Nalanda Satish

Romance Tragedy Thriller

3  

Nalanda Satish

Romance Tragedy Thriller

अधांतरी

अधांतरी

10 mins
215


काय झालं इथे ? एवढा शुकशुकाट कां आहे?? कोणी आहे कां घरी ??? अरे कुठे गेलीत सर्व........ कुणी सांगेल काय मला काय घडलं असं .....???? सुतक सुरू आहे कां घरात????????

किशोर रागाच्या भरात पाय आपटत होता, रात्रीचे दहा वाजले होते, पोटात आगीचा बंब पेटत होता, पण घर आज नाही तेवढं शांत होतं, ही वादळापूर्वीची शांतता होती की काय....…कळतं नव्हतं किशोर ला

किशोर चा परिवार तसा फार मोठा पण संयुक्त परिवार होता, घरी आई बाबा, चार भाऊ, दोन बहिणी, आजी आजोबा...किशोर हा सर्वात मोठा होता..

घरची परिस्थिती तशी बेताची ......आई गृहिणी,तरी कुटुंबाला सावरण्यासाठी घर सांभाळून चार घरची धुणीभांडी करीत होती बाबा हातमजूर, कधी ठिय्यावर काम लागायचं कधी नाही, दोन वेळचं पोटभर पोरांना जेवण घालणं ही तारेवरची कसरत भासत होती.....जीवाचा आटापिटा करून लेकरांचं भरणपोषण कसंबसं चालत होत.

मुलांनी चांगलं शिकावं, मन लावून अभ्यास करावा, आप आपल्या पायावर उभे झालीत तर घराची दशा बदलेल असं बाबांना नेहमी वाटत असे., पण गरिबांच्या घरी दुःख हे नेहमी पाचवीलाच पुजले असते........

अभ्यासात मन लागायसाठी पोट ही भरलेलं असलं पाहिजे.... असं नाही की गरीबा घरची मुले शिकत नाही, नावं कमवित नाही, पण तो अपवादचं ......अश्या ह्या दारुण परिस्थिती मधून मार्ग काढायला कमालीची इच्छाशक्ती लागत असते .......

त्यात भर म्हणजे सभोवतालचे वातावरण....

घराजवळ देशी दारूची भट्टी, त्यात रोज बडबडत, पुटपुटत ,शिवीगाळ करणारा कामगार वर्ग, घरातील भांडणाला चव्हाट्यावर मांडणारा दुसरा वर्ग, जुगार सट्टा खेळणारे वेगळे, गुंडागर्दी करणारे वेगळे, नाना प्रकारचे आमिष दाखवून कोवळ्या वयात गुन्हे करवून घेणारे वेगळे, शाळेला बुट्टी मारून तासनतास कॅरम च्या, बुद्धिबळाच्या सोंगट्या खेळणारे वेगळे.....

ह्यापेक्षा आणिक एक वर्ग तो म्हणजे पानपट्टी वर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या टवाळक्या करणारे .... मुलींवर ताशेरे ओढणारे वेगळे.... स्वप्नांनाची महालं बांधणारे वेगळे.... व्यक्ती तितक्या प्रकुर्ती....

कामगार वर्गाच्या वस्त्यांमध्ये , दाट लोकवस्ती मध्ये , झोपडपट्ट्यांमध्ये ही सारी दृशे एकसारखीचं, घोळक्या घोळक्यात मुलांच्या , बायकांच्या, पुरुषांच्या , एवढंच नव्हे तर लहान मुलांच्या ही टोळ्या बघायला मिळतात...... कारण काय तर पैशाचा अभाव आणि रिकामटेकड्या लोकांचा प्रभाव, त्यातून वेळ ही मुबलक प्रमाणात उपलब्ध..... त्यामधून कोणी जिद्दीने पेटून उठले त्या चौकटीतून बाहेर पडायला तर टोमनाण्याचा वर्षाव ........

किशोर हा असल्या मधलाच एक, अभ्यासा कडे खूप लक्ष्य लावण्याचा प्रयत्न केला पण साध्य काही झालं नाही, शेवटी मित्रांसोबत कॅरम खेळण्यात टाईमपास करणारा, त्या खेळामध्ये कधी तरबेज झाला त्यालाही कळले नाही......आईबाबांनी पार वाया गेलेला मुलगा समजून त्याचं काही होऊ शकते ह्याची कल्पना सोडून दिली होती.... किशोरचा ही आत्मविश्वास दिवसेंदिवस घसरत चालला होता पण कॅरम च्या पटावर बसला की तो स्वतः ला ही विसरून जात होता, राणी तर सदानकदा त्याचीच असायची...…..

दिवसा मागे दिवस असेच जात होते, नोकरी पाण्याचे काही नियोजन दूरदूर दिसत नव्हते,

पाठीवरचे लहान बहीण भाऊ, आईवडिलांच्या हालअपेष्टा सहनही होत नव्हत्या, खूप जोर धरला तरी शिक्षण हे फक्त बारावी पर्यंत कसतरी ढकललं....,,

किशोर च्या ओळखीचे राजूदादा होते ते रोज ऑफिस मधून परतीच्या वेळेस किशोर सोबत निदान एक तरी गेम खेळून जात असत...राजुदादानां किशोर विषयी खडानखडा माहिती होती, त्याच्या साठी खूप काही करायची इच्छा होती पण त्यांना ही यश येत नव्हते.... आतापर्यंत अनेक कंपन्यामध्ये त्यांनी किशोर बद्दल शिफारशी केल्या होत्या पण आश्वासना शिवाय हातात

काहीच मिळाले नव्हते.....

आज राजूदादा संध्याकाळी रोजच्या प्रमाणे खेळायला आले, किशोर आणि राजुदादांचा गेम रंगात आला होता, बघ्यांची गर्दी जमली होती, त्या गदारोळात राजूदादा किशोर ला म्हणाले, किशोर एक खास खबर आहे तुझ्यासाठी, जी तुझ्या जीवनाचा कायापालट करेल, पण माझी एक अट आहे , आज मला तू जिंकू दे, आणि जीवनभराच्या जिंकण्याचे आश्वासन तू माझ्याकडून लिहून घे......

किशोर जरा दचकला.......काय दादा, तुम्ही पण टवाळक्या करता .....त्यात काय, आज कॅरम बोर्ड तुमचा..... किशोर हरला, राजूदादा जिंकले.......... पण खरचं किशोर हरला होता संपूर्ण जीवन जिंकण्यासाठी....

दुसऱ्या दिवशी राजुदादांनी किशोर ला त्यांच्या कंपनीत बोलावून घेतले.... त्यांच्या कंपनीत स्पोर्ट कोट्यामधून राखीव एकचं जागा निघाली होती ज्याची शिफारीश दादांनी निवड कमिटी कडे आधीच केली होती... फक्त फॉर्मलिटीज पूर्ण करायच्या होत्या, किशोरला आता कॅरम वेळ घालवण्यासाठी न खेळता कंपनीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी खेळायचा होता...... किशोर जाम खुश झाला, त्याचा विश्वासचं बसेना.....आज कॅरम मुळेच त्याला नोकरी मिळाली होती.....

हळूहळू घरची परिस्थिती नियंत्रणात आली, किशोर ने लहान बहीण भावांची जबाबदारी स्वीकारली, लहान तिन्ही भावांना जागेवर बसविण्या साठी त्याने सतत प्रयत्न केले...त्याच्या प्रयत्नाला यशही आले..त्याने मनोजला टॅक्सी घेऊन दिली, दुसरा भाऊ नरेश याला कुरिअर कंपनीत ओळखीचा फायदा घेऊन नोकरीत रुजू केले, तिसरा आणि सर्वात लहान भाऊ जयेश याला त्याच्या रुची प्रमाणे ग्रंथालयाचे काम मिळवून दिले...... किशोर च्या चार ही लहान बहिणी दिसायला फार सुंदर नसतील पण नाकी डोळी छान होत्या, त्यामुळे स्वतः च्या लग्नाचा विचार न करता बहिणीं साठी स्थळ पाहणं सुरू केले आणि पाहता पाहता चारही लहान बहिणींचे लग्न कर्जबाजारी होऊन कां होईना मोठ्या थाटामाटात लावून दिले.........बहिणींचे नशीब चांगले होते, सर्व बहिणी चांगल्या घरात पडल्या होत्या....

पहिल्यादां आईबाबाच्या डोळ्यात त्याने जगण्याची चमक पाहिली होती, सर्वकाही व्यवस्थित सुरू होतं, तितक्यात आनंदाला विरजण घातल्यागत प्रसंग घडला..... टॅक्सी चालवणाऱ्या भाऊ मनोज ने एका मुलीला घरी आणली आणि चक्क बायको म्हणून स्फोटचं केला ,कुणाला काहीच कळले नाही, आईबाबाच्या पायाखालची जमीनचं सरकली, कुणाला काय बोलावं कळेना .... शेवटी किशोर ने पुढाकार घेऊन लहाण्याला समजावण्याचा प्रयत्न केला की असं होत नाही रे बाबा... तुझं समजा ह्या मुलीवर प्रेम असेल तर आपण रीतसर मागणी घालू शकतो .....हवं तर ह्याच महिन्यात तुझ्या अंगाला हळद लागेल असे प्रयत्न करतो पण आता ह्या क्षणाला ह्या मुलीला तू सुखरूप तिच्या घरी सोडून ये, तिच्या घरची लोकं काळजी करीत असतील, किशोर ने समजूत काढत मनोजची रवानगी केली........

सर्वांशी सल्लामसलत करून शेवटी हे ठरले खरे की मनोज चे लग्न करणे आवश्यक आहे..... पण आईबाबा किशोर च्या लग्नाचा हट्ट धरून बसले.....किशोर ला आता लग्न करणे गरजेचे वाटत नव्हते कारण आईबाबांच्या डोक्यावर चे ओझे कमी जरी झाले असले तरी त्याची जबाबदारी अजून संपली नव्हती, आईबाबांनी कधी हा विचारचं केला नव्हता की हा उनाड मुलगा रात्रंदिवस कॅरम च्या पटावरून न उठणारा आभाळा एवढी जबाबदारी कसा काय पेलू शकला, त्याच्या चांगुलपणाची परीक्षा घेणे काही बरे नाही, ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये..... कुटुंबां साठी आतापर्यंत किशोर ने जे काही केले होते ते काही कमी नव्हते..... कोणी ब्र न काढता करतो म्हणून त्याचा अंत पाहू नये.......

आईबाबांनी किशोर चा मन वळविण्याचा भरपूर प्रयत्न केला पण उपयोग काही झाला नाही, उलट किशोर ने मनोज पेक्षा लहान भावाचे लग्न करणे किती गरजेचे आहे हे पटवून दिले...... आईबाबांच्या हाती निराशा चं लागली.....मनोज टॅक्सी चालवीत होता तर नरेश कुरिअर कंपनीत नोकरीला होता, दोघांचे कामाचे स्वरूप भटकंती होते त्यामुळे त्यांना जागेवर बसविणे किशोर ला जास्त गरजेचे वाटले....... नरेश लां जेव्हा त्याच्या लग्नाचं कळलं तेव्हा त्याला आभाळ ठेंगण झालं कारण त्याच ही एका मुलीवर प्रेम होतं, मनोज चे उरकले की तो ही त्याच तयारीत होता पण आता न सांगता न बोलता सोनेरी संधी चोरपावलांनी चालून आली होती... आज नरेश खूप खुश होता , कारण जे सांगायला त्याला कस लागणार होता ते आपसुकचं घडून आले होते.... नवरदेव आधीच बोहल्यावर बसले होते, अक्षदाच तेवढ्या टाकायच्या बाकी राहिल्या होत्या......... किशोर ने आईबाबाबांना समजविले आणि दोन्ही भावांच्या लग्नाचा बार उडवून दिला, दोघेही जाम खुश होती.

दिवसामागून दिवस जात होते, पाच वर्षांचा काळ पाहता पाहता लोटून गेला होता,किशोर ला आता पस्तिशी लागली होती, किशोर चे जसजसे वय वाढत होते, तसतसा कामाचा व्याप ही वाढत होता, पण आईबाबा किशोर च्या लग्नाचे नावही आता काढत नव्हते, किशोर ला आश्चर्य वाटत होते काय कारण असू शकते????? एवढ्यात ते फार अशक्त ही वाटत होते, नेहमी पैश्याची मागणी करीत होते, किशोरला काहीच कळेना, आईबाबांना एक दोन दा विचारायचा प्रयत्न केला पण त्यांनी काही नाही म्हणून वेळ मारून नेली...घरी पहिल्या सारखा आनंद आणि उत्साह नव्हता,

कुठेतरी पाणी मुरत आहे ह्याची कल्पना किशोरला येत होती, आणि त्याचाच सुगावा घेण्याचा तो आपल्या परीने प्रयत्न करीत होता.....काही दिवसांपासून मनोज उदास दिसत होता, जीवनात उदासीनता कां आली असावी , काही नवरा बायको चे बिनसले असणार... तसही प्रेमविवाह करा किंवा अरेंज मॅरेज करा , काही काळा नंतर तोच रंग येतो जो विवाहित जोडप्यांना येतो, म्हणतात ना सज्जन माणसाने नवरा बायको च्या भांडणात पडू नये.....पण प्रकरण काही गंभीर आहे हे किशोरच्या लक्षात आले होते.......मनोजचा पडलेला चेहरा काही वेगळंच सांगत होता.......पण किशोर ला सत्य परिस्थिती सांगण्याचं धाडस कुणीही केले नाही......

कंपनीला चांगला फायदा झाल्यामुळे किशोरला प्रमोशन ही मिळाले होते कामाचा व्याप भरपूर वाढला होता, आज असेच कंपनीमधून घरी जाण्यासाठी रात्र झाली होती, घरी गेल्यावर जे कानावर पडले ते फार भयंकर आणि भयाण होते........आई हमसून हमसून रडत होती, बाबा शांत बसून एकटक कुठेतरी पाहत होते, मनोज रडकुंडीला आला होता, रागाने त्याचा चेहरा लालबुंद झाला होता... नरेश आणि त्याची बायको चुपचाप मान खाली घालून बसले होते, जयेश अजून यायचा होता, कुणीही कुणाशीही बोलत नव्हते, स्मशानागत शांतता पसरली होती, कुत्री बाहेर भुंकत होती, ती भुंकनारे कुत्री जणू आपलेच लचके तोडतील की काय असा भास होत होता...... किशोरला ही वेळ फार जड जात होती, विचारल्या शिवाय गत्यंतर नाही हे किशोर ला कळून चुकले होते, शेवटी भारदस्त आवजात त्याने त्या मरणासन्न एकांताला घाव घातला आणि विचारले "काय झाले कळेल कां मला, कुणी काही सांगण्याचं धाडस करेल काय आणि हो, मनोज तुझी बायको कुठे आहे, तू एकटाच कसा" ????? किशोरच्या प्रश्नांनी सर्वांची तंद्री तुटली...... मनोज भानावर आला......आज त्याला अपराध्यासारखं वाटत होतं...... आणि जे ऐकले ते काळीज तोडणारे व भळभळून रडण्यासारखेचं होते..... मनोज सांगू लागला

दादा मला माफ कर, माझंच चुकलं, मी तिच्यावर एवढा विश्वास करायला नको होता, तिने माझा विश्वासघात केला दादा, मला असाध्य आजार आहे आणि ऑपरेशन साठी लाखाच्या घरात खर्च जाणार आहे असे सांगून तिने आपल्या नातेवाईका जवळून, मित्र मैत्रिणी कडून वीस एक लाख गोळा केले आणि घर सोडून निघून गेली....मी माझ्या चामड्याचे जोडे करून दिले तरी एवढी मोठी रक्कम मी फेडू शकत नाही दादा, जातांना घटस्फोटाची नोटीस बजावून गेली, मी संपलो दादा, मी पार संपलो, म्हणून मनोज ने हंबरडा फोडला...........किशोर स्तब्ध झाला त्याला वाटले जणू भला मोठा दरड त्याच्या अंगावर कोसळला आणि तो त्या दरडाखाली सापडला, त्याच्या तोंडचे पाणी पळाले...... मन सुन्न झाले, हृदय जोरजोरात धडधडू लागले, डोक्याला झिणझिण्या आल्या, हातपाय लटपट थरथरू लागले, त्याला दरदरून घाम सुटला, वाघाच्या दाढेत मान अडकल्या गत अवस्था झाली, वेळ बिकट होती, मनोजला सावरणे ही अत्यावश्यक होते, मनोज ची मानसिक स्थिती पूर्णतः ढासळली होती, बायकोवर तो जीवापाड प्रेम करीत होता, बायकोचा साधा शब्दही तो खाली पडू देत नव्हता, लग्नाचा उगवलेला पौर्णिमेचा चंद्र अजून पर्यंत मावळला नव्हता, त्याच्या प्रेमाचा मोबदला त्याला असा मिळेल असे त्याला कधीच वाटले नव्हते . ........

आज किशोर ला उलगडा झाला होता कां म्हणून त्याचा लग्नाचा विषय आईबाबा विसरले होते.... कां पैश्याची एवढी मागणी वाढली होती...... आपल्या कर्तव्याची जाण ठेवणारा किशोर आज मुळासकट उपटला गेला होता, जीवनाच्या ताटात तुमच्या साठी काय वाढून ठेवले आहे याची कल्पना कुणालाच नसते........तशी किशोरला ही नव्हती. .....किशोरला हा धक्का सहन झाला नाही, अनपेक्षित, अचानकपणे असे कोणी वागेल ह्याचा स्वप्नातही त्याने विचार केला नव्हता, आज सर्व नात्यांचा गोतावळा असूनही तो अधांतरी होता, त्याच्या डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली, घर चक्रीवादळासारखे जोरजोरात फिरू लागले आणि किशोर धाडकन जमिनीवर कोसळला, त्याच्या डोक्याला जबर जखम झाली, आईबाबा, मनोज ,नरेश ने त्याला दवाखान्यात ऍडमिट केले, किशोर ला जेव्हा शुद्ध आली तेव्हा बेड च्या आजूबाजूला सर्व नातेवाईक आणि घरची लोकं विळखा घालून बसली होती, डोक्याला बँडेज पट्टी बांधली होती, दोन्ही बाजूंनी हाताला सलाईन च्या बाटल्या लागल्या होत्या.... डॉक्टर इंजेक्शन देण्याचा तयारीत दिसत होते..... आता कसं वाटतंय मिस्टर किशोर !!!!डॉक्टरांनी किशोरला विचारले

ईट्स ओके डॉक्टर..... किशोर बोलला

नाऊ यु आर आऊट ऑफ डेंजर, टेक अ रेस्ट म्हणत डॉक्टर निघून गेले......

आईबाबा, नरेश आणि जयेशच्या डोळ्यांत अश्रूंच्या धारा गर्दी करीत होत्या, मनोज कुठे दिसत नव्हता, विश्वास घात हा मनोज च्या बायकोने जरी केला असला तरी घाव हे किशोरच्या काळजावर बसले होते तो दुःखाने विव्हळत होता, असंही

काही होऊ शकतं हे मान्य करायला त्याच मन धजत नव्हतं..........तरी आलेल्या भोगाशी असावे सादर अशी त्याची सकारात्मक मनोवृत्ती आधीपासूनच होती, किशोर हा तसा संवेदनशील, भावनिक, कर्तव्यदक्ष, हळवा आणि मोठ्या मनाचा होता, लहाण्यांनी चुका कराव्यात आणि मोठयांनी त्या पोटात घालाव्या असा त्याचा दृष्टिकोन होता.....

मनोज चा पत्ता नव्हता, घरच्यांना वाटत होते, बायकोच्या अपमानास्पद कर्तृत्वामुळे दुःखाच्या प्रचंड काळ्या सावलीने तो मनावरचा ताण कमी करण्यासाठी कुठे एखाद्या मित्राकडे गेला असेल.........येईल....पण.........

तब्बल दहा दिवसानंतर किशोरला दवाखान्यामधून सुट्टी होणार होती....आज हॉस्पिटलचा आठवा दिवस होता.....तब्येतीत सुधारणा होत असली तरी अचानक डोक्यात कळ यायची तेव्हा दगडावर डोकं ठेचून जीव द्यावा की काय असं त्याला वाटत होतं, मनाच्या संभ्रमात मंदा, मनोज ची बायको धापा टाकत किशोरच्या रूममध्ये शिरली, तिला पाहताच किशोरच्या तळपायाची आग मस्तकात पोहोचली, आता अजून काय शिल्लक राहिले आहे, तुझी हिम्मत कशी झाली इथे यायची, चल चालती हो....किशोर किंचाळला$$$$$

असं नका म्हणू हो भावोजी प्लिज माझं एकूण घ्या... मंदा काकुळतीला आली...

काही नको, माझ्या विश्वासाला तडा देताना तुझं काळीज जरा ही तळमळलं नाही, काय कमी होत गं तुला, मना प्रमाणे नवरा मिळाला, अपेक्षेपेक्षा जास्त मान सन्मान मिळाला त्याचे हे फळं... जीव घ्यायला उठलीस आमचा......

भावोजी प्लिज मी काय म्हणते ते एकदा एकूण घ्या, माझी विनंती आहे तुम्हाला, त्यानंतर जो निर्णय तुम्ही घ्याल तो मला मान्य आहे...... प्लिज.......फक्त एकदा...

फासावर चढणाऱ्याची अंतिम इच्छा विचारली जाते, एकदा ऐकूण घ्यायला काय हरकत आहे असे समजून किशोर ने तिला बोल म्हणून परवानगी दिली..... , तिचा एक एक शब्द जसजसा कानावर पडत होता, कानात गरम शिसा घातल्यागत कान बधिर होत होते..... तिच्या तोंडातून पडणारा एक एक शब्द, डोळ्यातून पडणारा एक एक अश्रू सत्य वचनाची ग्वाही देत होता, ढवळलेला तळ शांत होऊन पाणी निथळत होते.....आपलाचं नाणं खोटं असल्यावर दोष तरी कुणाला द्यायचा.......

मनोज ने मंदाच्या प्रेमाचा गैरवापर करून लोभापायी पैसे उकळले होते , पैश्याबद्दल त्याचा हावरट पणा स्नेहाच्या आणि प्रेमाच्या नात्यावर कुऱ्हाडीने घाव घालून गेला होता, आणि सुखाच्या संसाराची राखरांगोळी करून विरहाच्या दरीत मंदाला लोटून निघून गेला होता, आणि त्यावर कळस म्हणजे स्वतःच तयार केलेले घटस्फोटाचे पेपर ठेवून तिला माहेरी सोडून आला होता , तिचं तर सर्वस्व नष्ट झालं होत., नवरा असा निघाला म्हटल्यावर तिने मदत तरी मागावी ती कुणाकडे....

मनोज चे कारस्थान उघडकीस आले होते पण त्याचा कबुलीजबाब देण्यासाठी तो

कुठे हजर होता, त्याचे घर सोडण्याचे कारण आता स्पष्ट झाले होते....

समाप्त



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance