विरह
विरह
मी मागे वळून पाहताना
तू नको पाहुस वळून, वळून
तुझ्या नयनी अश्रू पाहून
हृदय जाते पिळवटून
तुझ्या नयनातले अश्रू
जणू माझ्या पायातील बेडी,
चार पावले पुढे जाता,
मागे फिरे मी वेडी
तुझ्या नेत्रातले दवबिंदू
मोती बनून ओघळता त
दूर नको जाऊस,
वारंवार सांगतात.
ओठांच्या कोमल पाकळ्या
राहू देत मिटून,
तू हाक मारली तर
पाय उचलणे ही होईल कठीण
तुला सोडून जाताना
कसे पाहू वळून,
अश्रूही जातात मग,
नेत्रांची साथ सोडून
क्षणभर वाटले तू नसेल पाहत
मला मागे वळून
हळूच पाहीन तुला
डोळे भरून
पण मागे वळून पाहताना
तू दिसलाच नाही समोर असून,
डोळ्यातल्या दाट धुक्यात
तू कुठे गेला हरवून?
