वादळाच्या वाटेवर
वादळाच्या वाटेवर
वादळाच्या वाटेवर
तुझी वाट पाहत होतो
दाटून आलेले मेघ
घनदाट पाहत होतो
तु येशील या आशेची
चमक नजरेत होती
माझ्या प्रेमाची उमलणारी
पहाट पाहत होतो ||0||
नजर फक्त
तुलाच शोधत होती
भ्रमाच्या दुनियेत
मला ओढत होती
खट्ट आवाज झाला तरी
तुझा भास व्हायचा
खरंच सांगतो, तू दिसली नाहीस तर
मनाला त्रास व्हायचा
प्रेमाचा दिवा
मनी तेवताना
दिव्याची फडफडणारी
वात पाहत होतो
तु येशील या आशेची
चमक नजरेत होती
माझ्या प्रेमाची उमलणारी
पहाट पाहत होतो ||1||
तुझ्या त्या आणाभाकांवर
विश्वास ठेवून होतो
तुझेच स्वप्न
मनी लेवून होतो
निमिषमात्र का होईना
तुझं दर्शन घडावं
जसं सौंदर्यात सजलेलं
एक स्वप्न पडावं
तुझेच गीत
ओठी होते
तुझ्याच प्रेमाची
महती गात होतो
तु येशील या आशेची
चमक नजरेत होती
माझ्या प्रेमाची उमलणारी
पहाट पाहत होतो ||2||
तूझ्या डोळ्यात
माझं एक जग होतं
अन ते जग
साऱ्या विश्वाहुनही अलग होतं
तुलाच सर्वस्व मानून
तुझीच पूजा करत होतो
तू जवळ नसताना क्षणोक्षणी
एक नवं मरण मरत होतो
एक जग होतं
तूझ्या माझ्या प्रेमाचं
तुझीच प्रतिमा
त्या जगात पाहत होतो
तु येशील या आशेची
चमक नजरेत होती
माझ्या प्रेमाची उमलणारी
पहाट पाहत होतो ||3||
माझ्या मनातली आशाही
आता झिजली होती
माझ्या विश्वासाची वातही
आता विझली होती
प्रत्येक क्षणागणिक
मन अस्वस्थ होत होतं
विचाराने विरहाच्या
अधिकच त्रस्त होत होतं
असहाय वाटत होतं
तुझ्याविण मला
नशिबानं प्रेमावर केलेली
मात पाहत होतो
तु येशील या आशेची
चमक नजरेत होती
माझ्या प्रेमाची उमलणारी
पहाट पाहत होतो ||4||
वाट पाहून शरीर
थकलं होतं
आता मात्र कळून
चुकलं होतं
वचनभंग करून तू मला
एकटं सोडलं होतंस
ज्यात तुझं प्रेम जपलं
ते हृदय तू तोडलं होतंस
जपत होतो ज्याला
जीवापाड सदैव
त्या माझ्या प्रेमाची लागलेली
वासलात पाहत होतो
तु येशील या आशेची
चमक नजरेत होती
माझ्या प्रेमाची उमलणारी
पहाट पाहत होतो ||5||
