पहिली भेट
पहिली भेट
मला ठाऊक आहे..
तुजला समजले होते माझे समजुन तुझ्याकडे न बघण्याचे बहाणे..
पण ते बहाणे होते का...?
बहाणे नव्हतेच मुळी..
तुझ्या चाहूलीने झालेली ह्रदयाची ज्वलंत धडधड अशी प्रकटपणे दाखवायची नव्हती मला...!
तुला सांगू...
तुझ्या नावाने बनवलेल्या डेरेदार वृक्षाच्या सावलीतल्या सोनेरी घराचा दरवाजा उघडला गेला होता,
वाऱ्यावर हेलावत येणाऱ्या तुझ्याच चाहूलीने...
अन्
त्याच चाहुलीने पसरवला होता माझ्या चोहीकडे एक कस्तुरीमृग गंध...!
ज्या गंधाने नित्यनेमाने कळपाटीवर चालणारी माझी बोटं झाली होती कापरी..
अन्
सतत धावणाऱ्या माझ्या पायांतही भरत गेला होता एक प्रकारचा थरकाप ...
त्या अचानक झालेल्या चाहूलीनेच कावराबावरा होऊन मी बघत राहिलो समोरून पुढे पुढे जात दिसणाऱ्या दृश्याकडे अगदी त्रयस्थासारखा..
त्या दृश्याचे संवादही मुक चित्रपटाप्रमाणे मूक झाल्यासारखे ...
अंगावर उभरलेल्या रोमांचांनी माझ्या दातांवर दात आदळत माझ्याच मनाशी संवाद साधला की,
तुझी चाहूल ही किती अघोरी, एका मागून एक टपकऱ्या शृंखला जोडून ठेवणाऱ्या तुझ्या शब्दांसारखी.. अन् तुझे शब्दही विना वाहक विना थांबा असणाऱ्या एसटी बस सारखे..
एव्हाना माझ्या कानांनी दिवाळखारी करत त्यांची कूस बदलून घेत तुझ्या नाजुक शब्दांच्या खैराती झेलल्या होत्या, पण डोळ्यांना ते धारिष्ट्य दाखवता आलेच नाही..
तुला सांगू मी आणली होती आठवणीने तुजला भूरळ घालणाऱ्या हिरव्यागार मोरपिसाची काडी...
पण तिलाही माझ्या शर्टच्या बाहेर डोकावणे जमलेच नाही..
मग खिन्नपणे मी ही शोधू लागलो तिथे तुझ्या चाहूलीने उमटविलेले तुझे ठसे
अन् चालू चाललो जुळवत स्वतःचे ठसे तुझ्या कलात्मकतेने आकृतीबंध केलेल्या ठश्यांबरोबर...
सैल करता तू ओढीची फित, एक ठसा जुळला.
खाणाखुणांनी नजरेने नजरेचा वेध घेतला.
डोळ्यांनी रोखलेला संयम सुटला,
कापऱ्या हातांचा अन् पायांचा थरकाप लयीत बदलला,
कंठाला कंप सुटला
अन् विहरलो तुझ्या निर्मळ आणि प्रसन्न अंगणात
काही क्षणांकरिता..
पण सांगू तुझ्या चाहूलीने
सहाही ऋतू उमललेेत,
तुझ्या अवतीभवती च्या अस्तित्वाने ऊन पसरलं,
स्पर्शाने आभाळात भरून आलं,
संवादाने पालवी फुटली
अन्
तुझा निरोप घेणारा घेताना पानगळ झाली सुद्धा...
मग
घेऊन आलो सोबत तुझ्या सानिध्यातील सगळी पानगळ,
जीवात जीव असेपर्यंत सांभाळण्यासाठी,
पण वाटले
तुझ्याही अंगणात
माझ्या अस्तित्वाची खुण दाखवणारं गोंदण असेन..??
त्या माझ्या अवतीभवती इतरांसोबत वावरणाऱ्या तुझ्या मनात माझंही छोटसं घर असेन..??
प्रश्न अनुत्तरित होता कायमचाच....!!

