आई सावत्र नसते!
आई सावत्र नसते!
" ओ बाबा!! आई कुठे चालली?? ही अशी का झोपली इथे खाली?? आणि हिला असं का नटवत आहेत हे सगळे?? बाबा सांगा ना?? " लहानसा अबीर आपल्या आईच्या पार्थिवाला बघून त्याच्या वडिलांना विचारत होता.
" बेटू , आई ना देवबाप्पा कडे जात आहे. तिच्या अबीर ला खूप आयुष्य मिळावं म्हणून देवबाप्पाला सांगायला जात आहे. " असं म्हणतं विक्रम च्या डोळ्यात पाणी आलं. त्याने लहानग्या अबीर ला कुशीत घेतलं आणि त्याच मनाच आभाळ मोकळ केल. अबीर झाला आणि माधुरी आजारी झाली. तिला कॅन्सर होता. अबीर झाला तेव्हापासून ती खाटेला खिळली ते उठलीच नाही. विक्रम अबीर च सगळं करायचा. विक्रम चे आई वडील आधीच गेले असल्याने माधुरीची आई अबीर ला सांभाळायला त्यांच्या सोबत राहत होती. माधुरी अशी निघून गेली. अबीर लहान असल्याने आणि सांभाळणार कोणीही नसल्याने माधुरीची आई अबीर ला स्वतः बरोबर त्यांच्या घरी घेऊन गेल्या.
अबीर चे मामा मामी ही चांगले होते. पण अबीर सारखी त्याच्या बाबांची आठवण करायचा. तो माधुरीशी इतका जुळला नव्हता जेवढा तो विक्रम च्या जवळ होता. खरं सांगायचं तर माधुरी त्याला जवळ येऊच देत नव्हती. कारण तिला वाटायचं मी जर निघून गेले तर माझ्या अबीर ने माझी आठवण काढू नये. स्वतःच्या काळजावर दगड ठेऊन ती अबीर ला जाणून दूर ठेवायची.
अबीर तीन वर्षाच्या होता. त्यामुळे त्याला थोडं कळायचं. विक्रम खूप एकटा झाला होता. शिवाय अबीर जवळ नसल्याने त्याला आणखीनच एकटं वाटायला लागलं होतं. माधुरी जाऊन दीड वर्ष झाल. विक्रम चे मित्र त्याला दुसऱ्या लग्ना बद्दल बोलू लागले. म्हणजे अबीर ची देखील हेळसांड होणार नाही. विक्रम ला त्यांचं म्हणन पटलं. त्याने लग्नाचा निर्णय घेतला. तेव्हा विक्रम ने दुसरी कुठलीच मुलगी न बघता त्याच्या जवळच्या मित्राच्या बहिणीला मागणी घातली. ती ही विधवा होती. नवरा व्यसनी असल्याने त्याच्या दोन्ही किडनी फेल होऊन त्यात त्याचा मृत्यू झाला होता. मात्र माधुरीच्या घरच्यांना हे लग्न मान्य नव्हतं. त्यांनी अबीर ला उलट सुलट सांगणं सुरु केल. त्याच्या कोवळ्या मनात काटेरी निवडुंगाचे बी रोवण सुरु केल होतं.
विक्रम अबीर ला परत घरी घेऊन आला. ममता विक्रम ची नवी बायको. अबीर विक्रम ला म्हणाला, " बाबा ही कोण? " तेव्हा विक्रम ने त्याला जवळ घेऊन सांगितलं, " ही अबीर ची आई आहे. " अबीर ला ऐकून खूप आनंद झाला. ममता च ही स्वतःच बाळ नव्हतं. ती अबीर ची खूप काळजी घ्यायची. त्याला न्हाऊमाखू घालणे, त्याला भरवणे , त्याच्याशी खेळणे... ती ही तीच दुःख विसरून गेली होती. अबीर आणि ममता यांचं नातं खूप घट्ट झाल होतं. सगळं छान सुरु असताना मात्र माधुरी च्या आईला हे बघवन झाल नाही.
एक दिवस माधुरीच्या घरचे सगळे विक्रम कडे आले आणि त्यांनी अबीर ला नेण्याचा तगादा लावला. " आमच्या मुलीचं बाळ आम्हाला द्या. तुम्ही तुमच्या बाळाचा विचार करा. अश्या पद्धतीची भाषा ते वापरू लागले. " विक्रम त्यांना समजावत होता पण कोणीही ऐकून घ्यायला तयारच नव्हते. ममताच्या ही डोळ्यात अश्रू थांबत नव्हते. जरी तिने अबीर ला जन्म दिला नसेल पण तीच आईपण अगदी खर होतं.
शेवटी माधुरीच्या आईने अबीर ला स्वतःकडे घेत त्याला सांगितलं, " अबीर बाळा तू आमच्या सोबत चल. मामा मामी तुला जे हवं ते घेऊन देणार. आपण सोबत राहू. तुझे बाबा येतील तुला मधे मधे भेटायला. " अबीर लगेच म्हणाला, " आणि आई...?? मला नाही यायचं तुमच्या सोबत मी आई जवळ राहणार. " मात्र माधुरीची आई म्हणाली, " ती काही तुझी खरी आई नाही! सावत्र आहे ती. "
त्याच्या आजीचे हे शब्द ऐकून ममताला रडू आवरलंच नाही. ती पूर्णपणे कोलमडून गेली होती. लहान अबीर आजीचा हात सोडवून लगेच ममता जवळ धावत जातो. आपल्या चिमण्या हाताने तिचे डोळे पुसत म्हणतो, " आई ही आईच असते... ती सावत्र थोडीच असते. " या मायलेकाला कोणीही कधीच दूर करू शकले नाही.
