विडा
विडा
विडा प्रितीचा बनवला राजसा तुमच्यासाठी
या मंचकी बसा खेटून जवळी भरवण्यासाठी ॥ धृ. ॥
एका एका वर ठेवले दोन
पान हिरवे कंच ss
देठ खुडला चिमण्या दाती
शेंडा लाविले नख ss
गाली हसले आठवणीने रातच्यासाठी ॥ १ ॥
चूना प्रेमाने लावला अलगद
कात करडा रंग ss
खांड सुपारी आवडे तुम्हा
कतरता अडकीत्ता दंग ss
पापणी लवते वरखाली आगमनासाठी ॥ २ ॥
गुलकंद थोडा असा चोळला
बोटाचा दरवळे सुगंध ss
गुलाबी दाणं अलगद सोडलं
शिरशिरत बघा अंग ss
खुलली रात्र आज पुन्हा चांदण्यासाठी ॥ ३ ॥
गुंडाळला विडा असा
टोचली कांडी काळी लवंग ss
चेरी लाली ओठी पानी
तयार झाली संग ss
यावे खुशाल आता दाणं टिपण्यासाठी ॥ ४ ॥

