STORYMIRROR

Harsha Kumbhar

Others

3  

Harsha Kumbhar

Others

प्रिय पावसा

प्रिय पावसा

1 min
194

पावसा ,पावसा ,तू असा रे कसा?

तू कधी वाटतोस

जणू , बालपणीचा प्रिय सखा,

माझ्या सुख अन् दुःखातही

चिंब भिजणारा अन् भिजवणारा.


तू कधी भासतोस 

 माझी प्रेमळ माय जणू

 नवजीवन देणारा,

वात्सल्यधारांनी भिजवणारा ,

लेकराचे अगणित अपराध पोटात घालून

 मायने कुशीत घेणारा.


कधी वाटे तू पित्यापरी 

 कुटुंबासाठी सारे कष्ट साहणारा,

 सुखदाता, पालनकर्ता ,

सुखाच्या श्रावणसरी बरसवणारा.


पावसा तू कधी भासतोस

 भेटीची ओढ देणाऱ्या प्रेयसीसारखा,

प्रदीर्घ विरहानंतर ,

प्रेमाचा मनमुराद वर्षाव करणारा ,

भेटीनंतरही पुढील भेटीची ओढ देणारा.


पावसा तू कधी भासतोस

 खोडकर प्रियकर जणू,

अवेळी वाट अडवणारा,

चिंब भिजवून ,

गालातल्या गालात खोडील हसणारा.


पावसा, तू कधी भासतोस 

अवखळ द्वाड वासरूच जणू ,

दिवसभर रानोमाळी ,डोंगरदऱ्यांमध्ये हुंदडणारा,

क्षणभर थांबून, पुन्हा वेडावाकडा पळणारा.


प्रिय पावसा ,सारीच तुझी रुपे मजला प्रिय जरी

पण राग तुलाही अनावर होतो कधीतरी.

मग रौद्र रुपात तुझ्या

 सारेच उध्वस्त होई

सारे संपले तरीही ,

डोळ्यांत मात्र पाणी राही.


विनंती तुला एकच रे पावसा 

नको रागावू, नको रुसू आम्हावर पुन्हा असा.


Rate this content
Log in