उन्नाव
उन्नाव
काय तूझा आव अन काय तुझा भाव
बेटीची अब्रूही लुटली कुटुंबावर घातला घाव
आली होती तुझ्या दारात मागायला न्याय
क्रूर झाला होता तिच्यावर अन्याय तेव्हा
तुझेच होते बगल बच्चे,
तुझाच होता फौजफाटा,
तिच्या होत्या वेदना, याचना,
किंकाळ्या, निरागस शरीरावरच्या,
जखकामाही सांगत होत्या लचके
तोडल्याच्या कहाण्या !
तुझ्या होत्या फक्त बेटी बचाव बेटी पढावच्या,
पोकळ घोषणा !
सांग होईल का? जिवंत तिचा बाप !
अन तिची माय!
सांग भेटल का? तिची अब्रू तिला परत !
तुझ्या आश्वासनांची खैरात तुझ्याचकडच ठेव !
मत मागायला येशील ना तेव्हा ध्यानात ठेव !
जळतंय लोकशाहीत स्वातंत्र्य नारीच
कोणाला फिकीर..
मृत्यूच्या शय्येवर झोपलेली तू , आता तुलाच उठायचंय,
तुलाच लढायचंय सत्तेच्या माज मस्तीत तल्लीन झालेल्याना
खनकन कानाखाली हाणून शुद्धीवर आणायचंय..
धर्माचा बुरखा घालून मिरवणाऱ्या,
या धर्मवेड्यांना, विषमतेच्या किड्यांना
चिरडून समतेच्या साखळदंडांनी घट्ट आवळ्याचय !
तुझ्या सारख्या खूप नागवल्या,भोगल्या,
मारल्या मग या फाईलीवर नाव टाकून
त्यापण धूळ खात पडल्या!
आवळ आता मुठ..
तू रक्ताने ओली चिंब झालीस तरी उठ....
असह्य झाल्या वेदना तरी उठ....
बघ भेटायला येतायेत तुझ्या गोंडस हत्याऱ्याला..
गळ्यात..
त्याचे माथेफिरु सगेसोयरे...
खूप मोठी परंपरा आहे तुझ्या,
संघर्षाची जन्म ते मृत्युची!
लादलेली...
होऊ दे किंकाळ्यांची टक्कर तुझ्या अन त्यांच्या..
फासाचा दोरखंड बनुन ऊठ !!!!
