चेष्टा मुलांची
चेष्टा मुलांची
बाप म्हंटले की धडधाकट, कणखरदार, भीतीदायक सुरक्षित भिंत, रुक्ष, हृदयाची धडधड वाढविणारं, डोंगर दऱ्या मध्ये सारखी फिरणारी आवाज, संकटात पाठीशी ठाम उभं राहणारं ,कुठल्याही परिस्थितीत न डगमगनार ,चक्रीवादळामध्ये ही खंबीरपणे उभं राहणार, विषम परिस्थिती ला हसत हसत सामोरे जाणारं, काळजातील दुःख, वेदना ,चिंता, अश्रू, पश्चाताप, मनातील गुंतागुंत, पैशाची चणचण कधीही न दाखविणारं पहाडासारखं व्यक्तिमत्त्व म्हणजे बाप.
बाप म्हणजे न डगमगता सर्व कष्ट हालअपेष्टा सहन करणारा जीव., तरी उपेक्षित , कारण बाप असतो कडक, कणखर, अनुशासन प्रिय, सत्यवचनी, नारळावाणी वरून ठणक, रागीट व आतमधून नरम , कोमल,मऊ असा हा बाप असतो, त्याच्या छत्रसायेखाली लेकरं पाहता पाहता मोठी होतात. बाप हा लेकरांना तळ हाताच्या फोडा सारखा जपतो, कुटुंबासाठी रात्रंदिवस राबराब राबतो, कुटुंबाच्या सुखासाठी जीवाचे रान करतो,लेकरांच्या भवितव्यासाठी विना तेल प्रत्येक क्षण वाती समान जळतो तो बाप असतो. शब्दांत बापाची महती नाही सांगू शकत. बाप हा शब्दांपलीकडला व्याप असतो, त्याची किर्ती, महती शब्दात मांडू असे शब्दचं नाहित. बाप हा अमर्याद सीमेपलीकडला, जिथे क्षितीजाची हद्द संपते तिथून बापाची सीमा सुरू होते.
बाप माझा करतो ढोर मेहनत मला माहिती आहे, तो रोज घाम पितो, शेतात पावसाच्या पाण्यापेक्षा बापाचा घामचं जास्त मुरतो, त्याच्या कपाळावरील आठ्या आणि कोमेजलेला चेहरा बरंच काही सांगून जातो, काळजीने, चिंतेने त्याच्या काळजात भेगा पडल्यात, लोकांच्या टाचेला पडतात भेगा, दिसतंय मला सगळं पण काय करू , कळतं पण वळतं नाही, मला बाहेरील रंगीबेरंगी, झगमगीत, चैनीच, ओल्या पार्ट्यांचा स्वाद घेणारं, आलिशान गाडीत फिरणारं, पोरींच्या कमरेत हात घालून डीजे च्या तालावर नाचणारं जग दिसतंय, मला हे सर्व हवं आहे.
बाप माझ्या ह्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, त्याला ते साधं उमगत ही नाही, बाहेर च्या जगाची त्याला काहीच कल्पना नाही.
तो आहे साधा ,सरळ, भोळाभाबडा, दोन वेळचं जेवणचं त्याला भरपूर वाटतयं. मला स्मार्ट मोबाईल हवा आहे, गेम खेळन्यासाठी
महागडा लॅपटॉप हवा आहे, मित्रांसोबत मिरवण्यासाठी भलीमोठी महागडी गाडी पाहिजे, प्रेयसीला, मैत्रिणींना मल्टिप्लेक्स मध्ये सिनेमा दाखवायला, हॉटेल मध्ये खायला पैसे पाहिजे, बापाला माझ्या हे साधे साधे पण कळत नाही, मग मी काय करू -मला माझी प्रतिष्ठा कायम ठेवायची आहे, दहा मित्रांनी माझ्या आजूबाजूला फिरावं, सुंदर मुलींनी भोवताली घिरट्या घालाव्या, मस्त झिंगाट करून मेजवानी उडवावी, हीच तर खरी आजची जगण्याची शैली आहे.&nb
sp;
मी वेगळं काय मागतो, माझ्या हौसी पूर्ण होतील एवढाच खर्च मागतोय मी, ते ही समजा ते पूर्ण करू इच्छित नसतील तर मी काय करायचं, आपल्याजवळ पैसे नसल्यावर किती अवघडल्यासारखे होते हे माझ्या बापाला कसं कळणार, मेल्यासारखं होतंय बघा, मग बापाची चेष्टा नाही करू तर काय करू ह्यात माझं काय चुकतं.
नाईलाजाने मला खोटं बोलावं लागतं, शिकवणीचे, कॉलेजची फी, इतर खर्च वाढवून सांगावे लागतात, काहीबाही कारण सांगून पैसे उकळावे लागतात, नाही दिले पैसे तर मी आदळआपट करतो, घरी धिंगाणा घालतो, नासधूस करतो, हृदय चिरेल असं बोलतो, शिक्षणाची किती गरज आहे आणि त्यासाठी खर्च करावा लागतो हे पटवून देतो, नोकरीची उच्च दिवास्वपन दाखवतो , मोठी नोकरी लागली की परिस्थिती बदलेल हे ठामपणे सांगतो, मग बाप माझा विरघळतो,ढसा ढसा रडतो, नशिबाला दोष देतो, गरीबीला शिव्याश्राप देतो ,पैश्याची जुळवाजुळव करतो, प्रसंगी कर्ज घेतो, धुसमुसतो. माझं ही काळीज गलबलून येतंय, वाटतं आपण चुकतोय , असं नाही करायला हवंय, चुका समजतात , ऊर गहिवरून येतो पण शेवटी माझाही नाईलाज म्हणा किंवा तरुणाईचा जोश म्हणा, माझ्या गरजा वेगळ्या आहेत, बापाला माझ्या नाही कळायच्या.
आमच्या दोघांच्या पिढीत फार मोठे अंतर आहे, बापाला सहन करायला लागते म्हणून मी माझ्या इच्छानां नाही मारू शकत.
बापाची जगण्याची पद्धत वेगळी होती, तेव्हा काळही वेगळा होता, तुम्हाला जर काळा सोबत चालायचे असेल तरचं प्रगती संभव आहे, त्यासाठी काय वाट्टेल ते करावे लागले तर ते मी करेल.
जर बापाजवळ माझ्या मागण्या पूर्ण करायला पैसे नसतील तर त्याने मला जन्माला तरी कशाला घातले, नव्या पिढीची लाइफस्टाइल वेगळी आहे, तडजोड मला आवडत नाही. बापाजवळ पैसे नाही म्हणून मी माझ्या स्वप्नांना कुस्करून टाकावे कुणी सांगितले???
जन्मदात्याची चेष्टा करू नये, बापाची सुख दुःख वाटून घ्यावे, त्यांच्या डोक्यावर चे ओझे कमी करावे , ज्यांनी आपल्याला जग दाखविले त्याची कुचंबणा करू नये, समजतं मला, पण माझी ही हेळसांड होणार नाही, मला ही कोणी कमी लेखणार नाही ह्याची काळजी तर मलाच घ्यावी लागेल.
जगाच्या पाऊलवाटेवर चालील तेव्हाच माझ्या यशाचा डोंगर उभा राहिल, कमी पडून कसं चालेल.
बापाची चेष्टा होईल म्हणून मी दुसऱ्यांची कुचेष्टा सहन करावी हा कुठला न्याय.
आता बापाने मला सांभाळून घ्यावे , मी कमावता झाल्यावर मी त्यांना सांभाळून घेईल, त्यांची काळजी घेईल,एवढा निर्धार मी करू शकतो ह्याची मी ग्वाही देतो., पण मी मरून मरून जगावे असे कुणाला वाट्त असेल तर ते शक्य होणार नाही.