स्वतःला हरवलं
स्वतःला हरवलं
आज मी मुद्दामच स्वतःला हरवलं
भूतकाळात स्वतः ला रमवलं
विसरून सारे देहभान
जुन्याच विश्वात जायचं ठरवलं....
आज मात्र मुद्दामच स्वतः ला हरवलं....
आईचे रागावणे, बाबांचा धाक
दादाशी भांडणे, बहिणीशी वाद
त्या गोड आठवणीत रमावस वाटलं
आज मात्र मुद्दामच स्वतःला हरवलं....
गुरुजींची ती छम छम छडी,
मण्यांची ती पाटी दगडी
मित्र, मैत्रिणींचा गोड सहवास,
दिवसभर खेळूनही न संपणारी आस
कुठेतरी स्वतः ला शोधावसं वाटलं
आज मात्र मुद्दामच स्वतः ला हरवलं...
ना कुणाचा द्वेष, ना कुणाचा हेवा
अनमोल असा माझा बालपणीचा ठेवा
एक एक पान चाळावसं वाटलं
आज मात्र मुद्दामच स्वतः ला हरवलं...
मुद्दामच स्वतः ला हरवलं.....
