तुझा सहवास
तुझा सहवास
नाते आपले प्रेमळ
मिळे बळ जगण्याचे,
साथ तुझी आणि माझी
देई सुख समृद्धीचे..!!१!!
विश्वासाची एक गाठ
ठेवी बांधून मनास,
कुटुंबाचे दोरखंड
जोडे आपल्या जगास..!!२!!
सोडवत अडचणी
संघर्षाने माखलेले,
कष्ट तुझे हात माझे
संसारात फुललेले..!!३!!
तीन कळ्या उमलून
धन्य केलेस मातृत्व,
शिस्त, संस्कार, आधार
दिसे यातच पितृत्व..!!४!!
लाभो साथ आयुष्यात
करे ईश्वरी प्रार्थना,
मिळो तुझा सहवास
हीच मनस्वी कामना..!!५!!

