यंत्रमानवाची व्यथा
यंत्रमानवाची व्यथा
यंत्रयुगातून एकदा
एक यंत्रमानव,
अश्मयुगाचे अश्म भेदून
काळाच्या मागे जातो.
आपले पूर्वज बघून तो
कासावीस होतो.
विचित्र यंत्र बघता
वल्कलं नेसलीली स्त्री
आणि एक लहान पोर
थोडं मागे सरतात.
दोन पुरुष हातात दिवटी
अन कुल्हा घेऊन त्याच्या
अंगावर धावून येणार
तोच यंत्रमानव त्यांना
थांबायचा इशारा करतो.
ते थांबतात,
यंत्रमानव सांगतो,
मी तुमचाच वंशज आहे
सृष्टी निर्माता चकित होईल
अशी प्रगती आम्ही साध्य केली
मात्र ही साधतांना,
मानवाचा यंत्र होतांना,
अश्मयुगापासून यंत्रयुग
काळाच्या या प्रवाहात
माणुसकी आणि ऐक्य
हरवले आहे,
त्याचा शोध घेत इथवर आलो
तेच घ्यायला आलो आहे.
