सुखी जीवनाचे सार
सुखी जीवनाचे सार


सुख हे प्रत्येकाच्या मानण्यावर असते
स्वकष्टाचे फळ गोड मिळते म्हणतात
तरी दानधर्म, सेवाभाव जीवनात रुजवल्यावर
सुखी जीवनाचे मार्ग नक्कीच दिसतात १
मायबापांची सेवा मनापासून केल्यावर
कर्तव्यातून मनःशांती तर मिळते
भक्तीभाव, देवाचे नामस्मरण करत राहिल्यावर
अध्यात्मातून सुखशांती, समाधान कळते २
सुखी जीवनाचे सार खरे तर
अंधश्रद्धा, षड्रिपुंना सोडल्यावर कळते
छंद जोपासून मनपरिवर्तन केल्यावर
मन प्रगल्भता, स्नेहभावाने माणुसकी जपते ३
प्रेम, जिव्हाळा, आपुलकी जीवनात जपावी
म्हणजे दुसऱ्यांची मने आपोआप कळतात
उगाच कुणालाही दोष देत राहण्यापेक्षा
लक्षात ठेवावे तीन बोटे स्वतःकडे वळतात ४
मित्रत्वाने नात्यांची वीण घट्ट करून
माया, ममता, मानवता धर्म जपावा
निःस्वार्थ, निरपेक्ष वृत्तीने मदतीचा हात देऊन
जीवनात मनाचा मोठेपणा दाखवावा ५
शेवटी प्रत्येकाला सरणावर जायचे आहे
मग आहे तेव्हा जगावे, नि जगूही द्यावे
मी, माझे माझे करत बसण्यापेक्षा
सुखाने उपभोग घेऊन समृद्ध जीवन जगावे ६