"ती कळी"
"ती कळी"
आजही ती कळी उमलली त्याच अधिरतेनं...
पानांच्या उबदार पांघरूणात पहूडलीच नाही कधी ती जास्त वेळ जरी निसर्ग नियमांविरूद्ध जाणं तिला शक्य होतं..
मग ती लाजऱ्याच डोळ्यांनी रोजच प्रकाशाचे स्वागत करू लागली...
रोजच घर, अंगण अन् सारे काही सजवू लागली..
तिच्या चैतन्याची तिलाच खाञी पटली..
दिशा दिशांना अत्तराप्रमाणे पसरून सर्वांना प्रसन्न करत सुटली..
सोबतच तिनं स्विकारली होती ह्रदयात आकाशाची विशालता,
मनात सागराची अथांगता,
आणि
जगण्यात धरणीची सहनशिलता...
अशी ही कळी बनली होती सर्वांच्या ह्रदयाचा ठोका..
तिच्या शिवायच्या सहवासाला बेचैन व्हायचे सगळेच जीव...
कळीला खुप खुप उंच उंच जायचं...
जिथं सोनेरी ढगांच्या पायघड्या असतील...
जिथं बर्फाने नटलेली शिखरं असतील...
जिथं सगळ्या तारका उधानलेल्या..
तिच्या स्वागता पुष्पकुंज घेऊन उभ्या असलेल्या...
आता ती कळी फुलली होती.
तिच्या नकळत फुल झाली होती..
ती
रातराणीशी बोलु लागली..
मोगऱ्याशी हितगूज करू लागली..
पहाटेच्या दवात भिजू लागली..
सुर्यकिरणांच्या स्पर्शाने शहारू लागली ..
आपल्या रोजच बदलणाऱ्या रूपात मनोमन मोहून जाऊ लागली ..
होता अभिमान तिच्या सौंदर्याचा पण अंहकार तिला कधी जडला नाही ...
होती एक ऐट तिच्या जगण्यात उन्मतपणा कधी घडला नाही ...
तिला सिद्ध करायचे होते स्वतःला
सर्वांत राहून, सर्वांना बरोबर घेऊन...
म्हणून
येणाऱ्या सर्वच नवख्यांचा स्विकार करत गेली.. सर्वांना सुगंध वाटत गेली...
कधी झगडली उन्मत्त, बेदरकार वाऱ्याशी,
उलटवल्या त्याच्याही सर्व दिशा ,
तरीही ताट मानेनं राहीली उभी
पुन्हा तिचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी....
येणाऱ्या दिवसांची ग्वाही नव्हती
पण ती सजवत होती स्वतः ला ...
तिला नव्हतेच कधी मान्य कुणा आसुरी डोक्यावर विराजमान होणं...
भक्तीभाव नाही ज्याचा मनात त्याला समर्पण देणं..
ती लढली जिवाच्या आकांताने
पण
नाही तोडली नाळ कधी तत्वांची तिने..
कधी
तुडवली गेली कटू शब्दांच्या पायदळी ..
समोर आलं ते जगली
पण उभी राहली स्वतःच्या समाधानासाठी ...
अन् नेहमीचं त्याच तेजाने गर्जत राहीली
थोडी कोमजले तरी काय झालं...
पुन्हा उमलेन... निर्माल्य झाली तरी बेहत्तर पण लीन होईल तर देवाच्याच चरणी.
