STORYMIRROR

शुभांगी कोतवाल

Abstract Children Stories Romance

4  

शुभांगी कोतवाल

Abstract Children Stories Romance

आठवणीतला पाऊस

आठवणीतला पाऊस

4 mins
375

येरे येरे पावसा , 

    तुला देतो पैसा ,

          पैसा झाला खोटा ,

                पाऊस आला मोठा ! च

हे लहानपणीच्या आठवणीतलं गाणं , जे आम्ही सुरुवातीच्या पावसा साठी म्हणत असू . आणि तेवढ्या कमी पावसात भिजायला परवानगी असे नंतर मग जास्त पाऊस यायला लागला की घरात खोलीच्या खिडकीपाशी बसून पावसाची गंमत बघत असू .

लाहापणी पावसाचा आनंद पण असे आणि शाळेत जायच्या वेळेला जर खूप पाऊस असला तर घरीच राहून थोडा अभ्यास , रिविजन करून मग मोकळा वेळ मिळत असे .  

कधी - कधी मोठ्यांची नजर चुकवून गच्चीत जायचं . तिथे जिना संपल्यावर एक छोटी खोली होती अर्थात तिथपर्यंत पावसाचं पाणी येतच होत पण भिजून जाऊ इतकं नाही. त्या खोलीला एक खिडकी पण होती तिथे उभे राहून समोरची गंमत , हिरवळ , गायी म्हशी दिसत असत .

आमच्या कॉलोनीला लागून आणि आमच्या घरासमोर मोठं जंगल होतं पण आमच्या ब्लॉक ( ८ घरांचा असा एक ब्लॉक होता , असे सलंग ३ ब्लॉक होते ) समोर मोठा कोट ( म्हणजे विटांची उंच भिंत ) होता . त्यामुळे घरातून काही दिसत नसे .

अगदी खूप काळोख झाला आणि आता पाऊस येणार अशा वेळेला भावंडं , ब्लॉक मधील इतर मुलं मुली सगळे गच्चीत उभे राहून पाहत असू आणि दूर कुठे तरी पाऊस सुरू झाला असं मोठा भाऊ आणि त्याच्या बरोबरीचे वगैरे म्हणत असत पाहा तिथे पाऊस सुरू झाला आणि आता तो पाऊस आपल्याकडे येतोय . आणि खरंच त्या पावसाच्या धारा अश्या आमच्या दिशेने येताना दिसत आणि थोड्याच वेळात पाऊस कोसळत असे आणि आम्ही सगळे गडबडीनी जिन्यावरून खाली उतरून ओट्यावर उभे राहून किंवा घरातल्या खिडकीतून पावसाची गंमत घेत असू. 

पाऊस जरी संध्याकाळपर्यंत थांबला तरी रस्ता आणि त्यासमोरची मोकळी मातीची जागा ओली असल्यामुळे फार काही खेळ खेळू शकत नव्हतो पण तरी दोरीच्या उड्या , गाण्यांच्या भेंड्या तर कधी अभ्यासातले पाढे म्हणत असू . १ ते १०० कोण कमी वेळात न चुकता म्हणू शकता याची स्पर्धा लागत असे आणि तितकच नाही तर उलटीकडून म्हणजे १०० ते १ म्हणण्याची पण स्पर्धा लागत असे .तर कधी मराठीच्या पाठ्यपुस्तकातील कविता लागोपाठ म्हणणे असा आमचा वेळ मजेत जात असे . त्यातली जी प्रसिध्द कविता अगदी श्रावण महिन्याच्या सरी वर होती ती अजूनही आठवते ....


"श्रावणमासी हर्ष मानसी , हिरवळ दाटे चोहिकडे ,

क्षणात येती सरसर शिरवे , क्षणात फिरूनी उन पडे !...

झालासा सूर्यास्त वाटतो , सांज अहाहा ती उघडे ,

तरू शिखरांवर उंच घरांवर , पिवळे-पिवळे ऊन पडे !..


अशा कविता परत परत म्हणाव्याश्या वाटत असत . आणि उन्हाळ्यात अगदी ओसाड आणि रिकामं वाटणारं ते समोरचं जंगल पावसानी अगदी रम्य वाटत असे..जिथवर पाहू तिथे नुसती हिरवळ , गवतानी जमीन हिरवीगार होऊन जात असे . मोठाले वृक्ष पण जणू धूळ झटकून पुन्हा ताजीतवानी होऊन डोलत असत . 

समोर भिंतीपलिकडे कोटाच्या मागे दोन छोटे तलाव निर्माण झाले होते , ते पण पावसाच्या पाण्यानी तुडुंब भरून जात असत आणि त्यात म्हशी बसून मनसोक्त आंघोळ करत असत . कधी - कधी सकाळी मोर , लांडोर , पोपट , कोकिळा , बगळे असे पक्षी दिसत . पाण्यात पोहायला येणारे बदक पण कौतूहल निर्माण करत असत . 

जसं पुढच्या वर्गात , कॉलेजमध्ये आल्यावर मग मात्र पावसामुळे सुट्टी परवडत नव्हती . तेव्हा मग छत्री घेवून , रेनकोट घालून जावं लागत होतं . कधी खूप पाऊस रस्त्यात जाणवला तर कुठेतरी आडोश्याला उभे राहून पाऊस थांबायची वाट पाहायची आणि पाऊस थोडा कमी झाला की मग घरी जायचं . घरी पोहोचल्यावर सगळ्यांच्या जीवात जीव येत असे . मग केस नीट पुसून ओले कपडे बदलून घ्या अशा सूचना चालू असत. आणि मग गरम- गरम चहाचा कप हातात मिळत असे . ती पण एक गंमत आणि आनंदाच्या आठवणीतल्या अशा ह्या आठवणी.

भाद्रपद महिन्यात मात्र हरितालिका तिज आणि गणपती उत्सवात जर पाऊस पडला तर तो नकोसा वाटे . हरितालिका पूजा आम्ही सर्व मराठी कुटुंबातील मुली बायका एका काकूंच्या घरी जमुन करता असू. अगदी आमच्या मागच्याच ब्लॉक मध्ये रहात असतं. पहिल्या राऊंड मध्ये पूजा करायला मिळावी म्हणून आई , काकू आदल्या दिवसापासून पूजेची तयारी करत असत . सकाळी आम्ही मुली पण लवकर उठून , अंघोळी - वेण्या आटपून तयार होऊन आई व काकू बरोबर पूजा करायला जात होतो . 

रात्री किमान बारा वाजेपर्यंत जागरण करून मग हरितलीजेची पुन्हा आरती होत असे . अशा वेळी बाहेर जाऊन आम्ही सर्व मुली खो - खो , आंधळी कोशिबीर , लंगडी असे खेळ खेळत होतो आणि जर त्यावेळेला पाऊस पडला तर मग थोडा विरस होत असे . मग हरितालिका पूजा केली त्या भोवती बसून सगळे वैठे खेळ खेळावे लागत होते . पण त्यात पण खूप गम्मत असायची .

गणपती उत्सवा निमित्त कॉलनीत सार्वजनिक गणपतीची स्थापना केली जात होती . रोज सकाळ संध्याकाळ आरती- प्रसाद , रात्री कधी सांस्कृतिक कार्यक्रम तर कधी सिनेमा हे दाखवण्याचा प्रोग्राम उघड्या मोकळ्या जागी गणपती समोर होत असे आणि मग पाऊस पडला तर त्यात व्यत्यय येत असे.

सुट्टीच्या दिवशी वेगवेगळ्या खेळांची स्पर्धा होत असे त्यातही जर पावसाची व्यत्यय आला तर वेळ जात असे. पण शेवटी निसर्ग तर आपल्या क्रमानी चालणार. आपल्याला हवा तेव्हा आणि नको तेव्हा पाऊस पडेल किव्वा पडणार नाही तसं नसतं न .! 

अशा ह्या पावसाळ्यातील आठवणी मनाला चिंब भिजवून टाकतात आणि मन प्रफुल्लीत करून जातात . सगळं कसं स्वच्छ आणि सुंदर दिसायला लागतं !



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract