तिनं फक्त कुढायचं
तिनं फक्त कुढायचं
लहानपणापासून दुजाभाव
एवढंच तिनं बघायचं,
मिळेल ते स्वीकारत तरीही
आनंदानं हसत 'ति'नं फक्त कुढायचं...||१||
हक्काचं सोडून परक्याचं घर
आपलंसं करण्यासाठी रात्रंदिन राबायचं,
प्रत्येकाचं हवं नको सांभाळताना
मन मारून जगायचं
'ति'नं फक्त कुढायचं...||२||
येईल आपलाही एक दिवस कधीतरी
भाबड्या आशेवर जगायचं,
मान-अपमान सहन करत
'त्या'च्या आनंदासाठी जगायचं
पण कळतं जेंव्हा वेड्या मनाला
'तो' ही त्यांचाच आहे
'ति'नं फक्त कुढायचं...||३||
कुटुंबाच्या अस्तित्वातच
आपलं अस्तित्व पहायचं,
स्वतःची अस्मिता कधी कळलीच नाही
जमेल तिथं आणि जमेल तसं फक्त राबायचं
'ति'न फक्त कुढायचं...||४||
आपलं कुणी नसलं तरी
आपण मात्र सर्वांचं व्हायचं,
संस्काराची शिदोरी जपत
प्रत्येक ठिकाणी झुकायचं
'ति'नं फक्त कुढायचं...||५||
नका धरू गृहीत 'ति' ला
'ती' सुद्धा माणूस आहे,
मन,भावना,इच्छा,अपेक्षा
'ति'ला ही आहेत
'ति'ला फक्त शब्दांचा आधार हवा
तू कुढायचं नाही तर लढायचं...||६||
