तो पाऊस
तो पाऊस
बेधुंद कोसळणारा
बेभान करणारा तो पाऊस
मरगळलेल्या मनाला नवी
पालवी येऊन चैतन्य
फुलविणारा तो पाऊस
पानोपानी हिरवळ सजविणारा
नाजूक वेलींना ही देखील
लाजून हसविणारा तो पाऊस
कुठे रुसून बसणारा तर कुठे
आनंदाने बरसणारा तो पाऊस
कधी दुःखाचे चटके तर कधी हर्ष
उत्साह घेऊन येणारा तो पाऊस
गतकालीन आठवणींना उजाळा देणारा
सर्वांना हवाहवासा वाटणारा तो पाऊस
बेधुंद बरसणाऱ्या सरी अन् झोंबणारा गारवा असतांना
फक्कड चहासोबत गप्पा गोष्टी रंगवत ठेवत
नात्यातील गोडवा वाढविणारा तो पाऊस
ऊन सावलीच्या खेळात इंद्रधनुची अनुभूती देणारा
सुखद सरींनी नदी-झरे यांना खळखळवणारा तो पाऊस
आनंद लहरींनी मयुराचे नृत्य अन्
कोकिळेच्या गाण्याची
मैफिल जमवणारा तो पाऊस..
