STORYMIRROR

manisha khamkar

Tragedy

4  

manisha khamkar

Tragedy

तो पाऊस

तो पाऊस

1 min
220

 

घरांच्या छपरावरून कोसळताना

भिजवत होता भुई अन् आई

भर रातीला ही जागवत होता 

जणू काही रागवत होता 

तो पाऊस......

झाडांच्या फांद्यातून,फांद्यांच्या पानांतून

टीपटीप गळताना इवल्या जीवांना,

त्यांच्या घरट्यांना भिजवत होता

जगणं त्यांचं अडवत होता

तो पाऊस.......

नदी नाले,ओढ्यातून वाहताना

घोड्यासारखा उधळत खिदळत 

पाण्यातल्या लव्हाळ्यांना तुडवत

मर्यादा आज ओलांडत होता 

तो पाऊस.........

शेतातील पिकांना भिजवत होता

पिकातील दाण्याला सडवत होता

डोळ्यातलं सपान पुसत होता

कर्जाचा डोंगर वाढवत होता

तो पाऊस ........

 भिजून अंगावर नव्हता आता शहारा

पावसातही वेदनेच्या देत होता झळा 

कुणासही भावत नव्हता

हवाहवासा वाटत नव्हता

तो पाऊस........

सरीवर सरी झेलताना

ओठी गात होतो पावसाचे गाणे

आज ऐकू येईना आमचे गार्हाणे

बहिरा आज झाला होता

तो पाऊस....

एकसारखा पडत होता

सतत वार करत होता

अश्रूंची फूले वाटत होता

शत्रूच मला भासत होता

तो पाऊस......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy