पायस्थ
पायस्थ
आयुष्याच्या एकेरी विजनवासात
हरित तृणांनी नटलेल्या वाटेचा पायस्थ झालो..
चाहूल न लागता अगदीच अचानक..!
वाटही ती तशीच
तरूंच्या बहराने फुललेली
रंगीत फुलांत झुललेली
ती नेहमीच ओलीचिंब अन् धुंद
तिच्या पायथळी ओल्या मातीचा गंध
कधी गर्जना तिची मेघांची
कधी संगीतमय मैफिल पानांची
कुडकुडणाऱ्या थंडीत उष्ण उबारा
तप्त उन्हात तिच्या सावलीचा निवारा...
मग मिही स्वप्नवत होऊन हरखलो
जादूई दुनियेत जरा जास्तच बहकलो
विसरलो वायवाट काट्यांची
तमा न उरली घनदाट वाटांची
आगमनाने माझ्या कधी तिही हरपली
पथात माझ्या तिने सुमने बरसली..
आता माझं आगमन नित्याचं होतं
तिचंही बरसणं अगत्याचं होतं
वाटेचं लेणं भिजत गेलं
स्वतः नकळत झिजत गेलं
नकळत माझं येणं मी वाटेवर लादत गेलो
तिच्या अस्तित्वावर मीपण बांधत गेलो
तिचं अगत्य फक्त मजसवे, हाच माझा बाणा.. अधिकाराचा कैफ माझ्या, अजूनच केविलवाणा..!
या वाटेवर मज नकोवाटे कुणाच्या सावल्या..
तिजवर स्थिरावलेले डोळे, सोबतीला बुबळातील बाहुल्या..
परी स्वाभिमानी वाटेनं हे पुरतं हेरलं
पुरे याची चाड, आता भांडं काठोकाठ भरलं..!
आता ती फुलेना..
आगमनात माझ्या झुलेना..
वाटेचा फुलोरा मजसवे केव्हाच सुकला
आतपाईपणा माझा, ज्यानं तिचा सहवास मुकला..
करू लागलो विरहाने मी, आक्रोश अन् हाहाकार...
ञागा करूनी मनी वाटही पुकारी पुर्ण असहकार..
शांतसमय येता, मज उमगले असे काही
पुसून टाकली मीच, वाटेच्या कायद्यांची शाही..
मग निशब्दच होऊन तिच्या मी सावलीत बसलो..
ओळखीची होती वाट पण, माझ्याच चुकीत मी फसलो..
वेळ न दवडता पुन्हा जाईन म्हणतो मागे
उकलून काढीन विस्मृतीत गेलेले जूने धागे..
बदलवीन तुजला नकोसे माझे रंग..
वचन हे माझे, ना करणार कुठला भंग..!
वळतो पुनः प्रारंभी, साक्षी ठेवून त्या आकाशा..
परतेन मी जेव्हा, हाती असेल नवनवा नकाशा...!!
