स्वार्थ वाईट फार..
स्वार्थ वाईट फार..
सारी नाती खोटी ही,खोटाच संसार
स्वार्था भोवती फिरते दुनिया,स्वार्थ वाईट फार...
आई,बाप,बहिण,भाऊ,कोणी कुणाच नाही
आपलं आपण पहाती सारे, दुनिया वाईट ही
काय कुणाचा भरोसा,काय कुणाचं खरं...
जो तो बदलतोय रंग,रंग वेगळे प्रत्येकाचे
दात वेगळे प्रत्येकाचे,खायचे दाखवायचे
जो तो करतोय घात,प्रत्येक जन चोर....
कसा ठेवावा भरोसा कसा माणूस ओळखावा
ढोंगी नाटकी सारेच,ज्याचा,त्याचा आहे कावा
येणे जाणे एकटेच,नको खांदे करी चार...
जगू देईना,मरु देईना कोणी कुणाला सुखान
मागे एक,पुढे एक,तोंडावर गाती गुण
नको कुणाचं ओझं,नको कुणाचे उपकार...
ज्याचं त्याला सुखदुःख,आहे कुणाचं कोण
नको आधी मधी कुणाच्या,नको ते देणंघेणं
चुक ती आपलीच,नको होऊ रे बेजार...
ताकापुरती आजीबाई,कामापुरता मामा
गरज सरो,वैद्य मरो असा हा जमाना
नाही इथं कोणी वेड्या तुझ्यासाठी रडणार...
कसं वागावं कुणाशी काही कळणार नाही
कर कितीही कोशीस सुत जुळणार नाही
भल्या बुऱ्याचा तूझ्या कर तुच विचार...
कुणाच्या लागु नको नादी,ध्यानी हे धर
ठेऊ नको आता भरोसा तू कुणावर
हेच आहे गड्या हया जीवनाचं सार...
