मागे वळून पाहतांना
मागे वळून पाहतांना
मागे वळून पाहतांना
कालपटलच फिरे माघारी
भरभर सारी जीवनचित्रे
येतात डोळ्यासमोरी
खोल मनाच्या कप्प्यात
आठवणींची झाली दाटीवाटी
आपसुकच येई मग
विविधरंगी जीवनगीत ओठी
मना लाभे शितलता
हर्ष भरे अंतरी,
जेव्हा मनात झुलती
बालपणीच्या आठवणी.
जणू रणरणत्या उन्हात
शितल वाऱ्याची झुळूक जाते सुखावूनी
आईच्या पदराएवढे
इवलेशे होते माझे जग
माता-पित्याच्या प्रेमळ छत्राखाली
कधी न लागे दुःखाची धग
तारुण्याचीही तऱ्हा न्यारी
रंगीबेरंगी दुनिया सारी
मन असे स्वच्छंदी
बागडे फुलपाखरापरी.
सोनपावलांनी आले सासरी
भ्रतार माझा प्रेमळ जीवनसाथी.
कधी लक्ष्मी ,कधी सरस्वती,
अन्नपुर्णा कधी झाले वात्सल्यमूर्ती.
आभार प्रभूचे,
स्त्रीजन्मा आले.
प्रेमाचा गोड झरा बनून
जीवन माझे कृतकृत्य जाहले.
