्वातंत्र्य लग्न झाल्यावर धुळीला कां मिळतं ?? माहेर हे फक्त आणि फक्त औपचारिक पणाचं जिवंत उदाहरण कां होतं ??? जगाची ही रीत पाळणे अपरिहार्य कां ??? आपल्या मुलीचं काय चुकलं ?? कां तिने मुक्त संचार करू नये, तिला जर त्याचे विचार पटत नसतील तर, कां म्हणून तिने कायम बंधनात अडकून पडावे माझ्यासारखे........एक चूक झाली म्हणून जन्मभर त्याला चिकटून बसने कितपत योग्य ??. तिला ही जगण्याचा पूर्ण अधिकार आहे...... स्त्रीचा जन्म हा फक्त हुंदके गिळण्यासाठीच तर नाही झाला ना ????? माझ्या स्वतः च्या उभ्या आयुष्याचा
विचार केला तर मी ही काय मिळविले तडजोड करून....... संसार उघड्यावर पडू नये ह्या भीतीने सारखी उरावर टांगती तलवार घेऊनचं जगले........ ह्या जगण्याला तरी काय अर्थ आहे, संपूर्ण जीवन स्वाभिमानाने आणि हसतखेळत जगणे आणि जीवनाच्या गरजा भागविण्यासाठी मरण येत नाही म्हणून पावलोपावली जीवाची राखरांगोळी करणे कितपत बरोबर आहे..... मी जे भोगले नशीब समजून माझ्या मुलीने तेच कां म्हणून भोगावे.…...तिचं आयुष्य तिने आपल्या परीने कां म्हणून जगू नये.... त्यात मी कां अडथळा निर्माण करते आहे.... की हा फक्त पूर्वाग्रह आहे.........उगीचच जुन्या रुढींच जोखड घेऊन आयुष्य दावणीला बांधण्यात काय अर्थ आहे.... नवीन पिढीचं मुलं , नवीन विचारसरणी, नवीन कायदे, जसं नवीन फुल उमलतं, त्याचासाठी हे जगच नवीन असतं, आपली पाळेमुळे त्यांना स्वतः ला शोधू देत... अनुभवामधून सत्य आकार घेतं....... परफेक्ट करून घेण्याचा हट्टामुळे आंनद कुणी हिरावून घेत नाही ना हे पहावे बस्स...... कारण आनंदाच्या मागे सुख हात धरून येतं .....जळफळत, तडफडत, मनाची घुसमट होऊन नैराश्य पदरी पडते, आणि ह्याच नैराश्यापोटी आत्महत्या नावाचं पातक घडत असतात.... मी आज गुंजन ची साथ दिली तर समोर ती जे काही जीवन जगेल त्यात ती समाधानी असेल, इतरांना दोष तर देणार नाही...... निवडू देत स्वतः ला स्वतः च्या बळावर... ठेच लागेल, पडतील, सावरतील ही.....नव्या जोमाने अजून उभ्या राहतील..... मानसिक आधाराची गरज आहे माझ्या गुंजन ला आताच्या घडीला.... मी तिच्या बाजूने तटस्थ ऊभी राहील हीच काळाची गरज आहे......तसंही सत्य परिस्थिती लक्षात घेतली तर स्त्री आपला संपूर्ण देह जाळून त्याची राख अंगाला फासून उभ्या आयुष्याचा संसार फुलवते, पुरुष फक्त नाममात्र असतो, एकटी स्त्री संपूर्ण आयुष्याचा जु खांद्यावर वाहते मरेपर्यंत, नावं नवऱ्याचं होतं....
मागे वळून पाहिले तर माझ्या तरी जीवनात असं काय आहे ज्याबद्दल मोठ्या गर्वाने किंवा उत्साहाने सांगता येईल... लग्न झाले तेव्हा जेमतेम अठरा वर्षाचे होते, मायबापांनी डोईवरचं ओझं समजून जो मिळाला त्याच्या गळ्यात बांधून दिलं, सुरवातीचे तीन ते चार महिने आनंदात गेले, आणि पाचव्या महिन्यापासून जी मारझोड, शिवीगाळ ,जनावरापेक्षाही खालच्या पातळीची वागणूक, ढोरकाम, पाठीचा कणा मोडत पर्यंत अमानुष अत्याचार, उठता बसता बुक्यांचा मार....दारुड्या नवऱ्यानं जीवाचे हाल हाल केले होते.. दारूला हाथ न लावण्याची शपथ तंतोतंत तीन महिने पाळली होती, गरीबाची पोर मी काय करणार, आईने पदराला गाठ बांधून पाठवलं होतं, ज्या घरी लग्न करून दिले त्याच घरून तिरडी निघाली पाहिजे, आमची अब्रू आता तुझ्या हातात सानप.... माहेरचं नावं मातीत मिळवू नकोस......नेटानं संसार कर...बारीक सारीक गोष्टीसाठी माहेरची वाट धरू नकोस, नवरा हा देवा सारखा असतो, त्याची सेवा कर......पण सेवा करण्यासाठी नवरा ही देव असावा लागतो हे सांगणे ती कदाचित विसरली असावी......लगेच वर्षभरात गुंजन झाली, वाटले आतातरी घराचे वासे फिरतील पण सटविणे लिहिलेले लिखाण कुणाला चुकले. ..नवरा दारुडा, घरी खाणारी दहा तोंडे, शारीरिक होणाऱ्या परिवर्तनापेक्षा जीवनात होणारा बदल न पेलणारा होता,संसाराची जबाबदारी झिडकारून नवरा परिवाराला वाऱ्यावर सोडून घरून जो निघून गेला तो पुन्हा परतलाच नाही, नवऱ्याविन्या समाजात पावलोपावली होणारी हेळसांड, त्या विखारलेल्या नजरा, भलत्याच हेतूने देऊ केलेली आमिषे, मदतीचा हात दाखवून नजरेतून सरळमार्गी काळजात उतरणारं जहर, नवरा कितीही बेकार, निर्लज्ज, दारुड्या असला तरी बायकोला त्याची किती गरज असते ह्याची चांगलीच प्रचिती अनुभवली होती, परिवार चालवतांना होणारी दमछाक आठवणीत होती, चार घरची धुणीभांडी करून चरितार्थ चालविला, पण लेकीला कमी पडू दिले नाही, माझ्या घरकामाची सावली सुध्दा तिच्यावर पडू दिली नाही,,,,कितीदा वाटले ह्या जाचा मधून सुटका करून घ्यावी नाहीतर पळून जावे किंवा कुठे जाऊन जीव द्यावा , एकदा तर तसा प्रयत्न ही करून पहिला पण चिमुकल्या गुंजन कडे पाहून काळजात कालवाकालव झाली, आपल्या नंतर ह्या निरागस पोरीचं
काय???स्वतः लाच प्रश्न विचारला आणि गप्प मुकाट्याने लाचारीचं जिणं जगत राहिले....तिला उच्च शिक्षण दिले, तिच्या आवडीनिवडी जपत राहिले.... तिच्या रूपाने आपलं बालपण, तरूणपण जगत राहिले..... केवढा आनंद झाला होता मला जेव्हा तिने अनिकेत बद्दल सांगितले होते, गुंजन ने आपला जन्माचा जोडीदार निवडला होता, मन प्रामाणिक, स्वच्छ आणि निर्मळ असले तर हृदयातून निर्माण झालेला खऱ्या आनंदाच्या भावनेचा ओलावा हृदयात प्रेम निर्माण करीत असतो,
पण हे काय, काय झालं असेल दोघात ???, कां ती माघारी फिरली ??
काही तिच्या जिव्हारी लागलेलं दिसतं, लहानसहान गोष्टीवरून जीवाचं रान करणारी पोरं नाही माझी....चल सानप उठ!! मनाने साद घातली, आज तुझ्या गुंजन ला तुझी नितांत गरज आहे, मोठ्या विश्वासाने ती घरी परतली आहे, तिच्या डोक्यावरून मायेचा हाथ फिरवं..... विचार तिला काय झाले ते..विरघळून जाऊ दे अश्रूंच्या द्वारे वेदनेची चिलखते....आज तुझं पिल्लू घरट्याची ऊब मागतय सानप ... जा बिलग तुझ्या पाखराला..पंख तुटण्याच्या आधी.....!!!!
सानप ताई गुंजन कडे गेल्या, प्रेमाने आणि वात्सल्याने तिची विचारपूस केली, आणि तिचा जो काही निर्णय असेल तो मला मान्य आहे, मी तुझ्या सोबत आहे, ही ग्वाही एका आईने आपल्या लेकीला दिली.... त्या निस्वार्थ, निश्फळ, निष्पाप, नितळ प्रेमाच्या, विश्वासाने गुंजनला गहिवरून आले, ती अक्षरशः ओक्साबोक्शी रडू लागली, आणि आईची माफी मागू लागली....मायलेकी च्या प्रेमाला आज वेगळीच झालर होती, दोघी मायलेकी आज चार डोळ्यांमधून ओघळणार्या अश्रूं मध्ये ओल्याचिंब भिजल्या होत्या.... वर्तमानाशी दोन दोन हात करून भविष्यातील चांदण्या पांघरण्याचे बेत आखीत होत्या.... सानप ताई आज खऱ्या अर्थाने माय बाप दोघांची भूमिका वठवित होत्या...
(क्रमशः)