त्या वळणावर पाऊस
त्या वळणावर पाऊस
त्या वळणावर पाऊस होता
या वळणावर मी कोरडी
तुझ्या वक्षात मृदगंध भरलेला
करात माझ्या रिकामी दुरडी.
माझ्या दारावरुन वाहिले जलद
त्या वळणावर सांडूनिया मोद
तूषारही ओंजळीत ना अलगद
जडावले रे आता प्रतीक्षेत पद.
त्या वळणाचा पाऊस या वळणावर
वळून यावा पुन्हा भरून माथ्यावर
आहेत झेलायचे मोती या हातावर
जलाभिषेक घडूदे शुष्क जिन्यावर.
आता सोडावे म्हणते जुने वळण
पाऊल निघालेत त्या वळणावर
करू जरासे डोळेझाक दोघेही
तुझ्या सोबतीने पाऊस कळल्यावर.
