STORYMIRROR

गोविंद ठोंबरे

Tragedy

3  

गोविंद ठोंबरे

Tragedy

तवा मराठवाड्याचा पाऊस....!

तवा मराठवाड्याचा पाऊस....!

1 min
227

ढग डोई अंगावर जवा झाकाळून येतो

बाप उघड्या रानमाळावर मूठ मातीत सोडतो

त्याच्या हातातली मूठ आशा जोंधळं पेरते

बाप ईस्कटून फेटा वाट थेंबाची पाहतो

तवा ढग मराठवाड्याचा टिचकी मारून निघतो...


माय हात भाकरीचा घाम कपाळी पुसते

तीला उजवाया लेक धाप काळीज भरते

लेक लग्नाची बघून जीव खायाला निघतो

पिठा-मिठाची ओंजळ बाप चोरून पाहतो

तवा ढग मराठवाड्याचा थाप मारून निघतो....


पाठी दप्तर लटकून मुका मायेचा घेताना

तीला खोटी आशा रोज लेक शाळेला जाताना

तीच्या पदराचा रुपाया स्वप्न रोज हाती देतो

बाप पाऊस शोधून तीला येड्यात काढतो

तवा मराठवाड्याचा पाऊस तीचा रुपाया चोरतो...


उसन्या सुखाची झालरं बाप व्याजानं काढतो

तीच्या फाटक्या लुगड्याचे टाके लपून शिवतो

लेक-पोराची हाऊसं बाप उश्याला ठेवतो

रात राखण बापाला जीव टांगणीला जातो

तवा मराठवाड्याचा पाऊस फास गळ्यात टाकतो...


सांग ईस्कटून देवा तोंड वासून का तो जातो

त्याच्या पोटातलं पाणी माझ्या पिकाला मारतो

नाही बरसाया काळीज आला तसा मागं जिरतो

सुगी गेली रान गेलं सडा कुंकवाचा पडतो

तवा मराठवाड्याचा पाऊस रंडकं माळरान करतो...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy