वर्क फ्रॉम होम?
वर्क फ्रॉम होम?
उन्हातान्हात रस्ते साफ करणारा
वर्क फ्रॉम होम कसा करणार?
कचराकुंडीतला कचरा भरणारा
वर्क फ्रॉम होम कसा करणार?
कधी नाले सफाई करणाऱ्याला
जीवन काय असतं विचारा साहेब
घाणीत पोटासाठी मरणारा
वर्क फ्रॉम होम कसा करणार? ||0||
त्यांना कॉम्युटर माहीत नाही
त्यांना ऑनलाईन माहित नाही
शरीराची घाण देशी विसरवते
इंपोर्टेड वाईन माहीत नाही
कधी रस्त्यावर भाजी विकून
पोटाची खळगी भरतो तो
कधी धंदा झाला नाही तर
एकवेळचं जेवण हरतो तो
कायद्याच्या नावाने मन चरकणारा
वर्क फ्रॉम होम कसा करणार?
पोटाच्या भुकेने धडकी भरणारा
वर्क फ्रॉम होम कसा करणार?
कधी नाले सफाई करणाऱ्याला
जीवन काय असतं विचारा साहेब
घाणीत पोटासाठी मरणारा
वर्क फ्रॉम होम कसा करणार? ||1||
टोपलीत फळे विकणाऱ्याला
ऑनलाईन ऑर्डर देणार का?
ट्रेनमध्ये पाकिटं विकणारा
बँकेतून पैसे घेणार का?
हमाली करणारा मरेल साहेब
जर त्याचं भरलं नाही पोट
घरात राशन नाही त्याच्या
वाचवेल का त्याला पाण्याचा घोट
लॉकडाऊन ने भेदरणारा
वर्क फ्रॉम होम कसा करणार?
कोरोनाने दरदरून हादरणारा
वर्क फ्रॉम होम कसा करणार?
कधी नाले सफाई करणाऱ्याला
जीवन काय असतं विचारा साहेब
घाणीत पोटासाठी मरणारा
वर्क फ्रॉम होम कसा करणार?||2||
महिन्याच्या पगाराची वाट तो
चातक पक्ष्यासारखी बघतो
सगळ्या इच्छा मारून तो
मात्र स्वाभिमानाने जगतो
हास्य संपून गालावरचं
डोळे मात्र पाण्याने भरणार
बुडलाय जो कर्जात खोलवर
सांगा साहेब तो कसा तरणार
परिस्थितीने अवसान गळणारा
वर्क फ्रॉम होम कसा करणार?
उतारावर गरिबीच्या घसरणारा
वर्क फ्रॉम होम कसा करणार?
कधी नाले सफाई करणाऱ्याला
जीवन काय असतं विचारा साहेब
घाणीत पोटासाठी मरणारा
वर्क फ्रॉम होम कसा करणार? ||3||
