वारा
वारा
किती छेडतोस या बटांना
उगाच उडती अवखळपणे
अलगद तरंगे गाली हासू
तरीही रुळतो अल्लडपणे
बावरते मी कितीदा अशी
नाही उमगत खोडी तुझी
का सतावतो असे सदा
धांदल उडते उगा माझी
सावरत मी अशी स्वतःला
निमुट पाहते पुढे जायला
शिळ वाजवत सामोरा तू
उभा पुढ्यात फूले द्यायला
लाजेने मी थबकुन जाते
तरीही छातीठोक उभा पुढे
धडधडत्या हृदयाला सांग
उगाच माझ्याशी कसे लढे
विसरून गेले क्षणभर सारे
वर्चस्व तुझे अबाधित आहे
तुझा अनामिक स्पर्श मला
हवाहवासा वाटतो आहे

